सध्या गणेशोत्सव चालू आहे. हिंदु धर्मशास्त्रात श्री गणेशमूर्ती दीड दिवस ठेवावी, असे सांगितले आहे. काही जण या धर्मशास्त्राचा अवलंब करतात; पण अनेक हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ‘श्री गणेशमूर्ती दीड दिवसच ठेवावी’, यावरच अनेकांचा आक्षेप असतो. एका कुटुंबात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यावर एका हिंदूने म्हटले, ‘‘तुम्हाला गणपति नको, म्हणून तुम्ही त्याला दीड दिवसातच घरातून घालवले.’’ अर्थात् श्री गणेशाचे घरी आगमन होणे, त्याची यथासांग पूजा करणे, त्याच्या सहवासात कुणाला बरे आवडणार नाही ? उलट गणेशोत्सव तर सर्वांना हवाहवासा वाटतो. श्री गणेशाचे अस्तित्व आणि मूर्तीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य यांमुळे घरातील स्पंदनेच पालटून जातात. तो दीड दिवसाचा कालावधी वर्षभरातील उरलेल्या दिवसांपेक्षा पुष्कळ वेगळा आणि आनंददायी असतो. त्यामुळेच तो आनंद वर्षभर पुरतो आणि विसर्जनाच्या वेळी आपसूकच म्हटले जाते, ‘गणपतिबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !’ अर्थात् ज्यांना हिंदु धर्मशास्त्र, साधना, अध्यात्म हे ठाऊक आहे, त्यांनाच हे सर्व समजू शकते. ‘गणपतीला घालवले’, अशी भाषा करणार्यांना हे सर्व कसे सांगणार ? यामुळेच धर्मशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते.
आणखीन एक उदाहरण म्हणजे एका गावात गणेशोत्सवाच्या पूर्वी एका व्यक्तीचे निधन झाले होते. त्या व्यक्तीच्या घरी ५ दिवस श्री गणेशमूर्ती ठेवण्यात यायची. असे असतांनाही त्याचा मृत्यू झाल्याने त्याच गावातील एका तरुणाने स्वतःच्या घरी बसवण्यात येणारा ५ दिवसांचा गणपति दीड दिवसाचा केला. याचे कारण त्याला विचारले असता तो म्हणाला, ‘‘ती व्यक्तीही ५ दिवसाचा गणपति बसवायची; पण तरीही तिचा मृत्यू झाला. मग मीही ५ दिवसांचा गणपति बसवला, तर आमच्या घरीही अनर्थ ओढावू शकतो. त्यामुळे मीही आता दीड दिवसाचाच गणपति बसवणार आहे.’’ एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचा आणि गणपति यांचा काय संबंध ? असो. या सर्व घटना पाहिल्यास समाजाला धर्मशिक्षण नसल्यामुळे कोणत्याही कृतीचा कशाशीही संबंध जोडून धर्माला कलंकित करायचे, असेच होत आहे. देवता मनुष्य नसल्यामुळे त्या कुणाला त्रास देत नाहीत. अर्थात् हे सर्व समजण्यासाठी आणि समाजव्यवस्था उत्तम रहाण्यासाठी धर्माचरण आवश्यक आहे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यास सण उत्सवांविषयीच्या अयोग्य संकल्पना दूर होऊन त्यांच्याकडून धर्माचरण सहज होईल !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात