संवेदनशील प्रकरणाचे राजकारण करणार्या काँग्रेसला जनतेनेच धडा शिकवावा !
लखीमपूर खीरी येथे ३ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या हिंसक घटनेमध्ये ९ जण ठार झाले. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा हे जिल्ह्यातील तिकुनिया गावाजवळ एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेव्हा त्या ठिकाणी काही शेतकर्यांनी केंद्रशासनाने संमत केलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन केले. तेव्हा मंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक केल्यावर वाहनचालकाला दगड लागल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे या वाहनाखाली ४ शेतकरी चिरडून ठार झाले. असा साधारण घटनाक्रम सांगण्यात येतो. यात काँग्रेसचे म्हणणे आहे की, शेतकर्यांच्या अंगावर जाणूनबुजून वाहन घालून त्यांना ठार मारण्यात आले. हेच काँग्रेसच्या विरोधामागचे कळीचे सूत्र आहे. वास्तविक या दुर्दैवी घटनेनंतर दोषींना अटक होण्यासाठी, तसेच त्यांना शिक्षा होण्यासाठी तळमळीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. देशातील एक प्रमुख उत्तरदायी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने ही भूमिका पार पाडणे अपेक्षित होते; पण तसे होतांना दिसत नाही. याऐवजी काँग्रेस गलिच्छ राजकारण करण्यात गुंतली असल्याचे दिसून येते. ही घटना घडताच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका वाड्रा या घटनास्थळी जायला निघाल्यावर अर्थात् त्यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत रोखले अन् स्थानबद्ध केले. यावरून काँग्रेस सध्या रान उठवत आहे. ‘भाजप शेतकरीविरोधी पक्ष आहे’, ‘तो लोकशाहीचा गळा घोटतो आहे’, असे विविध आरोप काँग्रेस करत आहे. आज राहुल गांधी लखीमपूर खीरी येथे जायला निघाले. अर्थात् त्यांनाही रोखले जाईल. वस्तूतः राजकारण्यांनी अशा संवेदनशील ठिकाणी जाणे योग्य नाही; कारण त्यातून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यापलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो. आधीच चिघळलेल्या परिस्थितीत अशा राजकारण्यांच्या जाण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन परिस्थिती अधिक चिघळू शकते. खरेतर देशावर तब्बल ६ दशके राज्य करणार्या काँग्रेससारख्या मातब्बर पक्षाला हे ठाऊक नाही, यावर कोण विश्वास ठेवणार ? काँग्रेसच्या नेत्यांचे अशा ठिकाणी जाणे, हे काही त्यांना शेतकर्यांचा कळवळा आहे; म्हणून नाही, तर त्यामागे निवळ राजकारण आहे आणि ते नको त्या वेळी केले जाते; म्हणून ते गलिच्छ ठरते.
काँग्रेसच्या सत्ताकाळात शेतकर्यांवर गोळीबार !
काँग्रेसचा ‘स्टंट’ निवडणुकीसाठीच !
काँग्रेसच्या दृष्टीने लखीमपूर खीरी आणि महाराष्ट्रातील मावळ यांमधील घटनांत एक महत्त्वाचा भेद हा की, उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणुक तोंडावर असतांना लखीमपूर खीरी येथील घटना घडली अन् मावळमधील घटनेच्या वेळी अशा कुठल्याही निवडणुका नव्हत्या, तसेच त्या वेळी राज्यात स्वतःचाच पक्ष सत्तेत होता. थोडक्यात निवडणुका असल्या की, काँग्रेससाठी शेतकरी सर्वकाही असतात आणि निवडणुका नसल्या की, शेतकरी आरोपी असतात. याला गलिच्छ राजकारण म्हणतात. सध्या काँग्रेससाठी लखीमपूर खीरी येथील शेतकर्यांना न्याय मिळवून देणे, हे प्रतिष्ठेचे सूत्र नव्हे, तर गांधी घराण्यातील भावा-बहिणीला तेथे केलेली प्रवेशबंदी, हे प्रतिष्ठेचे सूत्र आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. एकूणच या प्रकरणात काँग्रेसची जी भूमिका आढळून आली, तशी भूमिका विविध प्रकरणांत सर्वच राजकीय पक्षांची दिसून येते. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने इतरांना दोषी ठरवण्यापूर्वी प्रथम स्वतःचा इतिहास तपासून पाहिला पाहिजे आणि ते तो पहात नसतील, तर जनतेनेच त्यांना त्यांच्या कृत्याची आठवण करून द्यायला पाहिजे. असे झाले, तरच उद्दामपणे वागणार्या पक्षांवर काही प्रमाणात तरी वचक बसेल !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात