Menu Close

हिंदु जनजागृती समिती : हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील दीपस्तंभ !

आश्‍विन शुक्ल प्रतिपदेला (शारदीय नवरात्राच्या प्रथम दिनाला) हिंदु जनजागृती समितीचा १९ वा वर्धापनदिन साजरा होत असल्याच्या निमित्ताने…..

शिरोभाग

‘हिंदु राष्ट्र’ ! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु राष्ट्राचा जोरकसपणे उद्घोष केला; मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या शब्दाचा आणि सावरकरांना अपेक्षित हिंदु राष्ट्राचा विषय मागे पडत गेला. मधल्या काळात या विषयाची चर्चाही करता येत नव्हती किंबहुना ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय चर्चा करणे किंवा त्याची मागणी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एक अघोषित गुन्हाच झाला होता. साधारण २० वर्षांपूर्वीपर्यंत ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द सेक्युलरवाद्यांच्या उच्छादामुळे कोणी उच्चारण्यास धजावत नव्हते ! मात्र १९ वर्षांपूर्वी एका संघटनेची स्थापना झाली आणि पुन्हा एकदा हिंदु राष्ट्राचा जोरकसपणे चालू झाला आणि आजघडीला चोहोबाजूंनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी जोर धरत आहे. भारतातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये हिंदु राष्ट्राविषयी आत्मविश्‍वासपूर्ण वातावरण निर्माण करण्यास ही संघटना कारणीभूत ठरली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ती म्हणजे ‘हिंदु जनजागृती समिती’ ! हिंदु राष्ट्र स्थापनेचे महन्मंगल अन् उदात्त ध्येय समोर ठेवून आज, म्हणजे आश्‍विन शुक्ल प्रतिपदेला हिंदु जनजागृती समिती १९ वा वर्धापनदिन साजरा होत आहे, त्या निमित्ताने हिंदु राष्ट्र स्थापना कार्याचा घेतलेला हा मागोवा !

१. स्थापना आणि उद्देश

राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांचे कृतीशील संघटन करणार्‍या हिंदु जनजागृती समितीची स्थापना ७ ऑक्टोबर २००२ या दिवशी, म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी झाली. हिंदूंना धर्मशिक्षण देणे, राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी हिंदूंना सजग करणे, संस्कृती आणि धर्म रक्षण यांसाठी हिंदूंचे प्रबोधन करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने पायाभरणी करण्याचे मोलाचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. हे कार्य करण्यासाठी समिती धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि सामाजिक साहाय्य या पंचसूत्रीच्या अंतर्गत विविध मोहिमा आणि उपक्रम राबवत आहे. या माध्यमातून हिंदु राष्ट्रहिताच्या दृष्टीने विचार करणारे एक राष्ट्रव्यापी व्यापक हिंदूसंघटन उभे रहात आहे ! आज समितीचे ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग, चर्चासत्र आणि शिबिरे यांना मिळणारा प्रतिसाद पहाता समितीचे कार्य सहस्रावधी धर्मप्रेमी आणि राष्ट्राभिमानी हिंदूंपर्यंत पोचून त्यांना राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी दिशादर्शन होत आहे. समितीच्या अथक प्रयत्नांमुळे आज ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ हिंदु समाजमनावर बिंबते आहे !

२. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची यशोगाथा !

हिंदु जनजागृती समिती भारतभरातील हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभा; ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतरण’, ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ आदी विविध विषयांवरील सहस्रो व्याख्याने; धर्मजागृतीपर ग्रंथ; ‘काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद’, ‘राष्ट्रपुरूष आणि क्रांतीकारक यांची फलक-प्रदर्शने’; हिंदु सण-धार्मिक उत्सव यांविषयी धर्मशिक्षण देणारी हस्तपत्रके आदी अनेक माध्यमांतून जागृती करत आहे. तसेच HinduJagruti.org या संकेतस्थळाच्या माध्यमातूनही जगभरातील हिंदूंमध्ये जागृती करत आहे. या कार्याला भारतभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समिती करत असलेली जागृती आणि प्रबोधन यांमुळे आतापर्यंत ४०० हून अधिक घटनांमध्ये देवता किंवा राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखले गेले आहे, तर महाराष्ट्रात ६ अवैध पशूवधगृहे बंद पाडण्यात आली आहेत. समितीच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून गोवा शासनाला इयत्ता ७ वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील हिंदुद्रोही लिखाणामुळे संपूर्ण पुस्तक पालटावे लागले आहे, तर कर्नाटकमध्ये बंगळुरू जिल्ह्यांतील ४ मंदिरांत दर्शनार्थींसाठी वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्यात समितीला यश मिळाले. वर्ष २०२१ च्या हरिद्वार येथील कुंभमेळ्याच्या काळात रेल्वेच्या तिकिटावर लावलेला ‘यात्रा अधिभार’ समितीने आवाज उठवल्यावर रहित करण्यात आला. समितीने महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर येथील शासन-अधिग्रहित मंदिरांच्या समित्यांचे घोटाळे उघड केल्याने त्यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी चालू झाली. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात गेल्या १८ वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती आवाज उठवत असून या विषयावरील समितीने प्रकाशित केलेल्या ग्रंथांच्या आतापर्यंत ३ लाख ३ सहस्त्र ७७५ प्रती वितरीत झाल्या आहेत. गेल्या ५-७ वर्षांपूर्वी ‘लव्ह जिहाद’ हा शासनदरबारी मान्यच केला जात नव्हता; मात्र याविषयी केलेल्या जागृतीचा परिणाम म्हणजे आज देशातील चार राज्यांत ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ संमत झाला असून दोन राज्यांत होऊ घातला आहे. हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृती कार्याला मिळालेली ही पोचपावतीच म्हणायला हवी.

३. धर्माचे अर्थात ईश्‍वराचे अधिष्ठान, हेच समितीच्या यशाचे गमक !

लक्षावधी हिंदूंच्या मनामध्ये हिंदु राष्ट्राचा विचार रूजवून समितीने ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !’ हा हिंदु राष्ट्राचा जयघोष प्रचलित केला. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते केवळ राष्ट्रभक्त नाहीत, तर ते धर्माचरणीही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तेव्हा त्यांचे मावळे हेही छत्रपती शिवरायांच्या आदर्श व्यवस्थेतून तयार झालेले असल्याने तेही आदर्शच होते. समर्थ रामदासस्वामींनी केलेल्या उपदेशानुसार ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ समितीचे कार्यकर्ते धर्मकार्यातील प्रत्येक कृती करतांना तेथे ईश्‍वरी अधिष्ठान ठेवण्याचा कटाक्षाने प्रयत्न करतात; परिणामी समितीच्या कार्याला आणि कार्यकर्त्यांना यश मिळते, अशी सर्वांची श्रद्धा आहे. ईश्‍वराची कृपा आणि संतांचे आशीर्वाद असतील, तर कार्याला यश मिळतेच. आज असंख्य धर्मप्रेमी हिंदूंनी समितीच्या ‘ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून कार्य करणे’ या सूत्रामुळे त्यानुसार कृती करण्याचा प्रयत्न आरंभला आहे.

४. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ या एका समान ध्येयाने हिंदुत्वनिष्ठांचे संघटन करणारी हिंदु जनजागृती समिती एकमेवाद्वितीय !

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन, गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, हिंदूंच्या हत्या, दंगली, अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण हे हिंदूंवरील आघात; त्याचसमवेत सर्व क्षेत्रांतील भ्रष्टाचार, गरिबी, लोकसंख्या वाढ, बेरोजगारी, स्त्रियांचे संरक्षण, आरक्षण आदी राष्ट्रापुढील समस्या; तसेच नक्षलवाद, आतंकवाद आदी सर्वच समस्यांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हेच एकमेव उपाय आहे, हे हिंदु जनजागृती समिती ठामपणे प्रतिपादीत करत आली आहे. याचा प्रत्यय आता अन्य हिंदुत्वनिष्ठांना येऊ लागला आहे. त्यामुळे विविध समस्यांच्या विरोधात एकट्याने कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ ‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या एका समान ध्येयाकडे वळत आहेत. संतवचनानुसार वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे’, याविषयी हिंदुसमाजमनात आत्मविश्‍वास निर्माण होत आहे, तसेच ‘हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा संवैधानिक अधिकार आहे’, हे हिंदूंना सुस्पष्ट झाले आहे. आज ‘हिंदु राष्ट्र’ कि ‘सेक्युलर राष्ट्र’ हा प्रश्‍न नसून ‘इस्लामी राष्ट्र’ कि ‘हिंदु राष्ट्र’ हा प्रश्‍न आहे, हे सध्याची देशातील स्थिती पहाता सर्वांच्या लक्षात येऊ लागले असून आता हा हिंदूंच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न आहे, हा संभाव्य धोका समितीने हिंदु समाजाला सांगत आली आहे. त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक असल्याची भावना हिंदूंमध्ये निर्माण होत आहे.

५. हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्ट्र जागृतीपर उपक्रम !

समिती हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी उपक्रम ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’, धर्मशिक्षणवर्ग, ‘जागो हिंदू’ संदेश, स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग, शौर्य जागरण शिबीरे, प्रथमोपचार प्रशिक्षण आदी उपक्रम राबवते, तर हिंदुसंघटनासाठी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, ‘राष्ट्रीय पत्रकार मंच’, ‘उद्योगपती परिषद’ आदी उपक्रम राबवते. यांसह समाजसाहाय्यासाठी ‘सुराज्य अभियान’ आणि ‘आरोग्य साहाय्य समिती’ हे उपक्रमही राबवण्यात येतात. सोशल मीडीयाच्या माध्यमातून सप्ताहातून दोनदा ‘चर्चा हिंदु राष्ट्र की !’ ही ‘ऑनलाईन’ परिसंवाद मालिका चालू असून याद्वारे विविध विषयांवर मान्यवरांना आमंत्रित केले जाते. देवतांचे विडंबन रोखणे, मंदिर रक्षण मोहीम, संस्कृतीरक्षण मोहीम, ‘राष्ट्रध्वज सन्मान राखा’ मोहिम, इतिहासाचे विकृतीकरण रोखा मोहीम, या मोहिमा नियमितपणे राबवल्या जातात. समितीने यंदाच्या वर्षी ‘हलाल प्रमाणपत्र पद्धती रहित करा’ आणि ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतररराष्ट्रीय हिंदुत्वविरोधी परिषदेला विरोध या मोहिमा मोठ्या प्रमाणात राबवल्या आहेत.

www.HinduJagruti.org संकेतस्थळासह, ‘HinduJagruti’ हा यू-ट्युब चॅनल, ‘HinduJagrutiOrg’ हे ट्वीटर हॅण्डल समितीच्या वतीने चालवले जाते. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नामजप सत्संग’, ‘धर्मसंवाद’, ‘भावसत्संग’ आणि ‘बालसंस्कार’ या ४ ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांची शृंखलाही समविचारी संघटनांसह चालू आहे.

गेली १९ वर्षे अविरतपणे कार्यरत असणारी हिंदु जनजागृती समिती आता २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे आदर्श हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला आतापर्यंत राष्ट्र-धर्म प्रेमींनी भरभरून पाठिंबा दिला, विश्‍वास दाखवला, प्रत्यक्ष सहकार्य केले, यांमुळे प्रतिदिन नवीन लक्ष्य समोर ठेवत समिती कार्यरत आहे. या कार्यात अधिकाधिक हिंदूंनी सहभागी होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान द्यावे, असे हिंदु जनजागृती समिती आवाहन करत आहे.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *