भारतासाठी चीन आणि पाक यांची युती धोकादायक आहे. अशी युती होण्यापूर्वीच भारताने पाकचा नायनाट करणे आवश्यक होते; मात्र गेल्या ७४ वर्षांतील भारताच्या मिळमिळीत धोरणांमुळे भारत अधिक धोकादायक स्थितीकडे वळत आहे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
१. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या ‘वेस्टर्न थिएटर कमांड’ (पश्चिम विभागीय नियंत्रण) आणि ‘सदर्न थिएटर कमांड’ (दक्षिण विभागीय नियंत्रण) यांमध्ये पाकिस्तानी संपर्क अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चीनचे ‘वेस्टर्न थिएटर कमांड’ भारताच्या सीमेला लागून आहे. याठिकाणी गेल्याच मासामध्ये चीनने जनरल वांग हैजियांग यांची कमांडर म्हणून नियुक्ती केली होती. भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमेवरून सैन्य मागे हटवण्याविषयी करार झाला असूनही ‘वेस्टर्न थिएटर कमांड’मधून मोठ्या प्रमाणात चिनी सैनिक पूर्व लडाख भागामध्ये तैनात केले जात आहेत. चिनी सैन्याचे ‘सदर्न थिएटर कमांड’ हे मकाउ आणि हाँगकाँग यांसह इतर काही भागांवर नियंत्रण ठेवते.
बड़ा खतरा: चीनी सेना में मौजूद हैं पाकिस्तानी सेना के अधिकारी, भारत से लगती सीमा पर तैनात https://t.co/D8mjXZnTIx
— NBT Hindi News (@NavbharatTimes) October 2, 2021
२. चिनी सैन्याचा ‘सेंट्रल मिलिट्री कमिशन’चा (‘केंद्रीय सैनिकी आयोगा’चा) संयुक्त कर्मचारी विभाग आणि राज्य सुरक्षा मंत्रालय येथेही पाकिस्तानचे कर्नल दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ‘केंद्रीय सैनिकी आयोग’ हे युद्ध रणनीती, सराव आणि त्याविषयीच्या गोष्टींचा निर्णय घेते. यासह सैन्याच्या व्यतिरिक्त आणखी १० पाकिस्तानी अधिकार्यांची बीजिंगमधील पाकिस्तानी दूतावासात नियुक्ती करण्यात आली आहे.
३. एका वरिष्ठ भारतीय सरकारी अधिकार्याने सांगितले की, या सर्व घडामोडींवर भारत पूर्ण लक्ष ठेवून आहे. (आतापर्यंत इतकी वर्षे नुसते लक्ष ठेवून भारताने काय साध्य केले आणि पुढे काय साध्य करणार आहे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात ) या दोन्ही देशांच्या सैन्याला एकमेकांचे मोठ्या प्रमाणात साहाय्य होणार आहे.