बेंगळुरू : मालदीवचे १२ जणांचे एक कुटुंब इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना झाल्याचे उघड झाले आहे. भारत-अमेरिकेच्या संयुक्त अन्वेषण पथकाला मालदीवच्या या कुटुंबाला रोखणे शक्य झाले नाही. या संयुक्त पथकाने राबवलेली मोहीम हे कुटुंब भारतातून निसटल्याचे लक्षात येताच मागे घेण्यात आली आहे.
इराक किंवा सिरिया या देशांमध्ये जाण्यापूर्वी या कुटुंबाने त्यांचे भ्रमणभाष फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कुटुंबातील एक व्यक्ती अब्दुल्ला मुबारक हा वैमानिक असून इसिसकडून त्याचा अमेरिकेतील ९/११ सारख्या आक्रमणासाठी वापर केला जाण्याची शक्यता आहे. मालदीवचे हे कुटुंब ३ डिसेंबर या दिवशी आजारपणाच्या नावाखाली व्हिसा मिळवून भारतात आले. भारतातून इस्तंबूलला प्रयाण करण्यापूर्वी त्यांनी भारतात १० दिवस घालवल्याचे समजते. मालदीव हे आतंकवादाचे आश्रयस्थान झाले आहे. या देशातील अंदाजे १५० नागरिक इसिसमध्ये भरती झाले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात