‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ ही ३ दिवसीय हिंदुविरोधी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषद
भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर जगभरातील हिंदुद्वेषी वैचारिक आतंकवाद्यांची दुकाने बंद होणार आहेत, हे त्यांना ठाऊक असल्याने त्यांना हिंदु राष्ट्र नको आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर हिंदुविरोधी षड्यंत्र रचले जात आहे. या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी हिंदुत्वनिष्ठ विचारांनी प्रत्युत्तर देणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
मुंबई – ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाच्या पलीकडे जाऊन विकास केला पाहिजे’, ‘मंदिराच्या गर्भगृहात असणारे पुजारी हे शक्तीशाली भूधारक (भूमीची मालकी असणारे) आहेत’, ‘हिंदुत्वनिष्ठांना ब्राह्मणवादाची पुनर्स्थापना करून हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असून हे सर्व धोकादायक आहे’, या आणि अशा धादांत खोट्या, बिनबुडाच्या अन् पुरावे नसलेल्या अनेक हिंदुविरोधी वक्तव्यांचा भडीमार ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या ऑनलाईन परिषदेत करून सहभागी वक्त्यांनी ‘हिंदुद्वेष त्यांच्या नसानसांत किती भिनला आहे ?’ याचे कडवे प्रदर्शन केले. १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील या ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या प्रथम दिनी ‘जागतिक हिंदुत्व काय आहे ?’ ‘हिंदुत्वाचे राजकीय अर्थकारण’, तसेच ‘जाती आणि हिंदुत्व’ या तीन विषयांवरील सत्रांमध्ये विविध वक्त्यांनी हिंदुद्वेषाने ओतप्रोत भरलेले त्यांचे विचार मांडले.
या परिषदेच्या आयोजकांच्या दृष्टीने ‘हिंदुत्वाच्या जागतिकीकरणाला उद्ध्वस्त करण्या’च्या हेतूने या तथाकथित विचारवंतांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ‘हिंदुत्वाचे समर्थक हे मागासवर्गीय (दलित), आदिवासी, अहिंदू, मुसलमान आणि स्त्रिया यांच्याविषयी कठोर (वर्चस्व गाजवणारे) धोरण अवलंबतात. हिंदुत्वावर विश्वास असणारे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी कटीबद्ध असून ते राज्यघटनेत फेरफार करून त्याची ‘निधर्मी’ आणि ‘लोकशाही’ बांधीलकी तोडू पहात आहेत.’ याचा विरोध करण्यासाठी तथाकथित विचारवंतांना जागतिक हिंदुत्वाविषयीच्या राजकीय, आर्थिक, जातीयवाद, लैंगिक भेद, विज्ञान आणि आरोग्य आदी स्तरांवर बाजू मांडण्यासाठी एकत्र बोलावण्यात आले आहे.
काही वक्त्यांनी मांडलेली हिंदुविरोधी निराधार वक्तव्ये !
१. हिंदूंची ‘विश्वगुरु’ संकल्पना म्हणजे उच्चवर्णियांची ‘सर्वाेच्च’ असण्याची मनीषा निर्माण करण्याचा प्रयत्न होय ! – ख्रिस्टोफ जॅफरलॉट, राजकीय विश्लेषक, फ्रान्स
२. उच्चवर्णीय स्त्रीवादी (फेमिनिस्ट) आणि बहुजन स्त्रीवादी यांच्यात भेद आहे. उच्चवर्णीय स्त्रीवादी या जातीला धरून रहातात. उच्चवर्णीय स्त्रियांनी जातीद्रोही बनले पाहिजे. शाहीनबागमध्ये आंदोलन करणार्या मुसलमान स्त्रिया या दडपल्या गेलेल्या समाजाच्या खर्या तारणहार होत्या. – मीना कंडासामी, लेखिका, तमिळनाडू
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेतील हिंदुद्वेष्टे वक्ते !
‘जागतिक हिंदुत्व काय आहे ?’ या प्रथम सत्रात सहभागी वक्ते !
प्रा. ज्ञानप्रकाश (जे.एन्.यू.चे माजी विद्यार्थी आणि अमेरिकेतील न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन विद्यापिठात इतिहासाचे प्राध्यापक), थॉमस हसन (अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापिठातील प्राध्यापक), ख्रिस्टोफ जॅफरलॉट (फ्रेंच राजकीय विश्लेषक आणि भारत-पाक यांच्या संबंधाचे अभ्यासक), मीना कंडासामी (तमिळनाडू येथील लेखिका आणि कार्यकर्ती) आणि आनंद पटवर्धन (सामाजिक विषयांवरील लघुपट निर्माते)
‘हिंदुत्वाचे राजकीय अर्थकारण’ या दुसर्या सत्रात सहभागी वक्ते !
श्रीमती राव (वॉरसेस्टर (मॅसेच्युसेट्स, अमेरिका) येथील ॲसम्पशन कॉलेजच्या प्राध्यापिका), जेन्स लिर्चे (लंडन येथील विद्यापिठातील कामगार अभ्यासक), प्रीतम सिंह (‘ऑक्सफर्ड बूक बिझनेस स्कूल’चे प्राध्यापक), वामसी वाकुलभारनम् (‘युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेच्युसेट्स’, अमेरिका येथील अर्थविषयक प्राध्यापक)
‘जाती आणि हिंदुत्व’ या तिसर्या सत्रात सहभागी वक्ते !
रूपा विश्वनाथन् (जर्मनीच्या गटिंगन् विद्यापिठातील ‘आधुनिक भारताचा अभ्यास’ या विषयाच्या प्राध्यापिका), गजेंद्र अय्याथुराई (जर्मनीच्या ‘मॉडर्न इंडियन स्टडीज’ या विषयावरील संशोधक), मीना धांडा (दलित कार्यकर्ती आणि इंग्लड येथील विद्यापिठातील प्राध्यापिका)
४० विद्यापिठांचे समर्थन प्राप्त असल्याचा दावा खोटा !
या परिषदेला ४० विद्यापिठांचे समर्थन असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात त्या विद्यापिठांतील पूर्ण विभाग नव्हे, तर त्यातील एखादा शिक्षकच सहभागी झाला असल्याचे लक्षात आले. आयोजकांनी संपूर्ण विद्यापिठेच सहभागी असल्याचा केलेला दावा म्हणजे लोकांची शुद्ध दिशाभूल असल्याचे लक्षात आले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विरोधात निराधार आरोप करणारे व्हिडिओ प्रसारित !
या कार्यक्रमात लघुपटनिर्माते आणि साम्यवादी आनंद पटवर्धन यांनी त्यांच्या भाषणाच्या आरंभी आणि शेवटी ‘विवेक’ नावाच्या ध्वनीचित्रफितीचे काही मिनिटांचे दोन भाग दाखवले. पहिल्या भागात पुरोगाम्यांच्या हत्या, अंनिसचे माजी प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी धर्माविषयी केलेली गरळओक आदी चित्रण दाखवण्यात आले, तर दुसर्या भागात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसह अन्य संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी काढलेल्या स्वरक्षणाची प्रात्यक्षिके असलेल्या दिंडीचे छायाचित्रण दाखवण्यात आले.