Menu Close

दळणवळण बंदीच्या काळातही हिंदु जनजागृती समितीने घेतलेली गरुडभरारी !

घटस्थापनेच्या शुभदिनी हिंदु जनजागृती समितीचा २० वा स्थापनादिन आहे. त्या निमित्ताने…

हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
गेल्या १९ वर्षांत हिंदु जनजागृती समितीच्या कार्याने जी गरुडझेप घेतली, त्याचे प्रेरणास्रोत म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! त्यांच्याच कृपाशीर्वादाने हिंदु जनजागृती समितीचे कार्य आज देश-विदेशांत पोचले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार सर्वप्रथम मांडला आणि त्यातून प्रेरणा घेऊनच समिती कार्यरत आहे. समितीच्या कार्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होणार’, असा विश्‍वास दृढ होत आहे !

– श्री. सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती (५.१०.२०२१)

‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दही २० वर्षांपूर्वी कुणी उच्चारत नव्हते; मात्र आजच्या घडीला चोहोबाजूंनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी जोर धरत आहे. भारतातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये असे आत्मविश्‍वासपूर्ण वातावरण निर्माण करण्यात सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल, तर तो म्हणजे हिंदु जनजागृती समितीचा ! हिंदु राष्ट्र स्थापनेचे उदात्त ध्येय समोर ठेवून आज, म्हणजे आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदेला हिंदु जनजागृती समिती २० वा स्थापनादिन साजरा करत आहे !

मागील दीड वर्षात दळणवळण बंदीच्या काळात प्रत्यक्ष हिंदु-राष्ट्र जागृती सभा, अधिवेशने यांवर बंधने आली; मात्र हिंदूसंघटनाचा ध्यास घेतलेल्या समितीने या परिस्थितीवर मात करत ‘ऑनलाईन’ पद्धतीने हिंदुत्वनिष्ठांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. ‘धर्मकार्यात ईश्‍वर साहाय्य करतोच’, याची अनुभूती या निमित्ताने घेता आली. वर्धापनदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गेल्या वर्षभरातील थोडक्यात मागोवा आणि ऑनलाईन उपक्रमांना लाभलेला भरभरून प्रतिसाद यांविषयी संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.

श्री. सुनील घनवट

१. आपत्काळात समाजाला दिशादर्शन करून त्यांना आश्‍वस्त करणारे ‘ऑनलाईन’ धर्मसत्संग !

कोरोनामुळे भीतीचे वातावरण सर्वत्र होते. भांबावलेल्या या स्थितीत खरेतर वैद्यकीय किंवा प्रशासकीय साहाय्यापेक्षाही अधिक मानसिक आणि आध्यात्मिक बळाची आवश्यकता होती. हे लक्षात घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रतिदिन ‘ऑनलाईन’ सत्संगांची शृंखला चालू करण्यात आली. ‘Youtube.com/HinduJagruti’ या लिंकवर हे सत्संग पहाता येतात.

१ अ. विविध विषयांवरील सत्संग म्हणजे समाजासाठी विशेष पर्वणी !

१ अ १. नियमित प्रसारित होणारे सत्संग : काळानुसार कलियुगातील साधना म्हणजे नामस्मरण ! ‘नामस्मरण कुणाचे ? कधी ? कसे ? आणि का करावे ?’, ‘भावपूर्ण नामजप होण्यासाठी काय प्रयत्न करायचे ?’ यांविषयी माहिती देण्यासाठी ‘नामजप सत्संग’ चालू करण्यात आला. लहान मुलांवर सुसंस्कार होण्यासाठी ‘बालसंस्कारवर्ग’, तर ईश्‍वराप्रतीची भावभक्ती वाढण्यासाठी ‘भावसत्संग’ चालू करण्यात आला. धर्माविषयी मनात असलेल्या शंकांचे निरसन, हिंदु धर्माविषयी केल्या जाणार्‍या निराधार आरोपांचे खंडण करण्यासाठी, तसेच हिंदु धर्मातील ज्ञान आणि विज्ञान समाजापर्यंत पोचवण्यासाठी ‘धर्मसंवाद’ चालू करण्यात आला. सप्टेंबर २०२१ पर्यंत नामजप सत्संगाचा ८५ लाख २६ सहस्र ८६४ जणांनी, बालसंस्कारवर्गाचा २६ लाख २८ सहस्रांहून अधिक जणांनी, भावसत्संगाचा ५४ लाख ६८ सहस्र ३५० हून अधिक जणांनी, तर धर्मसंवादाचा ४९ लाख ४४ सहस्र ३६० जणांनी लाभ घेतला.

१ अ २. ‘चर्चा हिंदु राष्ट्र की !’ ‘ऑनलाईन’ चर्चासत्र : आठवड्यातून २ वेळा ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या ‘ऑनलाईन’ चर्चासत्राच्या माध्यमातून राष्ट्र किंवा धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी हिंदुत्वनिष्ठ विचारांचे अभ्यासक, विचारवंत, नेते, लेखक, अधिवक्ते, पत्रकार, कार्यकर्ते आदींचे त्या त्या विषयातील अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मौलिक विचार हिंदूंपर्यंत पोचवले जातात.

१ अ ३. ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गामुळे सहस्रो जिज्ञासूंना लाभ ! : समिती धर्मशिक्षणवर्गांचे आयोजन करून सण आणि धार्मिक कृती यांमागील अध्यात्मशास्त्र, साधना, राष्ट्रासमोरील समस्या इत्यादी विषयांवर हिंदूंमध्ये जागृती करते. दळणवळण बंदीच्या काळापासून २४६ ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू असून सहस्रो जिज्ञासू त्याचा लाभ घेत आहेत.

व्यापारी, उद्योजक, आधुनिक वैद्य (डॉक्टर), शिक्षक, हरिभक्त परायण, मंदिरांचे विश्‍वस्त, पत्रकार, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांसाठी वेगवेगळे धर्मशिक्षणवर्ग घेतले जातात.

१ आ. सत्संगांचा लाभ घेणारे धर्माभिमानी आणि जिज्ञासू यांनी व्यक्त केलेले हृद्य अभिप्राय !

या सत्संगांमुळे जीवनात अनेक सकारात्मक पालट झाल्याचे अनुभव अनेक दर्शकांनी सांगितले आहेत. अनेकांना चांगल्या अनुभूती आल्या, अनेकांचे अनिष्ट शक्तींचे त्रास अल्प झाले, तर कित्येक जणांनी धर्मकार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. दळणवळण बंदीच्या काळात मानसिक तणावाने दबलेल्या मनांना सत्संगरूपी ऊर्जेतून मिळत असलेले आध्यात्मिक बळ, हे या सत्संगांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या सत्संगांचा लाभ घेतलेले अनेक धर्माभिमानी आणि जिज्ञासू हिंदू यांनी हृद्य अभिप्राय व्यक्त केले. त्यातील निवडक अभिप्राय येथे प्रसिद्ध करत आहोत.

१ आ १. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देऊ इच्छिणे : ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपण जो महायज्ञ आरंभला आहे, त्यामध्ये मी माझे योगदान देऊ इच्छितो. मी माझ्या सर्व परिचितांना या कार्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करीन.’

– श्री. सतीश मिश्रा, अध्यक्ष, ब्राह्मण महासभा, उत्तरप्रदेश.

१ आ २. हिंदु धर्मावरील आघात रोखणारी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे विशेष कौतुक ! : ‘निर्बुद्ध व्यक्तींकडून आपल्या धर्माची होत असलेली निंदानालस्ती रोखणे, हे आपले परमकर्तव्य आहे आणि ते आपण व्यवस्थित निभावत आहात, त्याविषयी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे विशेष कौतुक. निंदकांना परखडपणे आपला धर्म योग्य तर्‍हेने समजावून देणे, हे आपले नैतिक कर्तव्य आहे. स्वामी विवेकानंदांनीही हे सांगितले होते. हे कर्तव्य तुम्ही व्यवस्थित पार पाडत आहात. त्यामुळे आपल्या या तेजोमय हिंदु धर्माची पवित्र पताका सार्‍या विश्‍वात फडकत राहील, अशी माझी खात्री आहे. तुमच्या या पवित्र कार्याला मी मनःपूर्वक वंदन करतो.’ – श्री. प्रसाद प्रभाकर चव्हाण, कल्याण (पूर्व), ठाणे

२. ‘ऑनलाईन’ आंदोलनांतून आणि सामाजिक माध्यमांतून विश्‍वव्यापी हिंदूसंघटन !

२ अ. संकेतस्थळ : हिंदूंच्या हक्काचे व्यासपीठ बनलेले ‘हिंदु जागृती डॉट ओआर्जी’ (www.hindujagruti.org) हे संकेतस्थळ आज मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये कार्यरत आहे. सध्या सरासरी १ लाख ३० सहस्रांहून अधिक जिज्ञासू या संकेतस्थळाला भेट देतात.

२ आ. यू-ट्यूब चॅनल : समितीच्या youtube.com/HinduJagruti या यू-ट्यूब चॅनलला हिंदूंचा भरघोस प्रतिसाद असून ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ८० लाख १३ सहस्रांहून अधिक जणांनी यावरील व्हिडिओ पाहिले आहेत. या चॅनलची सदस्यसंख्या (सबस्क्रायबर) सध्या ९५ सहस्रांहून अधिक आहे.

२ इ. टि्वटर : समितीच्या ‘twitter.com/hindujagrutiorg’ या टि्वटर खात्याला हिंदूंचा वाढता प्रतिसाद लाभत असून त्याचे ५० सहस्रांहून अधिक ‘फॉलोअर्स’ आहेत. राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीसह समविचारी संघटना विशिष्ट टि्वटर ट्रेण्ड चालवून मोहीम राबवतात.

२ ई. फेसबूक : हिंदु जनजागृती समितीच्या ‘facebook.com/HinduAdhiveshan’ या फेसबूकच्या अधिकृत पानाशी १४ लाख ५० सहस्र जण जोडले गेले होते; परंतु हिंदुद्वेषी फेसबूकने हे पान बंद केले.

यांसह समितीकडून अन्य सामाजिक प्रसारमाध्यमे उदा. ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘कू’, ‘इन्स्टाग्राम’ यांद्वारे धर्मशिक्षण समाजापर्यंत पोचवण्याचे कार्य अविरत चालू आहे.

३. स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग, बलोपासनावर्ग आणि शौर्यजागृती शिबिर

महिलांची छेडछाड, अपहरण, चोर्‍या, बलात्कार अशा गुन्ह्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आज ‘स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे’ ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी समितीच्या माध्यमातून विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. सध्या साप्ताहिक ४५ ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू आहेत. तर प्रतिदिनचे १४ ‘ऑनलाईन’ बलोपासनावर्ग चालू आहेत.

४. प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग

आपत्काळाच्या पार्श्‍वभूमीवर समाज आणि राष्ट्र यांच्या प्रतीचे कर्तव्य म्हणून प्रत्येक नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक आहे. सध्या ४७ साप्ताहिक ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग समितीच्या वतीने चालू आहेत.

५. मंदिर रक्षण अभियानाच्या अंतर्गत प्रयत्नांना यश

‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट’ यांनी मुंबई येथील बाणगंगेच्या ऐतिहासिक जलस्रोताला दूषित करणार्‍या खोदकामाला महापौरांकडून स्थगिती मिळवून दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातील मंदिरांवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्याचा आदेश शासनाला काढावा लागला आहे. दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ अखिल भारतीय ‘मंदिर संस्कृती रक्षा अधिवेशन’ घेण्यात आले. त्याला १ सहस्र मंदिरांचे विश्‍वस्त, पुजारी, पुरोहित उपस्थित होते. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये मंदिर विश्‍वस्तांच्या ‘ऑनलाईन’ बैठका चालू झाल्या.

६. संस्कृतीरक्षण मोहीम

अ. वर्ष २०२१ मध्ये कागदी लगद्याच्या मूर्ती विकणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट’ या संकेतस्थळांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी समितीने पोलिसांकडे तक्रारीद्वारे केली आहे.

आ. वर्ष २०२१ मध्ये हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यात २५० हून अधिक संत-महंत आणि धर्माचार्य यांच्या भेटी समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या. या सर्वांकडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणात पाठिंबा आणि समर्थन मिळाले. येथे आलेल्या रुक्मिणीपीठाच्या रामानुजाचार्यांच्या तंबूमध्ये ‘हिंदु राष्ट्रा’ची गुढी उभारण्यात आली.

७. धर्मरक्षणाच्या अनुषंगाने मोहिमा

७ अ. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम : विशाळगडावरील अनधिकृत आक्रमणाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने अन्य हिंदुत्वनिष्ठांसह राबवलेल्या मोहिमेनंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी विशाळगडावरील अतिक्रमणांना नोटीस पाठवण्याचे आदेश दिले ! समिती गड-किल्ले यांच्या संरक्षणविषयक मोहिमा राबवत आहे, हे लक्षात आल्यावर २५ हून अधिक गडप्रेमी संघटनांनी समितीशी संपर्क केला आणि समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्या माध्यमातून गडप्रेमींचे संघटन साध्य होत आहे.

७ आ. हिंदूंविरुद्धचा आर्थिक जिहाद असलेल्या ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जागृती : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेल्या काही मासांपासून इस्लामी समांतर अर्थव्यवस्था असलेल्या आणि हिंदूंविरुद्धच्या आर्थिक जिहादाप्रमाणे असलेल्या ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी विविध लेख आणि व्याख्याने, निवेदने यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. यांमुळे अनेक राज्यांत सहस्रो व्यावसायिक जागृत, संघटित आणि कृतीशील झाले आहेत. दळणवळण बंदीच्या काळात हलाल अर्थव्यवस्थेविषयी जागृती करण्यासाठी व्यापार्‍यांच्या ‘ऑनलाईन’ बैठका घेण्यात आल्या. त्यातून व्यापार्‍यांचे संघटन साध्य होत आहे.

७ इ. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतररराष्ट्रीय परिषदेला विरोध करण्याची मोहीम : ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय हिंदुविरोधी परिषदेला विरोध करण्यासाठी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या वतीने ‘ऑनलाईन’ ‘हिंदुत्व रक्षा बैठकी’चे आयोजन करण्यात आले. या बैठकीत देश-विदेशांतून ६० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख, संत, अधिवक्ते, विचारवंत, लेखक आदी सहभागी झाले होते. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेच्या विरोधात १३ देशांतून, २३ राज्यांतून, ४०० गावांतून हिंदूंचे विश्‍वव्यापी आंदोलन उभे करण्यात आले. २५० ठिकाणांहून सरकारला निवेदने देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीने तिच्या संकेतस्थळावर ठेवलेल्या ‘ऑनलाईन’ तक्रारअर्जातून २ सहस्र ७५० हून अधिक लोकांनी या हिंदुविरोधी कार्यक्रमाला विरोध नोंदवला.

८. राष्ट्रीय भावना जागवण्यासाठी करण्यात येणारे समाजसाहाय्य

कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिसांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चहा आणि अल्पाहार यांचे वाटप करण्यात आले. यावर्षी सप्टेंबरमध्ये चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी हिंदु जनजागृती समितीने अन्य संस्थांच्या साहाय्याने २ सहस्र ३०२ लोकांना अन्नधान्याचे वाटप केले. कोरोनाग्रस्त रुग्णांना अळ्या असलेल्या निकृष्ट अन्नाचा पुरवठा करणार्‍या संस्थेच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे ‘सुराज्य अभियान’अंतर्गत ऑक्टोबर २०२० मध्ये तक्रार करण्यात आली.

९. आरोग्यक्षेत्रातील अपप्रवृत्तींच्या निवारणासाठी आरोग्य साहाय्य समिती

वर्ष २०१८ मध्ये चालू झालेल्या या उपक्रमाचा आरोग्य क्षेत्रातील अन्याय, भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध वैध मार्गाने लढणे, तसेच या क्षेत्रातील चांगले आधुनिक वैद्य, परिचारिका, तंत्रज्ञ आदींचे संघटन करणे हा मुख्य उद्देश आहे. आरोग्य साहाय्य समितीने आवाज उठवल्यामुळे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील ‘सिटी स्कॅन सेंटर’ने ५ जणांची अतिरिक्त आकारलेली रक्कम परत केली, तर पिंपरी (पुणे) येथील ‘सिटी स्कॅन सेंटर’ने घेतलेली ५ सहस्र रुपयांची अतिरिक्त रक्कम रुग्णाच्या नातेवाइकांना परत मिळवून देण्यात आरोग्य साहाय्य समितीला यश आले.

१०. कृतज्ञता !

धर्माचरण शिकवून त्यांच्यातील धर्माभिमान जागृत करणे यांसह समाजाला राष्ट्राप्रतीच्या कर्तव्यांची जाणीव करून देऊन आदर्श समाजनिर्मिती करणे, यांसाठी गेली १९ वर्षे अथकपणे कार्यरत असणारी हिंदु जनजागृती समिती आता २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने चालू असलेल्या समितीच्या कार्याला आतापर्यंत राष्ट्र-धर्म प्रेमींनी दिलेला पाठिंबा आणि तिच्यावर दाखवलेला विश्‍वास यांमुळे प्रतिदिन नवीन लक्ष्य समोर ठेवून समिती कार्यरत आहे. समितीच्या कार्याला आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात, तसेच प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या साहाय्य करणार्‍या सर्व धर्मबांधवांची हिंदु जनजागृती समिती आभारी आहे. धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाच्या कृपाशीर्वादानेच हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीच्या कार्यात एक एक पाऊल पुढे टाकत राहील, यात शंका नाही. या कार्यात अधिकाधिक हिंदूंनी सहभागी होऊन राष्ट्र-धर्म कार्यात त्यांचे योगदान द्यावे, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !

– श्री. सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती (५.१०.२०२१)

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क साधा ! : ९३२२५३३५९५

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *