Menu Close

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

‘बॉलीवूड’चा हिंदुद्वेष !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

श्री. शरद पोंक्षे

रामनाथी (गोवा) – भारताची फाळणी धर्माच्या नावावर झाल्यावर मुसलमानांना पाकिस्तान हे ‘इस्लामी राष्ट्र’ म्हणून मिळाले. काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणामुळे भारत हा हिंदूंना न मिळता ‘सेक्युलर’ (निधर्मी) देश झाला. याचे अनेक दूरगामी परिणाम झाले. यातील एक म्हणजे ‘बॉलीवूड’मधील काही मंडळी हे जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात कारवाया करत आहेत, तसेच हिंदु धर्माच्या विरोधात बोलत आहेत. ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी ‘बॉलीवूडचा हिंदुद्वेष !’, या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ परिसंवादात ते बोलत होते.

या परिसंवादामध्ये केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (‘सेन्सॉर बोर्ड’चे) माजी सदस्य श्री. सतीश कल्याणकर, ‘हिंदू आय.टी. सेल’चे श्री. रमेश सोलंकी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांचे विचार मांडले. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या देहली येथील अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम ३२६१ जणांनी पाहिला.

चित्रपटांच्या नियमावलींसंदर्भात केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला प्रशिक्षण  देण्याची आवश्यकता ! – सतीश कल्याणकर, माजी सदस्य, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

श्री. सतीश कल्याणकर
१. चित्रपटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होत असल्यामुळे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे मोठे दायित्व आहे. सध्या चित्रपटांना कशाही प्रकारे (नियमांचे पालन न करता) अनुमती मिळत असल्यामुळे निर्मात्यांकडून नियम न पाळता चित्रपट बनवले जात आहेत. त्यामुळे चित्रपटांच्या नियमावलींसंदर्भात केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

२. चित्रपटात कोणत्याही धर्माला लक्ष्य करणारी दृश्ये नसावीत, यासाठी कायद्यात सर्व प्रकारची कलमे आहेत. ‘पीके’ या हिंदी चित्रपटाच्या वेळी आक्षेपार्ह दृश्ये न वगळल्यास समाजात अशांतता निर्माण होईल’, असे मी लेखी दिले होते, तरीही ती दृश्ये वगळली गेली नाहीत. नंतर चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला.

३. सर्वांत मोठी शोकांतिका म्हणजे मला तमिळ भाषा येत नसतांनाही एक तमिळी चित्रपटाचे परिनिरीक्षण करण्याचा आग्रह सेन्सॉर बोर्डाच्या अधिकार्‍यांनी मला केला. मी यास नकार दिल्यावर त्यांनी ‘केवळ दृश्ये पाहून मान्यता करा (प्रमाणपत्र द्या)’, असे सांगितले. एकूणच सेन्सॉर बोर्डाला हास्यास्पद बनवून ठेवलेले आहे.

‘बॉलीवूड’मधून जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे ! – रमेश सोलंकी, हिंदु आय.टी. सेल

श्री. रमेश सोलंकी
बॉलीवूडमधील सर्व पैसा हा गुन्हेगारी जगताचा असल्यामुळे जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करणारे चित्रपट आणि मालिका बनवल्या जात आहेत. त्यातून सहस्रो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात आहे. ‘रावण-लीला’ चित्रपट आणि ‘कन्यादान’सारखी विज्ञापने करणारे अन्य पंथियांच्या ‘हलाला’, ‘कन्फेशन’ (पापांची स्वीकृती) या पद्धतींतून होणार्‍या बलात्कारांवर चित्रपट का काढत नाहीत ?

चित्रपट-मालिकांद्वारे हिंदु धर्म, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांवर आघात करणार्‍यांना कारागृहात टाकायला हवे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट
१. आज केवळ ‘रावण-लीला’सारखे चित्रपटच नव्हे, तर मराठी-हिंदी भाषेतील ४८ हून अधिक चित्रपट-मालिकांद्वारे हिंदु धर्म, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांवर आघात केले जात आहेत. अशा निर्मात्यांना कारागृहात टाकायला हवे, तरच इतरांना वचक बसेल.

२. ‘गदर’ या हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव ‘सकिना’ आणि अन्य एका चित्रपटात जॉनी लिव्हर या अभिनेत्याचे ‘अब्दुल्ला’ हे नाव आक्षेप घेतल्यावर चित्रपटातून ते लगेचच पूर्णपणे वगळण्यात आले होते. त्याप्रमाणे हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद का घेतली जात नाही ?

३. त्यामुळे आम्ही (हिंदुत्वनिष्ठ) ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर एक हिंदु धार्मिक प्रतिनिधी नियुक्त करायला हवा’, अशी मागणी अनेक वर्षांपासून करत आहोत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *