Menu Close

संतपिठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मराठवाडा येथे संतपीठ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

संभाजीनगर – मराठवाडा येथे संतपीठ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ सप्टेंबर या दिवशी येथे केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या मार्गदर्शनाखाली हे संतपीठ चालू केले जाणार असून लवकरात लवकर ते मोठे विद्यापीठ व्हावे. या संतपिठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल’, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

१७ सप्टेंबर या दिवशी ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’च्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौर्‍यावर होते. या वेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्याचे वेगळेपण आहे. संतपिठात संतांची शिकवण दिली जाईल. संतांची शिकवण म्हणजे काय ? आम्ही कुणावर अन्याय-अत्याचार करत नाही; पण जर कुणी आमच्यावर अत्याचार केला, तर त्याचा प्रतिकार कसा करायचा ?, याची शिकवण आपल्याला संतांनी दिली आहे. यासाठी एक संतपीठ येथे चालू करत आहोत. जगातील अभ्यासक येथे अभ्यास करण्यासाठी यायला हवेत.

निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार !

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मराठवाडा येथे शाळांच्या रूपात निजामशाहीच्या काही खुणा अद्यापही शेष आहेत. ही काही वैभवशाली परंपरा नाही. यासाठी आम्ही येथील अनुमाने १५० शाळांचा पुनर्विकास करत आहोत. मराठवाडा जगाला देऊ शकतो, अशा काही गोष्टी आज येथे चालू करत आहोत. या शाळांचे नवीन रूप पाहून अभिमान वाटला पाहिजे, अशा पद्धतीने त्या शाळा आम्ही सिद्ध करणार आहोत.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याची घोषणा !

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सध्या आरोग्याचे सूत्र महत्त्वाचे असल्याने परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सरकार चालू करणार आहे.

पोलिसांनी ‘एम्.आय.एम्.’ पक्षाच्या तिघांना कह्यात घेतले !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १७ सप्टेंबर या दिवशी सकाळी ८.२५ वाजता मुंबई येथून विमानाने संभाजीनगर येथे आले. या वेळी संभाजीनगर विमानतळाबाहेर आंदोलन करणार्‍या ‘एम्.आय.एम्.’ पक्षाचे २ नगरसेवक आणि पदाधिकारी यांना पोलिसांनी कह्यात घेतले. ‘एम्.आय.एम्.’कडून उद्धव ठाकरे यांचे उपहासात्मक पद्धतीने स्वागत करण्यात येणार होते. त्यास पोलिसांनी मनाई केली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *