१. पाकिस्तानने निर्माण केलेल्या ‘हक्कानी’ या आतंकवादी गटाचा भस्मासुर त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता असणे
‘अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध चालू आहे. सध्या तेथील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तेथे अतिशय वेगाने विविध घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. हक्कानी हा पाकिस्तानने निर्माण केलेला आतंकवादी गट असून त्याचे राज्य काबूलमध्ये आहे. त्यांच्यात आणि तालिबानचे दोन क्रमांकाचे नेते मुल्ला बरादार यांच्यात झालेल्या आक्रमणात मुल्ला बरादार हे घायाळ झाले असावेत. त्यामुळे त्यांच्यावर पाकिस्तानच्या रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. त्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘आयएस्आय’ आणि पाकिस्तानचे आर्मी प्रमुख त्यांना साहाय्य करत आहेत. सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे हा भस्मासुर पाकिस्तानने निर्माण केला असून तो पाकिस्तानवरच उलटण्याची शक्यता आहे.
२. हक्कानी आणि पाकिस्तान यांच्यात वाद होण्याची शक्यता !
२ अ. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय ‘डुरंड’ सीमारेषा हक्कानी गटाला अमान्य असणे
माध्यमांतील माहितीप्रमाणे, हक्कानी नेटवर्कला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा असलेली ‘डुरंड’ रेषा मान्य नाही. ग्रेट ब्रिटनला अफगाणिस्तानमध्ये साम्राज्य पसरवायचे होते. त्यामुळे अफगाणिस्तान आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात ३ लढाया झाल्या. १८ व्या शतकात पहिली लढाई झाली, त्यात ब्रिटनचा पराभव झाला होता. दुसरी लढाई वर्ष १८७९ मध्ये झाली, तो गतीरोध होता. त्यानंतर काही वर्षांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (पूर्वीचे) यांच्यात आंतरराष्ट्रीय सीमा ठरवण्यात आली. तिला ‘डुरंड रेषा’ असे म्हटले जाते.
२ आ. पठाणी जमात विभागली जाऊनही त्यांच्यात व्यापार आणि दळणवळण चालू असणे अन् ‘डुरंड’ रेषा ही त्यांच्यासाठी कृत्रिम रेषा ठरणे
ब्रिटीश अधिकारी सर हेनरी डुरंड आणि अफगाणिस्तानचे तत्कालीन आमीर रहमान यांच्यात एक करार झाला. त्याप्रमाणे अफगाणिस्तानमधील पठाण किंवा पश्तुनी जमातीच्या प्रदेशातून ही रेषा आखण्यात आली. त्यामुळे या जमातीचे लोक दोन भागांमध्ये विभागले गेले. दीड ते २ कोटी पठाणी अफगाणिस्तानमध्ये राहिले, तर त्याहून अधिक पाकिस्तानमध्ये गेले. पाकिस्तानमधील त्यांच्या प्रांताला ‘वझारिस्तान’ नावाने ओळखले जाते. त्यांचे एकमेकांशी संबंध आहेत, त्यांच्यात विवाह होतात, व्यापार चालतो, तसेच सतत दळणवळण चालू असते. त्यामुळे त्यांच्यासाठी ‘डुरंड’ रेषा ही कृत्रिम रेषा ठरली आहे. तेथून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली चालू असतात.
२ इ. अफगाणिस्तानमध्ये राज्य प्रस्थापित करता येण्यासाठी हक्कानीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील ‘डुरंड’ रेषा मान्य नसल्याचे सांगणे
हक्कानी म्हणतो की, आता वझारिस्तानमध्ये असलेला डुरंड रेषेच्या बाजूचा भाग अफगाणिस्तानमध्ये समाविष्ट झाला पाहिजे. तालिबानवर ९० टक्के पठाणांचे वर्चस्व आहे. हक्कानी नेटवर्कचा वझारिस्तानमध्ये मोठा प्रभाव आहे. तेथील दीड ते २ कोटी पठाण हक्कानीच्या बाजूने आले, तर हक्कानी हा प्रचंड शक्तीशाली नेता होईल आणि पुढील काळात संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये त्याचेच राज्य येऊ शकेल. त्यामुळे ‘पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील ‘डुरंड’ रेषा आम्हाला मान्य नाही’, असे हक्कानीने सांगणे चालू केले आहे. ‘पाकिस्तानने निर्माण केलेला हा भस्मासुर अर्थात्च त्यांच्यावर उलटणार आहे’, असे दृश्य दिसत आहे.
३. अफगाणिस्तानच्या गृहयुद्धामध्ये पाकिस्तानने थेट तालिबानच्या बाजूने सहभाग घेणे
सध्या अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये तालिबान आणि ‘अफगाणिस्तान रेजिस्टन्स’चा नेता अहमद मसूद यांच्यात लढाई चालू आहे. तेथे पाकिस्तानी सैन्य पोचले आहे. अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी अमेरिकेने जी विमाने, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन मागे सोडली होती, त्यांच्या साहाय्याने पाकिस्तानने पंजशीर खोर्यातील अहमद मसूदच्या ठिकाणांवर आक्रमण केले आहे. त्यामुळे अहमद मसूदची मोठी हानी झाली आहे. या आक्रमणामध्ये अहमद मसूदचा मुख्य प्रवक्ता मारला गेला आहे. अफगाणिस्तानच्या या गृहयुद्धामध्ये पाकिस्तानही थेट सहभागी झाला आहे. एवढेच नाही, तर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह ज्या घरामध्ये रहात होते, ते घरही उद्ध्वस्त करण्यात आले आहे; पण सालेह तेथून आधीच निसटल्यामुळे वाचले आहेत. अहमद मसूदच्या वडिलांना तालिबान किंवा अल् कायदा यांनी एका बॉम्बस्फोटात मारले होते. त्यानंतर २ दिवसांनी म्हणजे ९/११ या दिवशी अमेरिकेच्या जुळ्या मनोर्यांवर आक्रमण झाले होते. पंजशीरमध्ये चालू असलेल्या गृहयुद्धाची नेमकी परिस्थिती येणार्या काळातच समोर येईल; परंतु पाकिस्तानी त्यात अडकले आहेत.
४. भारतासमोरील सुरक्षेच्या नवीन आव्हानांना तोंड देण्यास भारतीय सैन्य सिद्ध असणे
अफगाणिस्तानवर मोठे संकट येत आहे. आज तेथे अन्नधान्याची कमतरता आहे. २० किंवा २५ दिवस पुरेल, एवढेही अन्नधान्य तेथे शेष नाही. त्यामुळे पुढील काळात सामान्य जनतेला जन्म-मृत्यूशी लढावे लागणार आहे. तेथे अराजकता पसरली असून परिस्थिती फारच गंभीर आहे. त्यामुळे आपण अफगाणिस्तानच्या जनतेला केवळ नैतिक पाठिंबा देऊ शकतो. राज्यकारभार न करता तालिबान एकमेकांमध्ये लढण्यातच गुंतले आहे. दुसरीकडे तालिबान काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात साहाय्य करणार आहे. सीमारेषेवर भारताचे ‘ॲन्टी इंफ्रिंटेशन नेटवर्क’ चांगले आहे. त्यामुळे भारत स्वत:चे रक्षण करू शकतो. पाकिस्तानने त्यांची कटली आणि रावळकोट ही हवाई तळे सक्रीय केली आहेत. ती भारताच्या सीमारेषेपासून १०० किलोमीटरच्या आत आहेत. पाकिस्तानला भीती आहे की, जर भारतावर मोठे आक्रमण झाले, तर भारत पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो. त्या प्रतिआक्रमणापासून रक्षण करण्यासाठी पाकिस्तानने सीमेजवळील ही हवाई तळे सक्रीय केली आहेत. त्यामुळे भारतासमोरील सुरक्षेची आव्हाने वाढत आहेत; परंतु भारतीय सैन्य त्यासाठी सिद्ध आहे. मला निश्चिती आहे की, आपण काश्मिरी जनतेचे रक्षण नक्कीच करू शकतो.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
दैनिक सनातन प्रभात