शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन होणार
सांगली : महाराष्ट्रात प्रतिवर्षी पारंपरिक शिवजयंती साजरी होते; मात्र त्याचे स्वरूप व्यापक नसते. शिवजयंतीचे विचार प्रज्वलित होणे आणि समाजात त्याची जागृती होणे, यांसाठी या वर्षीपासून हिंदवी स्वराज्य मानवंदना हा कार्यक्रम चालू करत आहोत. यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम रविवार, १ मे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सायंकाळी ५ वाजता होणार असून त्यासाठी अधिकाधिक हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. हिंदुत्वाच्या कार्यासाठी अग्रभागी असणारे शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे त्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी जलसंपदा राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे, शिवसेनेचे विटा येथील आमदार श्री. अनिल बाबर, शिवसेनेचे सर्वश्री अजिंक्य पाटील, बजरंग पाटील, नितीन काळे, प्रसाद बिसवडे, अनिल शेटे, सौ. सुनीता मोरे, युवासेनेचे श्री. शिवराज काटकर यांसह श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री नितीन चौगुले आणि बाळासाहेब बेडगे उपस्थित होते.
पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले की, श्री. उद्धव ठाकरे हे सांगलीमध्ये आल्यावर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर भगवे फेटे घातलेल्या धारकर्यांची भव्य वाहनफेरी होईल. त्यानंतर सायंकाळी सभा होईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात