Menu Close

‘पितृऋण’ फेडण्यासाठी ‘श्राद्ध करणे’ आणि प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी : शंका अन् समाधान’ या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन !

सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव – हिंदु धर्मात ईश्वरप्राप्तीसाठी ‘देवऋण’, ‘ऋषिऋण’, ‘पितृऋण’ आणि ‘समाजऋण’ असे चार प्रकारचे ऋण फेडण्यास सांगितले आहे. यातील ‘पितृऋण’ फेडण्यासाठी पितरांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. ‘श्राद्ध’ करणे, हे पितरांच्या मुक्तीसाठी महत्त्वाचे आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी पितृपक्षात पुरोहितांना बोलावून श्राद्धविधी करावा; मात्र जेथे कोरोनामुळे पुरोहित वा श्राद्धाच्या सामग्रीअभावी श्राद्ध करणे शक्य न झाल्यास आपद्धर्म म्हणून संकल्पपूर्वक आमश्राद्ध, हिरण्यश्राद्ध किंवा गोग्रास अर्पण करावा. तसेच पूर्वजांना पुढील गती मिळावी आणि अतृप्त पूर्वजांचा त्रास होऊ नये, म्हणून नियमितपणे साधना करणेही आवश्यक आहे. यासाठी श्राद्ध विधीला जोडून पितृपक्षात अधिकाधिक वेळ, तसेच अन्य काळात प्रतिदिन किमान १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप सर्वांनी करायला हवा, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी : शंका अन् समाधान’ या विषयावरील विशेष संवादात ते मार्गदर्शन करत होते.

सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले की,

१. हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि हिंदु धर्माला गौण लेखण्याची प्रौढी यांमुळे बर्‍याच वेळा श्राद्धविधी दुर्लक्षिला जातो; पण आजही अनेक पाश्चात्त्य देशांतील सहस्रो लोक भारतातील तीर्थक्षेत्री येऊन पूर्वजांना पुढील गती मिळण्यासाठी श्रद्धेने श्राद्धविधी करतात.

२. ज्यांनी प्रथम श्राद्धविधी केला, ते ‘मनू’, ‘राजा भगीरथ’ यांनी पूर्वजांच्या मुक्तीसाठी केलेली कठोर तपश्चर्या, तसेच त्रेतायुगातील प्रभु श्रीरामाच्या काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही श्राद्धविधी केल्याचे उल्लेख आढळतात. त्यामुळे तथाकथित पुरोगाम्यांच्या श्राद्धाविषयीच्या कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या क्षमतेनुसार पितृऋण फेडण्यासाठी श्रद्धापूर्वक ‘श्राद्धविधी’ करा.

३. श्राद्ध न केल्यास आपले पूर्वज अतृप्त रहातात. त्यामुळे दोष निर्माण होतात. पूर्वजांना मर्त्य लोकांतून पुढे जाण्यासाठी श्राद्ध विधीमुळे ऊर्जा मिळते. मृत्यूनंतरही सद्गतीसाठी श्राद्धविधी सांगणारा हिंदु धर्म हा एकमेवाद्वितीय आहे.

४. सध्या समाजात धर्मशिक्षणाच्या अभावाने ‘श्राद्ध करण्याऐवजी सामाजिक संस्था किंवा अनाथालये यांना देणगी द्या’, अशा चुकीच्या संकल्पनांचा प्रचार केला जातो; मात्र असे करणे अयोग्य आहे. धार्मिक कृती या धर्मशास्त्रानुसारच होणे आवश्यक असते. त्यानुसार कृती केल्यासच पितृऋण फिटते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *