Menu Close

बालगुन्हेगारीची समस्या

गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार्‍या चित्रपटांवर बंदी आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

प्रतिकात्मक छायाचित्र

दुचाकी चोरणार्‍या ३ अल्पवयीन मुलांना पुणे पोलिसांनी नुकतीच अटक केली. या तिघांकडून १० लाख ३५ सहस्र रुपये मूल्याच्या १९ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. त्या वेळी त्यांनी केलेले अन्य १४ गुन्हेही उघडकीस आले. त्यातील एका अल्पवयीन मुलावर हत्येचा गुन्हाही नोंद आहे. ‘मौजमजा करण्यासाठी चोर्‍या करून सोप्या मार्गाने पैसा (ईझी मनी) मिळवायचा’, अशी मानसिकता मुलांमध्ये वाढत आहे, हे गंभीर आहे. मौजमजा करण्यासाठी घरून पैसे मिळू शकत नाहीत, ती मुले चोर्‍या करतात आणि घरची आर्थिक परिस्थिती चांगली असणार्‍या मुलांकडूनही वाममार्गाने पैसे मिळवले जात आहेत.

नारायणाच्या प्राप्तीसाठी अखंड हरिनाम घेणारा भक्त प्रल्हाद, १६ व्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिणारे संत ज्ञानेश्वर, वयाच्या १४ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवराय, १८ व्या वर्षी हसत हसत फासावर जाणारे महान क्रांतीकारक खुदीराम बोस अशी तेज आणि शौर्य यांची थोर परंपरा असलेली आपली भारतभूमी आहे. आज येथील तरुण पिढी दिशाहीन आणि गुन्हेगार होणे, हे दुःखदायक आहे. पुणे-मुंबईसह देशातही बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. या मुलांची नोंद पोलिसांकडे नसल्याने त्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते. मुले ही आपल्या राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आहेत आणि तीच जर गुन्हेगारीकडे वळली, तर ती देशाचे भविष्यातील आधारस्तंभ कसे होऊ शकतील ?

गुन्हेगारीविषयक मालिका आणि चित्रपट पाहून असे गुन्हे करत असल्याची प्रेरणा तरुण मुलांना मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘आजूबाजूचे बिघडलेले वातावरण, तसेच दूरचित्रवाहिन्या आणि चित्रपट यांतून दाखवले जाणारे फसवे जग यांमुळे अल्प वयात झटपट पैसा अन् सुख मिळवण्याच्या नादात ही मुले गुन्हेगारीकडे वळतात’, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना हे सर्व कळूनही त्यांच्याकडून अशा मालिका आणि चित्रपट यांवर बंदी आणण्यासाठीचे प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे सरकारनेच आता पुढाकार घेऊन त्यांच्यावर बंदी आणण्यासह मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणाली पालटावी, तसेच मुले सुसंस्कारीत होण्यासाठी शाळांमधून धर्मशिक्षणाचे धडे दिले जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *