मुंबई – कोरोनाविषयीचे नियम पाळून ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेशी लढण्याचे नियोजन केले आहे; मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण अन्य गोष्टींमधील निर्बंध शिथिल करत आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या न्यून होत असली, तरी आपल्याला अधिक सावध रहावे लागेल. धार्मिकस्थळी प्रवेश करतांना मुखपट्टी (मास्क) लावणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, जंतूनाशकाचा (सॅनिटायझर) वापर करायलाच हवा. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीचे यामध्ये मोठे दायित्व आहे, हे त्यांनी विसरू नये.’’
मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठीची थोडक्यात नियमावली !
१. प्रार्थनास्थळांच्या आवारात येण्यासाठी केवळ कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. ‘मुखपट्टी’ घातलेल्या भाविकांनाच प्रार्थनास्थळात प्रवेश मिळेल.
२. प्रार्थनास्थळांमध्ये किती भाविकांना प्रवेश दिला जावा ?, याचा निर्णय संबंधित प्रार्थनास्थळाची व्यवस्थापन समिती किंवा विश्वस्त मंडळ यांनी घ्यायचा आहे. हा निर्णय प्रार्थनास्थळाचा आकार, तेथील हवेशीरपणा आदी निकषांवर घेण्यात यावा. या निर्णयप्रक्रियेत स्थानिक प्रशासनाचाही सहभाग असेल.
३. गर्भवती महिला, ६५ वर्षांवरील नागरिक, व्याधीग्रस्त नागरिक आणि १० वर्षांखालील मुले यांना घरीच रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
४. सर्व प्रार्थनास्थळांमध्ये कोरोनाविषयीची जागृती आणि सूचना देणारे फलक लावणे बंधनकारक असेल.
५. कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन संबंधित प्रार्थनास्थळांच्या व्यवस्थापनातील कर्मचारी आणि भेट देणारे नागरिक यांनी करायचे आहे.
६. भाविकांनी पादत्राणे स्वत:च्या वाहनांमध्येच काढावीत. आवश्यकता भासल्यास पादत्राणे नेमून दिलेल्या जागेत स्वतंत्र ठेवावीत.
७. प्रार्थनास्थळाच्या वाहनतळाच्या जागेत, तसेच आजूबाजूला कोरोनाच्या नियमांना अनुसरून योग्य प्रकारे गर्दीचे नियंत्रण केले जावे.
८. प्रत्येक प्रार्थनास्थळाच्या प्रवेशद्वारावर ‘सॅनिटायझर’ आणि ‘थर्मल स्कॅनर’ (ताप मोजण्याचे यंत्र) असावे.