हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड !
वाईटातून चांगले घडते’ याचे सध्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन’ करण्याच्या समान उद्देशाने प्रेरित होऊन एकत्र आलेल्या जगभरातील निधर्मी, उदारमतवादी, समाजवादी ‘विद्वान’ यांची परिषद ! १० ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत पार पडलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ नावाच्या या परिषदेत या विद्वानांनी हिंदु धर्माच्या संदर्भात असलेल्या त्यांच्या विद्वत्तेचे जगाला दर्शन घडवले. जगातील बहुतेक देशांमध्ये हिंदु समाज हा तेथील अल्पसंख्यांकांमधील अल्पसंख्य आहे, तिथे हे उपटसुंभ हिंदुत्वाच्या ‘जागतिक’ स्वरूपाची धास्ती वाटून त्याच्या उच्चाटनाप्रीत्यर्थ पुढे सरसावले. यातून त्यांच्या ज्ञानाचा स्तर काय आहे, हे आधीच लक्षात आले होते. असो.
हिंदुद्वेष्ट्यांकडून कौतुक !
या परिषदेत विद्वानांनी ‘हिंदु धर्म आणि त्याचे समर्थक हे जगातील सर्वाेत्तम लोक आहेत’, हे अप्रत्यक्षरित्या का असेना स्पष्ट करून सांगितले. परिषदेच्या दुसर्या दिवशी म्हणजे ११ सप्टेंबरला डॉ. बानू सुब्रह्मण्यम् यांनी त्यांच्या संबोधनामध्ये म्हटले, ‘‘जिथे ख्रिस्ती मूलतत्त्ववादी हे विज्ञानाला विरोध करतात, तिथे हिंदु राष्ट्रवादी मात्र विज्ञानाचा पुरस्कार करतात. हिंदु धर्म आणि विज्ञान, पुरोगामित्व अन् पुराणमतवाद, पूर्व आणि पश्चिमी तत्त्वज्ञान यांची सांगड घालून हिंदू हे एक भयावह षड्यंत्र रचत आहेत.’’ हे वक्तव्य ऐकल्यावर ‘हसावे कि रडावे’, हे समजत नाही. आजच्या युगात प्रत्येक विचारसरणीतील सकारात्मक गोष्टी स्वीकारण्याला ‘पुढारलेपणा’ म्हटले जाते. त्यामध्ये हिंदू सर्वांच्या पुढे आहेत, हे हिंदुत्वाचे टीकाकार स्वीकारत आहेत. आज जगभरात हिंदु धर्म, हिंदूंचे तत्त्वज्ञान आणि धर्मग्रंथ यांची स्वीकारार्हता वाढत चालली आहे, हे समूजन घेण्याची आवश्यकता आहे. सहस्रावधी लोक आज हिंदु धर्मानुसार आचरण करत आहेत. सदर विद्वानाला त्याचेच भय वाटत आहे आणि त्यामुळे तो हिंदूंच्या भूमिकेकडे शंकेखोरपणे पहात आहे. आज अनेक हिंदू हे अज्ञानापोटी हिंदु धर्मावर टीका करतात आणि पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानतात. त्यांनीही या विद्वानाचे बोलणे समजून घ्यायला हवे आणि स्वधर्माचे श्रेष्ठत्व अनुभवण्यासाठी योग्य पद्धतीने त्याचा अभ्यास करायला हवा. ‘अन्यांकडून काय घ्यावे आणि कशाकडे दुर्लक्ष करावे’, हा विवेक साधना अन् धर्माचरण यांतून हिंदूंमध्ये निर्माण होतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
वैचारिक गोंधळ !
या परिषदेमध्ये प्रामुख्याने ब्राह्मणांचे वर्चस्व, आर्य-द्रविड संघर्ष, आर्य आक्रमण सिद्धांत यांसारख्या कपोलकल्पित संकल्पनांवर चर्चा करण्यात आली. ‘हिंदुत्व हे उच्चवर्णीय हिंदूंकडून चालवण्यात आलेले षड्यंत्र आहे’, असा जावईशोध लावण्यात आला. तसेच परिषदेच्या घोषणेपासून त्याचे आयोजक आणि पुरस्कर्ते हे वारंवार सांगत होते की, त्यांचा हिंदु धर्माला विरोध नसून त्याचा राजकीय वापर करण्यासाठी चालू असलेल्या ‘हिंदुत्व’ नावाच्या ‘षड्यंत्रा’ला विरोध आहे. मूलत: या सर्व हिंदु विरोधकांचा इतिहास पाहिला, तर त्यांनी हिंदु धर्माचे गोडवे कधीच गायलेले नाहीत. उलट येनकेन प्रकारेण हिंदु धर्म आणि त्यांचे अनुयायी यांच्या विरोधात बिनबुडाचे आरोप करण्यात त्यांची एकमेकांमध्ये स्पर्धा राहिलेली आहे. त्यामुळे ‘हिंदु धर्माला विरोध नाही’, असे म्हणणे म्हणजे ‘शुद्ध’ लोणकढी थाप आहे. अर्थात् परिषदेतील काही वक्त्यांनी बोलण्याच्या ओघात ही थाप असल्याचे व्यासपिठावरून सांगूनही टाकले. आकांक्षा मेहता नावाच्या कुणा वक्त्याने म्हटले, ‘हिंदुत्व आणि हिंदु धर्म हे वेगवेगळे असणे, असे समजणे भयानक आहे. त्याने आपल्याला अपेक्षित असे भविष्य निर्माण होऊ शकणार नाही. ते दोन्ही एकच आहेत.’ यातून या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन हे हिंदुत्वाचे उच्चाटन नव्हे, तर हिंदु धर्माचा किंबहुना हिंदूंचा द्वेष करण्यासाठी होते, हे लक्षात येते. या सगळ्या वैचारिक गोंधळात भाजपचे नेते आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ कपिल मिश्रा यांनी ‘हिंदुत्व म्हणजे काय ?’ यावर अत्यंत चपखलपणे प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात, ‘‘हिंदुत्वाची चव शबरीच्या उष्ट्या बोरांमध्ये आहे. हिंदुत्व म्हणजे प्रभु श्रीरामाची मर्यादा, सीतेची तपश्चर्या, हनुमानाची भक्ती, लक्ष्मणची शक्ती आणि राजा दशरथचे वचन ! हिंदुत्व सत्य आणि सनातन विज्ञान आहे. जितके खोल जाल, तेथे हिंदुत्वाचीच ओळख होईल. जितके उंच जाल, हिंदुत्वालाच जोडले जाल !’’ अर्थात् पूर्वग्रहाने पछाडलेल्या या दिशाहीन वैचारिक आतंकवाद्यांना हे कोण सांगील ? थोडक्यात या परिषदेच्या वैचारिक गोंधळातून सर्व ‘विवेकवादी’ विद्वानांची बौद्धिक दिवाळखोरी चव्हाट्यावर येत त्यांचे वैचारिक उच्चाटन झाले.
दुसरीकडे आज कोट्यवधी हिंदू हे धर्मशिक्षणाच्या अभावी वैचारिक गोंधळात वावरत आहेत. अशांपैकी काठावर असलेले हिंदू हे या हिंदुद्वेष्ट्यांच्या विखारी प्रचाराला बळी पडतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंदूंना धर्मशिक्षण देणे क्रमप्राप्त आहे. सदर परिषदेचा विरोध करण्यासाठी जागतिक स्तरावरून अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाच-पन्नास कार्यक्रम घेऊन जागृती करण्याचा प्रयत्न केला. यातून हिंदुत्वनिष्ठांना त्यांच्या बळाचे आणि संघटनाचे महत्त्व अन् व्यापकता लक्षात आली. आधुनिक काळात ‘धर्माच्या रक्षणा’करिता एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंचे ‘ग्लोबल’ एकत्रीकरण प्रथमच पहायला मिळाले, ही जमेची बाजू आहे. यातून आलेला समान अनुभव हिंदूंना प्रेरणा देत रहाणार. त्यामुळे ही परिषद म्हणजे हिंदूंसाठी एकप्रकारे वरदानच (‘ब्लेसिंग इन डिसगाइस’) सिद्ध झाली आहे. हिंदुद्वेष्ट्यांनी हिंदूंच्या विरोधात गरळओक केल्यानंतर हिंदूसंघटन अधिक बळकट होण्यासाठी आता हिंदुत्वनिष्ठांनी कंबर कसणे आवश्यक आहे. हिंदूंनो, आपले पद, पक्ष, संप्रदाय, संघटना आदींच्या बिरुदावल्या बाजूला सारत हिंदूसंघटनाची व्याप्ती वृद्धींगत करूया आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध होऊया !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात