Menu Close

धर्म आणि शास्त्र !

धर्मनिरपेक्षतेमुळे धर्मविहीन झालेल्या हिंदूंना धर्मज्ञान देण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

प्रतिकात्मक छायाचित्र

क्षत्रियाचा ‘धर्म’ हा रक्षण करण्याचा आहे. युद्धात शत्रूला नष्ट करून देशाचे, देशाच्या साधनसंपत्तीसह जनतेचे रक्षण करणे हाच त्याचा खरा धर्म आहे. ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र यांचेही धर्म आहेत. त्यांच्याप्रमाणेच प्रत्येक प्राणीमात्राचाही धर्म ठरलेला आहे. मनुष्याला त्याच्या धर्माचे पालन करण्याविषयी मार्गदर्शन करणारे शास्त्र ऋषि-मुनींनी सांगितले आहे. त्याचे पालन करून धर्माचरण करणे ही साधना आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती, समाज, देश हा धर्माधिष्ठितच असणे आवश्यक आहे. तो जर धर्माचे पालन करत नसेल, त्याच्या विरोधात जाऊन वागत असेल, तर त्याला ‘अधर्मी’च म्हणावे लागेल. अशा अधर्मियांना दंड करण्यास शास्त्रांनी सांगितले आहे. दंड करणे हा राजाचा धर्म आहे आणि त्याचे त्याने पालन करणे आवश्यक आहे. धर्मशास्त्र सांगणारे असंख्य ग्रंथ हिंदु धर्मामध्ये आहेत. वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत आदी ग्रंथ यांविषयीच मार्गदर्शन करतात. हिंदु धर्मानुसार पूर्वी प्रत्येकाला गुरुगृही राहून धर्मशिक्षण दिले जात असे. मोगलांनी भारतावर आक्रमण केल्यानंतरही मोठ्या प्रमाणात धर्मशिक्षणाची परंपरा चालू होती; मात्र इंग्रजांचे राज्य आल्यावर त्यांनी हिंदूंचे मर्म जाणून पद्धतशीरपणे धर्मशिक्षणाची परंपरा मोडून काढली आणि भारतियांना धर्मविहीन केले. आज त्याची फळे हिंदू आणि भारत देश भोगत आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदूंना पुन्हा धर्मशिक्षण देण्याचा, धर्मशास्त्र शिकवण्याचा प्रयत्न होणे आवश्यक होते. तशी व्यवस्था शासनकर्त्यांनी करणे अपेक्षित होते; मात्र भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ देश घोषित करून धर्माला बाद करण्यात आले. त्यामुळे भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणण्याऐवजी ‘धर्मविहीन’ देश म्हणणेच योग्य ठरेल; कारण गेल्या ७४ वर्षांत  कुठल्याच गोष्टींमध्ये ‘धर्म’ राहिलेला नाही. बहुतांश व्यक्ती तिच्या धर्माचे पालन करत नसल्याने अधर्म बोकाळला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. हे धर्मनिरपेक्ष राज्याचे फार मोठे अपयश आहे. धर्मनिरपेक्ष देशामध्ये हिंदु, मुसलमान, शीख आदी अशा अर्थाने पाहिले गेले, तरी त्याचा परिणाम व्यक्तीच्या धर्माविषयीच्या (म्हणजे आचरणाविषयीच्या) गोष्टींवर झाला; कारण हा देश बहुसंख्य हिंदूंचा आहे आणि हिंदूंना त्यांनी कसे वागावे, याचे धर्मशास्त्र आहे. त्यालाच बाद केल्याने देशात ‘धर्म’ असे काही शिल्लक राहिले नाही. धर्माला राजाश्रय न मिळाल्याने हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याचा मार्ग बंद झाला. धर्मनिरपेक्ष भारतात असे झाले, तरी हा नियम केवळ हिंदूंना लागू झाला. मुसलमानांच्या धर्मशिक्षण देणार्‍या मदरशांना राज्य सरकारांकडून शेकडो कोटी रुपयांचे अनुदान दिले जात आहे आणि हिंदू निष्क्रीयपणे ते पहात आहेत. हे हिंदूंना लज्जास्पद आहे. अशा स्थितीत हिंदूंचे धर्मग्रंथ शिकवण्याचा कुणी प्रयत्न केला, तर त्याला विरोध केला जातो. या धर्मग्रंथांमध्ये योग्य आचरण कसे असावे, याचेच मार्गदर्शन करण्यात आलेले असतांना आणि त्याच्या आचरणामुळे समाजाला लाभच होणार असतांनाही त्याला विरोध करण्यात येणे हा आत्मघात आहे, हे अशा विरोधकांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव !

‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’कडून करण्यात आलेल्या एका अभ्यासातून श्रीमद्भगवद्गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा सैन्य प्रशिक्षणामध्ये समावेश करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. त्याला काँग्रेसने ‘हा सैन्याचा राजकीयीकरण करण्याचा प्रयत्न आहे’, असे सांगत विरोध केला आहे. श्रीमद्भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाने युद्धक्षेत्रावर सांगितली होती आणि ‘क्षत्रियाचा धर्म कोणता आहे ?’, याविषयी अर्जुनाला मार्गदर्शन करून त्याला युद्धासाठी सिद्ध केले होते. स्वतःच्या नातेवाइकांच्या विरोधात शस्त्र हातात घेण्याऐवजी ते खाली ठेवणार्‍या अर्जुनाला त्याचा धर्म काय आहे, याची भगवान श्रीकृष्णाने अत्यंत मार्मिक आणि परखडपणे जाणीव करून दिली आहे. या धर्मग्रंथाचे शिक्षण भारतीय सैन्याला देणे स्वातंत्र्यापासूनच अपेक्षित होते; मात्र काँग्रेसच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळेच इतकी वर्षे ते शिक्षण देण्याचे टाळण्यात आले. आता कुणी ते देण्यासाठी सांगत असेल, तर त्यात मांजराप्रमाणे आडवे जाण्याचा अपशकुन काँग्रेस करत आहे. काँग्रेसींनी कधी हा धर्मग्रंथ वाचला आहे का कि वाचूनही राजकीय स्वार्थापोटी ते त्याला विरोध करत आहेत ? हेही जनतेला समजले पाहिजे.

हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच ‘धर्म’!

श्रीमद्भगवद्गीताच नव्हे, तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रालाही काँग्रेसने विरोध केला आहे. कौटिल्याच्या म्हणजेच आर्य चाणक्यांच्या या ग्रंथामध्ये ‘प्रत्येक व्यक्तीने समाजामध्ये कसे वागले पाहिजे ?’ ‘कोणती काळजी घेतली पाहिजे?’ याविषयीचे अत्यंत सूक्ष्म आणि सखोल मार्गदर्शन केले आहे. हे असे ग्रंथ हिंदूंचा अमूल्य ठेवा आहे आणि तोच जर सैन्याला आणि अन्य संस्थांना, आस्थापानांना शिकवला जात नसेल, तर आपल्यासारखे कर्मदरिद्री आपणच ठरू. केवळ हे दोन धर्मग्रंथच सैन्याला किंवा अन्य संस्थांना शिकवायला हवेत, असे नाही, तर हिंदूंचे असंख्य ग्रंथ त्या त्या संस्थांना आवश्यक आहेत, तसे त्यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे; कारण जीवन कसे जगावे, याचे शिक्षण दिले जात नसल्यामुळेच आज समाजामध्ये मोठ्या संख्येने आत्महत्या केल्या जात आहेत. जीवन जगण्याचा उद्देशच ठाऊक नसल्याने क्षुल्लक कारणांमुळे लोक स्वतःचा जीव गमावून बसत आहेत. कोट्यवधी जनता ताणामध्येच जीवन जगत आहे. श्रीमंत असूनही मानसिक शांतता नसल्याने आज असे असंख्य लोक अस्वस्थ आहेत. गुन्हेगारीतही त्याचमुळे वाढ झाली आहे. बलात्काराने, अनैतिकतेने तर परिसीमाच गाठली आहे. हे सर्व धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि धर्माचरण नसल्यामुळे झाले आहे. पाश्चात्त्यांना ‘धर्म’ असे काही ठाऊक नाही, तेथे अशा प्रकारची स्थिती असू शकते, हे एकवेळ मान्य करता येईल; मात्र विश्वगुरु असलेल्या भारतामध्ये ही स्थिती येणे हे हिंदूंना लज्जास्पदाहून वाईट आहे. आता ही स्थिती पालटून प्रत्येकाला धर्मानुसार वागण्यासाठी त्याला धर्मशिक्षण देणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी धर्माला राजाश्रय मिळाला पाहिजे. हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच सध्याचा ‘धर्म’ मानून त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. तीच त्यांची साधना ठरणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *