Menu Close

चर्चने केलेल्या अमानवी छळात होरपळलेली नन ल्युसी कलापुरा आणि न्यायनिवाडा !

नन ल्युसी कलापुरा

१. ४० वर्षे चर्चशी संबंधित असलेल्या ल्युसी कलापुरा या ननला चर्चने काढणे आणि त्यामागे क्षुल्लक कारणे देणे

‘ल्युसी कलापुरा ही केरळच्या एका चर्चमध्ये वयाच्या १७ व्या वर्षांपासून नन म्हणून कार्यरत होती. तिथे तिने शिक्षिका म्हणून २४ वर्षे ‘गणित’ विषय शिकवला; पण चर्चने तिला नुकतेच काढले. या वेळी चर्चने अतिशय क्षुल्लक कारण देत सांगितले की, ल्युसी चारचाकी वाहन चालवायला शिकली. ते खरेदी करण्यासाठी तिने बँकेकडून ऋण (लोन) घेतले. तिने स्वतःच्या नावाने कविता संग्रह प्रकाशित केला. तिने आत्मचरित्र लिहिले. ती पंजाबी पोशाख परिधान करायची. या सर्वांतील ‘ती पंजाबी पोशाख घालायची’, हे वेगळे आणि न पटणारे कारण चर्चने सांगितले.

२. ल्युसी कलापुरा हिला चर्चमधून काढण्यामागे फ्रान्सिस मुलक्कल बिशप याचे पाप कारणीभूत असणे

ल्युसी कलापुरा हिला काढण्यामागील चर्चने दिलेली कारणे क्षुल्लक वाटत असली, तरी त्या कारणांच्या मुळाशी गेल्यावर सत्य बाजू लक्षात येते. फ्रान्सिस मुलक्कल बिशप याचे सोफी नावाच्या एका ननशी अनेक वर्षांपासून शारीरिक संबंध होते. एक दिवस रात्री नन अभया (वय १७ वर्षे) अभ्यासासाठी उठली आणि पाणी पिण्याच्या ठिकाणी गेली. तेव्हा तिने सोफी आणि मुलक्कल यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. स्वतःचे बिंग फुटू नये; म्हणून या दोघांनी तिचा गळा दाबला आणि तिला विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर ‘अभयाने आत्महत्या केली’, असा कांगावा केला. त्या वेळी व्हॅटिकन आणि भारतातील अन्य चर्च यांच्याकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यांनीही ‘ननने आत्महत्या केली असून हत्येसारखी कोणतीच घटना घडली नाही’, असे सांगितले. एका बिशपच्या विरोधात अशा प्रकारचा खटला उभा राहिल्यामुळे साम्यवादी केरळ सरकार आणि पोलीस यांच्यावर प्रचंड प्रमाणात दबाव निर्माण झाला होता.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

३. ननकडून करण्यात आलेले आंदोलन, न्यायप्रिय न्यायमूर्ती आणि प्रामाणिक साक्षीदार यांच्यामुळे २ दशकांनंतर आरोपींना शिक्षा होऊन नन अभयाला न्याय मिळणे

अ. बिशप मुलक्कल याला शिक्षा व्हावी, यासाठी चर्चमधील अनेक नननी प्रयत्न केले. त्या सर्वजणी व्हॅटिकन आणि रोमन कॅथॉलिक या चर्चच्या विरोधात ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी धरणे आंदोलन करून घटनेचा सनदशीरपणे निषेध नोंदवला. त्यामुळे त्या सर्वांना प्रसिद्धी मिळाली.

आ. अनेक ननकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट करण्यात आल्या. त्यामुळे ‘संबंधित प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (‘सीबीआय’कडे) देण्यात यावे’, असा आदेश न्यायालयाने दिला. पुरेसे पुरावे नसल्यामुळे सीबीआयने ३ वेळा ‘क्लोजर रिपोर्ट’ (खटला बंद करण्याचा अहवाल) न्यायालयात सादर केला; परंतु न्यायप्रिय आणि निःस्पृह न्यायमूर्तींनी तो फेटाळला. परिणामी राज्य सरकार आणि अन्वेषण यंत्रणा यांना हा खटला उभा करावा लागला.

इ. वैद्यकीय अहवालामध्ये नन अभयाच्या गळ्यावर खुणा आढळून आल्या. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याची शंका बळावली. यातील अनेक साक्षीदारांनी साक्ष फिरवली; परंतु एका साक्षीदाराने प्रामाणिकपणे साक्ष दिल्याने त्याची साक्ष न्यायालयाने स्वीकारली. त्यामुळे चौकशीअंती सत्य बाहेर आले आणि फ्रान्सिस मुलक्कल याला २० वर्षांची शिक्षा झाली. त्याच्या समवेतच सोफी ननलाही शिक्षा झाली. वर्ष १९९२ मधील प्रकरणाला २ दशकांनंतर न्याय मिळाला.

४. मुलक्कलच्या विरोधातील आंदोलनात ल्युसी कलापुरा हिच्या सक्रीय सहभागामुळे चर्चने सूड उगवणे

नन अभयाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात ल्युसी कलापुरा हिचा सक्रीय सहभाग होता. ती बिशप आणि कॅथॉलिक चर्च यांच्या विरोधात ठामपणे उभी राहिली. त्यामुळे तिची हकालपट्टी करण्यात आली. तिला केवळ नोकरीवरून काढले, एवढ्यावरच ही गोष्ट मर्यादित नाही, तर जी तरुणी केवळ १७ वर्षांची असतांना धर्मप्रसार करण्यासाठी नन होते, चर्चमध्ये रहाते आणि शिक्षिकेचे दायित्व उचलते, अशा तरुणीने अन्यायाला विरोध केला; म्हणून चर्च तिच्यावर सूड उगवते, हे संतापजनक आहे.

५. ल्युसी कलापुरा हिने बिशपच्या विरोधात लढा दिल्यामुळे चर्चने तिचा अमानवी छळ करणे

ल्युसी कलापुरा हिने बिशपच्या विरोधात लढा दिला. त्यामुळे चर्चने सर्वप्रथम तिला अन्न-पाणी देणे बंद केले. तिच्यावर अनेक वेळा जीवघेणी आक्रमणे झाली. तिच्या खोलीतील विद्युत् पुरवठा बंद करण्यात आला. ज्या खटक्याने घरातील विद्युत् पुरवठा चालू होतो, त्याच खटक्यामध्ये फेरफार करण्यात आला, म्हणजे दिवा लावायला गेल्यास विजेचा धक्का बसून मृत्यू होईल. अशा प्रकारे अनेक जीवघेणे प्रकार तिच्या समवेत घडले; मात्र ती डगमगली नाही. या विरोधात तिने उपोषण करण्याचा निर्णय घेतला, तर चर्च व्यवस्थापनाने तिला उपोषणही करू दिले नाही.

६. ल्युसीला अधिवक्ता मिळू नये; म्हणून चर्चने सर्व अधिवक्त्यांवर दबाव आणणे आणि कुणीही तिच्या बाजूने उभे न रहाणे

या सर्व प्रकरणात तिच्यापुढे न्यायालयामध्ये जाऊन न्याय मिळवणे, एवढा एकच पर्याय शेष होता. तिने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले; पण काही दिवसांनी तिच्या अधिवक्त्याने तिचा खटला सोडून दिला. तिने अन्य अधिवक्त्यांशी संपर्क केला; पण सर्वांनी तिचा खटला चालवण्यासाठी नकारच दिला. ‘हे सर्व कॅथॉलिक चर्चच्या दबावामुळे झाले’, असे तिचे म्हणणे आहे. अशा स्थितीत उच्च न्यायालयाचा निवाडाही तिच्या विरोधात गेला. न्यायालयाने तिची ‘चर्चच्या परिसरातून बाहेर काढू नये’, ही मागणी फेटाळून तिला खालच्या न्यायालयामध्ये जाण्यास सांगितले.

वर्ष २०२१ मध्ये रोमन कॅथॉलिक चर्च आणि व्हॅॅटिकन चर्च यांनी ल्युसीला चर्चमधून काढण्याच्या शिक्षेला मान्यता दिली. यासंदर्भात तिचे अपीलही न्यायालयाने २ वेळा फेटाळले. प्रसारमाध्यमांनी वायनाड चर्चचे पिल्ली फ्रान्सेस यांना या घटनेविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमच्या चर्चला २ सहस्र वर्षांची परंपरा आहे. ज्या कारणांनी ल्युसीला काढले, ते नियम आम्ही १ सहस्र ६०० वर्षांपासून पाळत आहोत. त्यामुळे तिच्यावर अन्याय झाला आहे, हे आम्हाला मान्य नाही.’’

७. ल्युसीच्या समर्थनार्थ काही सुधारणावादी मंडळी उभी ठाकणे

हे सर्व घडत असतांना ख्रिस्ती पंथातील काही सुधारणावादी मंडळी ल्युसीच्या बाजूने उभी राहिली. त्यात प्रामुख्याने चर्चमध्ये सुधारणा व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील असणार्‍या इंदुलेखा जोसेफ यांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की, सरकारने यात लक्ष घालून ल्युसीला न्याय मिळवून दिला पाहिजे. अशा प्रकारे आणखीही एकाने ल्युसीची बाजू घेतली.

ल्युसीच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ तिला कामावरून काढल्यामुळे ती न्याय मागत नाही, तर तिने आयुष्याचा फार मोठा काळ चर्चच्या सेवेसाठी दिला आहे. त्यामुळे तिला उतारवयात काढणे, हा त्या व्यक्तीसाठी कलंक आहे. हा कलंक पुसला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी ती सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्यासही सिद्ध आहे. ती न्याय मिळण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील.’  (१५.८.२०२१)

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *