Menu Close

अफगाणींना खरे साहाय्य !

अफगाणिस्तानमधील तालिबानची सत्ता उखडून फेकणे, हीच खरी मानवता असेल !

प्रतिकात्मक छायाचित्र

जगात मानवता शिल्लक आहे. त्यामुळे ‘काही प्रमाणात तरी या जगाचे गाडे नीट चालू आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये; मात्र या मानवतेचा अपलाभ घेणार्‍यांची संख्याही या जगात अल्प नाही. तालिबान्यांनी अफगानणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यावर लक्षावधी अफगाणी नागरिक देश सोडून शेजारी देशांमध्ये पळून जात आहेत. त्यामुळे शेजारील पाकिस्तान, इराण, ताजिकीस्तान आदी देश याविषयी चिंताग्रस्त आहेत. तुर्कस्तानची सीमा थेट अफगाणिस्ताला लागलेली नसली, तरी त्याने अफगाणींना त्यांच्या देशात येण्यापासून रोखण्यासाठी सीमेवर शेकडो किलोमीटरची भिंत बांधली आहे. एकीकडे ही स्थिती असतांना दुसरीकडे तालिबानने नियंत्रण मिळवल्यापासून अफगाणिस्तानमधील सर्वच यंत्रणा आणि व्यवस्था ठप्प झाली आहे. ती पुन्हा सुरळीत होण्यासाठी जनतेमध्ये विश्वास निर्माण करून त्यांच्यामधील भीतीची भावना नष्ट करणे आवश्यक आहे. तशी करण्याचा प्रयत्न तालिबानकडून केला जात नाही. उलट शरीयतनुसार कारभार चालवतांना जनतेवर अन्याय आणि अत्याचार करण्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. महिलांवर पुन्हा एकदा इस्लामी कायद्यानुसार वागण्यासाठी बंधन घालण्यात आले आहे. काही महिलांनी या सर्व गोष्टींचा रस्त्यावर उतरून विरोधही केला; मात्र हा विरोध लाठीमार आणि हवेत गोळीबार करून चिरडण्यात आला. तसेच नंतर लगेचच तालिबानने देशात कोणतेही आंदोलन करण्यावर बंदी घातली. राज्यकर्त्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार ज्या देशात हिरावून घेतला जातो, त्या देशात सुज्ञ माणसाने न रहाणेच योग्य ठरते; कारण तेथे प्रजेला कोणतेही अधिकार रहात नाहीत. तेथे पूर्णपणे हुकूमशाही निर्माण होते आणि तीच तालिबान्यांकडून दिसत आहे. ‘तालिबानी पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. त्यांच्यात पालट झालेला आहे’, अशी तालिबानप्रेमींकडून त्यांची वकिली केली जात आहे; मात्र प्रत्यक्ष चित्र उलट आहे, हे जगाला लक्षात आलेले आहे. तरीही अमेरिका आणि जगातील काही देश यांनी अफगाणिस्तानला सहस्रो कोटी रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. संयुक्त राष्ट्रांमध्येच काही देशांनी अफगाणिस्तानमधील जनतेच्या साहाय्यासाठी ८ सहस्र कोटी रुपये देण्याचे घोषितही केले.

आसुरी तालिबान्यांची चांदी

तालिबानसारख्या आसुरी वृत्तीचे सरकार अफगाणिस्तानमध्ये आलेले असतांनाही अशा प्रकारचे साहाय्य करण्याचा विचार होतो, हे नवलच म्हणावे लागले. त्यात तालिबान सरकारकडे हे पैसे पोचवण्यात आल्यावर त्याचा योग्य विनियोग होईल, यावर विश्वास ठेवला जाणे, हे त्याहून मोठे नवल ठरावे. विशेष म्हणजे अमेरिका आणि चीन हे देशही साहाय्य करणार आहेत. आता प्रश्न आहे की, हे पैसे अफगाणी नागरिकांपर्यंत विविध योजनांद्वारे कसे काय पोचले जाणार ? कारण सध्या तरी तेथे कोणतीही प्रशासकीय यंत्रणा तालिबानच्या भीतीमुळे कार्यरत नाही. पोलीस, प्रशासन कुठेच अस्तित्वात नाही, असे असतांना या पैशांचा वापर कसा केला जाणार ? हाच मुख्य प्रश्न आहे. तालिबान्यांनी म्हटले, ‘आम्ही या पैशाचा योग्य विनियोग करू.’ तालिबान सरकारमधील प्रत्येक मंत्री हा मोठा आतंकवादी आहे. काही जणांनी मदरशांमधून मिळालेल्या शिक्षणाच्या व्यतीरिक्त अन्यत्र कुठेही शिक्षण घेतलेले नाही, तर काही जण पूर्णपणे निरक्षर आहेत. अशा तालिबान्यांना दिलेले हे पैसे योग्य कारणासाठी खर्च होतील, असा विश्वास ठेवणे म्हणजे अट्टल चोराच्या ‘तो चोरी करणार नाही’, या वक्तव्यावर विश्वास ठेवण्यासारखे आहे. सध्या तालिबानच्या नेत्यांमध्ये अंतर्गत गटबाजी चालू झाली आहे. या गटबाजीतून हिंसाचार झाल्याचेही सांगितले जात आहे. उपपंतप्रधान बरादर याच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. हे पहाता अफगाणिस्तानमध्ये किती दिवस सरकार टिकेल आणि किती दिवस कारभार चालेल, हा प्रश्न आहे. त्यामुळे ८ सहस्र कोटी रुपयांचे पुढे काय होणार ? हा प्रश्नच आहे. भारताने किंवा अन्य काही देशांनी अफगाणी नागरिकांसाठी साहाय्य करण्याचे घोषित केलेले नाही. तालिबानची पहिली राजवट अमेरिकेने उखडून टाकल्यानंतर  तेथे विकासकामांमध्ये भारताने मोठे योगदान दिले आहे. एक मोठे धरण बांधण्यासह अफगाणिस्तानची संसद भारतानेच बांधून दिली. अन्यही विकासकामे केली आहेत. त्यामुळे भारताने अफगाणी नागरिकांना साहाय्य करावे, अशी अपेक्षा असणारच आहे; मात्र भारत तालिबानवर विश्वास ठेवण्याची चूक कदापि करणार नाही.

तालिबानला नष्ट करणे, हेच मोठे साहाय्य !

प्रतिकात्मक छायाचित्र

या स्थितीत निरपराध अफगाणी नागरिकांना साहाय्यही करणे आवश्यक आहे. तालिबानच्या राजवटीमुळे काही देश वगळता अद्याप जगाने त्यांच्याशी राजनैतिक संबंध आणि व्यापार चालू ठेवण्याविषयी विधान केलेले नाही. कोणत्याही राष्ट्राची अर्थव्यवस्था ही जागतिक व्यापारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. सध्या अफगाणिस्तानमध्ये सर्वच गोष्टी ठप्प असल्याने अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे तेथे बेरोजगारीसह महागाई वाढणार आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी तालिबानी सरकार कसे वागते, हे जगाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे. मानवतेच्या नात्याने जगाने साहाय्य करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला मर्यादाच असणार आहेत; कारण जे काही साहाय्य केले जाईल, ते तालिबानी सरकारच्या हातात जाईल आणि पुढे ते जनतेपर्यंत पोचवण्यात येईल. अफगाणी नागरिकांप्रती खरी मानवता जर जगाला दाखवायची असेल, तर ती अफगाणिस्तानला तालिबानमुक्त देश करणे, हीच असणार आहे. तालिबानच्या जोखडातून मुक्त करून अफगाणी नागरिक स्वतंत्र जीवन जगू लागले, तर हे खरे मानवतेचे साहाय्य असेल. यासाठी जगाने एकत्र येऊन कृती करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारे पैसे आणि अन्य साहाय्य देऊन अफगाणी लोकांचे भले होईल, हा अपसमज असेल. हे साहाय्य तालिबानी गिळंकृत करतील, याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे मानवतेसाठी तालिबानला नष्ट करणेच योग्य !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *