चीनला वठणीवर आणण्यासाठी जागतिक स्तरावर संघटितपणे प्रयत्न होणे आवश्यक !
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. गेल्या काही दिवसांतील जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असून केवळ भारतियांचेच नाही, तर संपूर्ण जगाचे लक्ष पंतप्रधान मोदी यांच्या दौर्याकडे आहे. विशेषत: चीनने या दौर्यात होणार्या ‘क्वाड’ परिषदेची धास्ती घेतल्याचे बोलले जात आहे. ‘क्वाड’ (क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन) या परिषदेत भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौर्यात ‘क्वाड’मध्ये सहभागी देशांच्या प्रतिनिधींची समोरासमोर बैठक होणार आहे. ‘क्वाड’मध्ये सहभागी असलेल्या चारही देशांचे ‘चीनच्या वाढत्या दादागिरीला आळा घालणे’, हे समान लक्ष्य असल्याने चीन अस्वस्थ आहे’, अशी भारतीय प्रसारमाध्यमांत चर्चा आहे.
भारतासह अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देशही चीनच्या वरचढपणाने पीडित असल्याने चीन ‘क्वाड’मधील सर्वच देशांचा शत्रू आहे. सैन्य, व्यापार, तंत्रज्ञान, जैविक हत्यारे, शिक्षण, साम्यवादी विचारसरणी पसरवणे आणि पाकसारख्या आतंकवादधार्जिण्या देशाला साहाय्य करणे आदी विविध माध्यमांतून चीन जगातील अनेक देशांना स्वत:च्या अधिपत्याखाली आणू पहात आहे. हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर येथे चीनने अवैधरित्या नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे चीनला टक्कर देण्यासाठी चीन वापरत असलेल्या नीतीमध्येच भारताने मित्रराष्ट्रांसह एक पाऊल पुढे असायला हवे. ‘क्वाड’मधील देश चीनवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणून त्याची नाकेबंदी करू शकतात; मात्र चीन त्याला दाद देण्याची सुतराम शक्यता नसल्याने धडक कृतीचीच भाषा चीनला समजणार आहे. ‘क्वाड’मधील देशांनी संयुक्त सैनिकी कारवाई करून चीनचे अतिक्रमण हटवायला हवे. शाब्दिक बुडबुड्यांचे खेळ खेळण्यापेक्षा जैविक हत्यारांची निर्मिती करणार्या चीनवर थेट आक्रमण करता येऊ शकते का ? याविषयी निर्णय घ्यायला हवा.
‘क्वाड’मधील देशांनी चीनशी असलेला व्यापार पूर्णत: थांबवल्यास चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील. विविध देशांत पेरलेल्या हस्तकांकरवी चीनकडून हेरगिरी केली जाते. चीनने अमेरिकेतील काही शास्त्रज्ञांना स्वत:च्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला होता, तसेच ऑस्ट्रेलियातील काही लोकांनी चीनला माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातही चीनचे समर्थक उघडपणे भारतविरोधी वक्तव्ये करत असतात. यावरून ‘क्वाड’मध्ये सहभागी झालेल्या देशांना चीनच्या संदर्भात काही समान समस्या भेडसावत आहेत, हेही तितकेच खरे. ‘क्वाड’मधील देशांनी एकत्र येऊन प्रथमत: आपापल्या देशांतील चीनच्या हस्तकांना वठणीवर आणायला हवे, तसेच संशोधन आणि सैन्य यांच्या स्तरावर संघटितपणे अन् उघडपणे चीनच्या विरोधात उभे रहायला हवे. भारताने याचे नेतृत्व करावे. असे झाल्यास चीनला धडकी भरून त्याला नरमाईचे धोरण स्वीकारणे भाग पडेल !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात