पाकमधील असुरक्षित हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार कधी पुढाकार घेणार ? – संपादक दैनिक सनातन प्रधान
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या पंजाब प्रांतातील रहीमयार खान शहरातील एका मशिदीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या गरीब हिंदु कुटुंबाला धर्मांधांनी मारहाण केली. ‘हिंदूंनी मशिदीचे पावित्र्य भंग केले’, असे धर्मांधांचे म्हणणे आहे. राम भील असे या कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव आहे. ते आणि त्यांचे कुटुंबीय मशिदीजवळील शेतामध्ये काम करत होते. या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही; कारण मारहाण करणारे सत्ताधारी तेहरिक-ए-इंसाफ या पक्षाच्या खासदाराच्या ओळखीचे आहेत. (सत्ताधारी तेहरिक-ए-इंसाफ पक्षाचे सरकार ‘आम्ही हिंदूंसाठी काहीतरी करत आहोत’, हे जागतिक स्तरावर दाखवण्यासाठी मंदिरांची डागडूजी वगैरे करण्याची घोषणा करते; मात्र हा पक्ष हिंदुविरोधी आहे, हे या प्रकरणातून दिसून येते. त्यामुळे ‘पाक सरकार तेथील हिंदूंसाठी काही करत आहे’, असे म्हणणे हास्यास्पद आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रधान) या घटनेविषयी भील समाजाकडून पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.