Menu Close

अमली पदार्थांची नशा !

  • अमली पदार्थांची खरेदी आणि विक्री रोखण्यासाठी इच्छाशक्ती असणारे शासनकर्ते हवेत !
  • किलोंमध्ये तस्करी होत असतांना काही ग्रॅम अमली पदार्थ जप्त होतात, हे लज्जास्पद !

अमली पदार्थांची नशा करण्याचा प्रकार शेकडो वर्षांपासून या पृथ्वीवर चालू आहे. यातही विविध प्रकार आहेत. त्यातही आधुनिक विज्ञानाच्या काळात तर यात नवनवीन ‘शोध’ही लागलेले आहेत. तंबाखू हा आता किरकोळ ठरला आहे. भांग, चरस यांचाही ‘जमाना’ मागे पडल्याचे दिसत आहे. काही दशकांपूर्वी ‘गर्द’ म्हणजे ‘ब्राऊन शुगर’चा मोठा ‘प्रसार’ झाला होता. त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात जागृती झाल्यानंतर त्यावर नियंत्रण आल्याचे दिसत आहे, असे म्हटले जात आहे. तरीही ‘कोकेन’ आणि ‘हेरॉईन’ या अमली पदार्थांचा सध्या अधिक सेवन होतांना दिसत आहे. हे अमली पदार्थ महाग असल्याने गरीब घरातील एखादी व्यक्ती तंबाखू किंवा गांजा यांपुरतीच ‘मर्यादित’ रहाते; मात्र श्रीमंत वर्गांतील, तसेच वलयांकित लोक, त्यांची मुले, इतकेच काय मुली आणि महिलाही यांचे सेवन करतांना आढळल्याची वृत्ते प्रसिद्ध होत असतात. भारतियांनी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केल्याने याहून वेगळे काही घडणार नाही, हे वेगळे सांगायलाच नको. अमली पदार्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, त्यांचा व्यापार, सेवन आदी रोखण्यासाठी प्रत्येक देशामध्ये सरकारी यंत्रणा अस्तित्वात आहेत; मात्र त्या काही यावर नियंत्रण मिळवू शकलेल्या नाहीत. यामागे अनेक कारणे असली, तरी पैसा हेच सर्वांत मोठे कारण आहे आणि बहुतेक अनेक गुन्हेगारी प्रकरणात हेच महत्त्वाचे सूत्र असते.

अमली पदार्थांचा जागतिक व्यापार अब्जावधी रुपयांचा आहे. हेरॉईन किंवा कोकेन विकत घेतांनाही ते १ ग्रॅमपासून चालू होते. १ किलो हेराईनची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. भारतात या अमली पदार्थांची विक्री, खरेदी आणि सेवन करण्यास बंदी आहे. असे असेल, तरी याचे सर्रास उल्लंघन केले जाते आणि मग अशांवर कारवाई होते. अशीच एक कारवाई राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने प्रसिद्ध चित्रपट अभिनेते शाहरूख खान यांचा तरुण मुलगा आर्यन खान याच्यावर केली आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांना दिवसरात्र चर्वण करण्यासाठी एक ‘चांगली’ बातमी मिळाली आहे. ‘अशा एखाद्या घटनेच्या व्यतिरिक्त देशात काही घडलेले नाही आणि घडत नाही’, असेच त्यांच्या वार्तांकनावरून नेहमीच दिसत असते. ते या घटनेच्या वेळीही दिसून आले. मुळात अशा प्रसारमाध्यमांनी अमली पदार्थांची तस्करी, खरेदी-विक्री, सेवन यांविषयी जागृती करण्याची अधिक आवश्यकता आहे; मात्र ते तसे करण्याचा क्वचित् प्रयत्न करतात. हा प्रयत्न पुष्कळ अल्प असतो. आर्यन खान शाहरूख खान यांचा मुलगा असल्याने या वृत्ताला प्रसारमाध्यमे आणि चित्रपटांची आवड असणार्‍या नागरिकांच्या दृष्टीने अधिक महत्त्व देण्यात आले आहे. त्याच्या ठिकाणी अन्य श्रीमंत वर्गांतील तरुण असते, तर इतके महत्त्व मिळाले नसते. त्यातही हे वृत्तच केवळ प्रकाशित होत आहे. त्याला रोखण्यासाठी काय करावे, हे कुणीच बोलत नाही. भारतातील अमली पदार्थांची तस्करी, खरेदी, विक्री, सेवन यांवर कायमस्वरूपी चाप बसण्यासाठी काही प्रयत्न सरकार, अन्वेषण यंत्रणा, प्रसारमाध्यमे यांच्याकडून होईल, असे वाटत नाही. कारण यापूर्वीही विशेष काही झाल्याचे दिसत नाही.

इच्छाशक्तीचा अभाव !

अमली पदार्थांची समस्या केवळ भारतातील नाही, तर जगभरातील आहे. त्यामुळे त्याच्या मुळावर आघात करण्याचा पहिला प्रयत्न असला पाहिजे आणि तो म्हणजे अमली पदार्थांचे उत्पादन रोखण्याचा. जगातील ज्या देशांमध्ये उघड आणि छुप्या पद्धतीने अमली पदार्थांचे उत्पादन घेतले जाते, त्यांच्यावर जागतिक देशांनी दबाव निर्माण करून ते कायमस्वरूपी बंद पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे फार मोठे काम आहे; कारण यामागे अब्जावधी रुपयांचा व्यापार आहे. त्यामुळे फार मोठ्या इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. ही इच्छाशक्ती न असण्यामागे शासनकर्ते, राजकारणी, जिहादी आतंकवादी, त्यांना पोसणारे देश, आंतरराष्ट्रीय गुंड टोळ्या आदींचा मोठा वाटा आहे, नव्हे, तेच याला कारणीभूत आहेत. भारतातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनाद्वारे संपवण्याचे कारस्थान पाकिस्तान गेली अनेक वर्षे करत आहे. गर्दच्या मागे त्याचाच मोठा हात असल्याचे काही दशकांपूर्वी उघड झाले होते. पाकच्या अफगाणिस्तानच्या सीमेलगत अफूसारख्या अमली पदार्थांची शेती केली जाते. अफगाणिस्तानमध्येही मोठ्या प्रमाणात अफूची शेती केली जाते. त्यातून पुढे जिहादी आतंकवादी संघटना याची तस्करी करतात किंवा तस्करी करणार्‍यांकडून पैसे वसूल करतात. त्यातून त्यांची संघटना चालते. भारतात याची विक्री गुंड टोळ्यांकडून केली जाते, त्यातून त्यांची टोळी चालवली जाते. यातून हत्याही होतात. हे पोलिसांना आणि अन्य राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणांना ठाऊक आहे. या यंत्रणांनी लहान विक्रेते, फरदीन खान, आर्यन खान आदी अभिनेते किंवा अभिनेत्यांची मुले यांच्या पर्यंत पोचावेच; परंतु त्यांचा बोलविता धनी कोण आहे ? त्यांना हे सर्व कोण पुरवतो ? त्यांच्या पर्यंतही पोचावे. त्यांची ही कारवाई समुद्रात खसखस असावी याप्रमाणे आहे. यामागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच मोठे कारण आहे; कारण अमली पदार्थांचा साठा काही किलोंमध्ये येत असतो आणि अन्वेषण यंत्रणा कारवाई करतांना हाताच्या बोटावर मोजणार्‍या ग्राममध्ये करत असते, हे जनतेला दिसत असते; मात्र यावर कुणी ठोस आवाज उठवतांना दिसत नाही. विरोधी पक्षही यावर मौन बाळगतो; कारण राजकारण्यांनाही याची नशा असते, त्यांच्या मुलांनाही नशा असते. काही वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन याच नशेमुळे बेशुद्ध झाल्याने त्याला रुग्णालयात भरती करावे लागले होते, तर महाजनांच्या माजी स्वीय सचिवांचा या वेळी मृत्यूही झाला होता. अशा घटना लोक लगेच विसरतात आणि राजकारण्यांचे फावते. या घटनेनंतरही काही ठोस कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. कालच काश्मीरमधून अमली पदार्थांचा मोठा साठा पकडण्यात आला. ही फारच दुर्मिळ गोष्ट घडली आहे; मात्र यापूर्वी किती मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ भारतात आले असतील आणि पुढेही येत राहातील याचा विचार कोण करणार ? यात अन्वेषण यंत्रणा तोकड्या आहेत किंवा त्यांच्यात तितकी क्षमता नाही, असेही काही जण म्हणू शकतात. हे एकवेळ मान्य केले, तरी इच्छाशक्ती असल्यास मार्ग सापडतो, असे म्हटले जाते, ही इच्छाशक्ती कधी दाखवली जाणार ? हा प्रश्न उरतोच !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *