Menu Close

पाकिस्तानने तालिबान्यांचा वापर करून काश्मीरमध्ये आक्रमण केल्यास भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

‘तालिबान : भारतासमोरील नवी आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

नरेंद्र सुर्वे

पुणे – अफगाणिस्तानातील सत्तापालटाच्या मागे पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. अफगाणिस्तानात लढणार्‍या ५० ते ६० सहस्र तालिबान्यांचे ३०-४० सहस्र पाकिस्तानी सैन्य आणि सैन्याधिकारी नेतृत्व करत आहेत. त्यांना युद्धनीती, तसेच युद्धाचे नियोजन कसे करायचे ? याविषयी मार्गदर्शन करत आहे. तालिबानसमोर बलाढ्य अमेरिका, तसेच ३ लाख अफगाणिस्तानी सैन्य यांना माघार घ्यावी लागल्यामुळे त्यांचे धाडस वाढले आहे. त्यामुळे पाकिस्तान या तालिबान्यांचा वापर काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांसाठी करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतीय सैन्याकडून याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. यापूर्वी ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ (जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेला पाकिस्तानने दिलेले सांकेतिक नाव) आणि अन्य युद्धांच्या वेळी पाकिस्तानने पठाण अन् पख्तून यांच्या १५-२० सहस्र कडवट आतंकवादी टोळ्यांच्या साहाय्याने भारतावर आक्रमण केले, त्या

वेळी भारतीय सैन्याने सहस्रो आतंकवाद्यांना मारून त्यांना पिटाळून लावले होते. त्यामुळे पाकिस्तानने तालिबान्यांचा वापर करून काश्मीरमध्ये आक्रमण केल्यास भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तालिबान : भारतासमोरील नवी आव्हाने !’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादात बोलत होते.

या परिसंवादात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि ‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय महासचिव श्री. अनिल धीर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा १३ सहस्र जणांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री नरेंद्र सुर्वे आणि मिलिंद धर्माधिकारी यांनी केले.

श्री. मिलिंद धर्माधिकारी

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याने होऊ शकणार्‍या धर्मयुद्धात भारताचा विजय निश्‍चित ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. अमेरिकेसारख्या ‘सुपर पॉवर’ला (महासत्तेला) हरवले, हे तालिबानच्या डोक्यात आहे आणि हेच तिसर्‍या महायुद्धाचे कारण होऊ शकते. त्यातून निर्णायक धर्मयुद्ध होईल. त्यामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा वापर करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढा द्यावा लागणार आहे. सहस्रो वर्षांच्या जिहादी आणि धर्मांध आक्रमणांनंतर आजही भारत स्वतंत्र आहे. युद्ध हे भारतियांच्या रक्तामध्ये आणि अनुवांशिकतेमध्ये आहे. भूमीवरचे युद्ध लढण्याची क्षमता प्रत्येक भारतियामध्ये आहे. धर्माच्या निर्णायक युद्धात धर्माचा, म्हणजेच भारताचा विजय निश्‍चित आहे.

२. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांची अमानवी कृत्ये पाहिल्यावरही संयुक्त राष्ट्रे गप्प आहेत. ती काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना हाकलून दिल्यावरही गप्प राहिली. संयुक्त राष्ट्रे ही विश्‍वाच्या दृष्टीने कुचकामी ठरत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या बनावटी (खोट्या) चेहर्‍याची आपल्या देशासह अन्य कोणत्याही देशाला आवश्यकता नाही, अशी स्थिती येत्या ३-४ वर्षांत निर्माण होईल. आज भारतात अनेक ठिकाणी ‘मिनी पाकिस्ताने’ (छोटी पाकिस्ताने) निर्माण झाल्यामुळे हिंदूंना प्रतिदिन पलायन करावे लागत आहे. या परिस्थितीत तालिबानमुळे भारतासमोर निर्माण झालेल्या संकटाला आता सर्वच हिंदूंनी एकत्र येऊन तोंड द्यायला हवे.

३. भारतातील अनेक मुल्ला, मौलवी आणि मुसलमान पत्रकार ‘भारतात शरीयत न्यायालय हवे’, असे म्हणतात. यातून ‘ते राज्यघटनेवर विश्‍वास ठेवत नाहीत’, हे दिसून येते. भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पुरोगामी विचारांचे नेते, बुद्धीवादी यांना भोगवादी प्रवृत्तींना प्रोत्साहन देणारा ‘शरीयत’ पाहिजे; परंतु अन्याय, अत्याचार, गुन्हे, चोरी, बलात्कार केल्यानंतर शिक्षा देणारा ‘शरीयत’ नको, तर त्या वेळी भारतीय राज्यघटना हवी असते. भारतातील छुपे तालिबानी पाकच्या समर्थनार्थ उभे रहातात.

४. भारतीय सैन्यदलाचे कॅप्टन धिल्लोन यांनी ‘जो कोणता गाझी (काफिरांच्या विरोधातील युद्धात सहभागी होणारा ‘बहाद्दूर’) भारतात प्रवेश करील, तो जिवंत परत जाणार नाही’, या शब्दांत प्रत्येक देशप्रेमी भारतियाची भावना बोलून दाखवली आहे.

५. जगभरातील अनेक लोक हिंदु धर्म स्वीकारून साधना करत आनंदाने जीवन जगत आहेत. त्यामुळे धर्मांतर करणार्‍यांना त्यांचा जनाधार संपत असल्याची चिंता आहे. जगासमोर सनातन हिंदु धर्म हाच एक पर्याय दिसून येत आहे. हा जागतिक लोकशाहीचा, विचारांचा आणि प्रक्रियेचा मोठा पराभवच आहे. मानवी हक्क आणि खोटा धर्मनिरपेक्षतावाद संपण्याच्या वाटेवर आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मांडलेली अन्य सूत्रे

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. भारताला तालिबानपासून लहान, मध्यम आणि दीर्घ असे ३ प्रकारचे धोके दिसून येत आहेत. अफगाणिस्तानमधून भारतियांना बाहेर काढणे, हा भारतासाठी छोट्या प्रमाणातील धोका आहे. पाकिस्तानचे सैनिक अफगाणिस्तानमध्ये फिरून हिंदू आणि शीख यांना शोधण्याचे कार्य करत आहेत. त्यामुळे एकेकाळी ४ ते ५ लाख हिंदूंची लोकसंख्या असणार्‍या अफगाणिस्तानात आता केवळ ४ सहस्र इतकेच हिंदू शेष राहिले आहेत. भारताला असलेला मध्यम धोका म्हणजे पाकिस्तानचे ३० ते ४० सहस्र सक्रीय सैनिक देशात घुसवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. दीर्घकालीन धोका म्हणजे भारताने अफगाणिस्तानमध्ये केलेली अनुमाने ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक ! भारताने अफगाणिस्तानमध्ये धरणे, रस्ते, संसदेची इमारत आदी विकासकामांमध्ये गुंतवणूक केली आहे. काही विकासकामे ८० ते ९० टक्के पूर्ण झाली आहेत; मात्र ती आता नष्ट केली जात आहेत. यातून भारताला आर्थिक हानी होणार आहे.

२. तालिबानी भारताला अपकीर्त करत असल्याने भारताचे कझाकिस्तान, उजबेकिस्तान, किर्गिजस्तान यांच्यासह असलेले संबंध सुधारण्याचे कार्य चालू रहाणे शक्य होणार नाही.

३. अफगाणी जनतेत भारताविषयी ‘सॉफ्ट कॉर्नर’ आहे; कारण आपली गुंतवणूक ही माणसाच्या रूपातील आहे. त्याला आपण ‘सॉफ्ट पॉवर’ (कोणत्याही दबावाविना दुसर्‍याला आकर्षित करण्याची क्षमता) म्हणतो. ‘सॉफ्ट पॉवर’ ही ‘हार्ड पॉवर’पेक्षा (लष्कर आणि पैसा यांपेक्षा) अधिक चांगली आहे.

४. चीन अफगाणिस्तानमध्ये जेवढा गुंतेल, तेवढा तो फसण्याची शक्यता अधिक आहे. त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.

५. केवळ हवाई लढाई करणारे अमेरिकी सैन्य आणि शस्त्रे खाली ठेवणारे अफगाणिस्तानी सैन्य यांप्रमाणे भारताचे सैन्य नाही. अमेरिकेतील सैन्याने जेव्हा भूमीवरील युद्ध केले, तेव्हा त्यांचा पराभव झाला आहे; मात्र आपण इतिहासात अनेक वर्षे अफगाणबरोबर भूमीवरील युद्ध केलेले आहे.

तालिबान्यांच्या संदर्भात इस्लामी देश, संघटना आणि धर्मनिरपेक्षतावादी यांची भूमिका ढोंगीपणाची ! – अनिल धीर, राष्ट्रीय महासचिव, भारत रक्षा मंच, ओडिशा

श्री. अनिल धीर

१. फ्रान्स आणि इस्रायल यांनी मुसलमानांवर अत्याचार केल्याचा आरोप करत जगभरातील धर्मांध त्यांच्या निषेधासाठी हिंसक मोर्चे काढतात; मात्र अफगाणिस्तानात तालिबानी आतंकवादी मुसलमानांना निर्दयपणे मारत असतांना हे सर्वजण गप्प का ? अगदी क्षुल्लक घटनांवरून किंवा वक्तव्यावरून दंगली करणारे धर्मांध आणि धर्मनिरपेक्षतावादी आता कुठे आहेत ? हे सर्व मूग गिळून गप्प आहेत. यावरून इस्लामी देश, संघटना आणि धर्मनिरपेक्षतावादी यांची भूमिका दुटप्पी अन् ढोंगीपणाची असल्याचे लक्षात येते. ही दुहेरी नीती घातक आहे. यासाठी कायदा करून त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले पाहिजेत.

२. संयुक्त राष्ट्रे मानवी हक्कांची चर्चा केवळ काश्मीरविषयी आणि भारतामध्येच करतांना दिसतात; पण तालिबानचा विषय आला की गप्प बसतात. त्यामुळे त्यांचीही भूमिका संशयास्पद आहे.

३. भारताच्या शेजारील देश हुकूमशाही आणि धर्मांधांचे आहेत, तर भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. तालिबान संदर्भातील भूमिकेवरून पाक आणि चीन खूश असले, तरी उद्या ते अडचणीत आल्याविना रहाणार नाहीत.

४. आताच्या परिस्थितीत सर्वांनी एकजुटीने रहाणे महत्त्वाचे आहे. अफगाणिस्तानातील भयावह परिस्थितीत भारताने शेजारील राष्ट्रांना साहाय्यच केले आहे. भारतात ३३ देशांचे शरणार्थी रहात असून त्यांना भारताने परत पाठवलेले नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *