श्री गणेशचतुर्थीला गणरायाचे आगमन झाले आणि अनंतचतुदर्शीला सर्वच गणरांयाचे विसर्जन झाले. श्री गणेशचतुर्थी येणार म्हटल्यावर दरवर्षी गणरायाच्या आगमनाची वाट तेवढ्याच आतुरतेने पाहिली जाते. त्यामुळेच ‘गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’, असे म्हटले जाते. हिंदूंना श्री गणेश देवतेविषयी विशेष प्रेम आणि जवळीक आहे. गणेशोत्सव येणार म्हटल्यावरच सर्वांच्या आनंदात वाढ होते. त्यानुसार त्याच्या आगमनाची सिद्धता घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर केली जाते. श्री गणेशाप्रती सर्वांच्या मनात भाव, भक्ती आणि श्रद्धा अवर्णनीय आहे, यात शंका नाही.
असे असले तरी श्री गणेशाविषयी काही विडंबनात्मक लिखाण ‘व्हॉट्सॲप’वरून प्रसारित होतात. या लिखाणाकडे हिंदूंचा बघण्याचा दृष्टीकोन कसा असायला हवा, हे जाणून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. एका लिखाणामध्ये ‘या वयात तुम्ही गणपति बाप्पाकडे कितीही ‘बुद्धी’ मागा, तो तुम्हाला ‘ढेरी’च देणार..आता झोपा..’ अशा प्रकारचे लिखाण लिहून त्या खाली ‘स्मायली’चे (व्हॉट्सॲपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हास्य केलेले कार्टून) चित्र होते. अशा लिखाणाद्वारे गणपतीच्या रूपावरून विनोदात्मक संदेश पाठवून एक प्रकारे श्री गणेशाचे विडंबनच केले आहे. अनेक जण असे लिखाण वाचून सोडून देतात किंवा काहीजण हसतात आणि इतरांनाही पाठवतात. येथे एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे असे विडंबनात्मक लिखाण ‘हिंदूंच हिंदूंना’ पाठवत असतात. आपणच आपल्याच देवतांविषयी असे लिखाण पाठवणे, हे अयोग्य आणि लज्जास्पद आहे. ज्या गणेशाविषयी आपल्या मनामध्ये भाव आहे, असे असतांना त्याच्याविषयी कसलेही हिन दर्जाचे विनोद लिहून ते एकमेकांना पाठवणे लाजिरवाणे आहे. स्वतः विनोद करणे, पाठवणे किंवा कुणीतरी पाठवत असतांना काहीही न करणे या सर्वांनाच या अयोग्य कृतीचे फळ भोगावे लागते. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी देवानेच मनुष्यासाठी कर्माचा सिद्धांत लावलेला आहे. त्यानुसार पूजनीय आणि वंदनीय देवतांच्या विडंबनाचे फळ अधिक त्रासदायक असते, हे लक्षात घ्यायला हवे.
हिंदूंना धर्मशिक्षण न मिळाल्यामुळे अनेक जण देवतांविषयी होत असलेल्या विडंबनाच्या विरोधात बघ्याची भूमिका घेतात. हिंदु धर्मामधील देवता या तत्त्व असून त्यांची भक्ती केल्यास त्यांची कृपा होते आणि आपल्याला त्याचा लाभ होतो. हे लक्षात घेऊन देवतांचे विडंबन थांबवणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्रामध्ये देवतांचे विडंबन करणारा समाज नसेल.
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
दैनिक सनातन प्रभात