हिंदूंना वाली कोण ?
‘कवर्धा येथे धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर शांती आणि सद्भावना टिकून रहाण्यासाठी भगवा ध्वज काढण्यास सांगितले होते’, असे पोलिसांचे म्हणणे आहे. इथे धार्मिक सण म्हणजे कोणते ? आणि त्या काळात हिंदूंच्या भगव्या ध्वजावर कुणाचा आक्षेप असेल ? हे निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. अन्य पंथियांच्या सणांचा सहिष्णुतापूर्वक सन्मान करणे, ही हिंदूंची मानसिकता आहे. त्यामुळे पोलिसांनी भगवा ध्वज काढण्याविषयी सांगितलेल्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. हिंदू कधीच अन्य पंथियांच्या उत्सवांमध्ये मिठाचा खडा टाकत नाहीत; पण हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंसाचार घडवून आणायला कुणाला जोर चढतो ? हे जगजाहीर आहे. कवर्धा येथेही नेमके तेच घडले, हेच घटनाक्रमातून दिसून येते. दुर्दैव म्हणजे पोलिसांनी नेहमीप्रमाणे धर्मांधांच्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करून हिंदूंवर लाठीमार केला. छत्तीसगडमध्ये हिंदू अन्यायाने होरपळत असतांना काँग्रेसच्या भूपेश बघेल सरकारने बघ्याची भूमिका घेतली. ही घटना घडत असतांना काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा लखीमपूरमध्ये राजकीय नाट्य घडवण्यात गुंतले होते. कवर्धामध्ये उसळलेल्या हिंसाचाराची प्रसिद्धीमाध्यमांनीही म्हणावी तशी नोंद घेतली नाही. ना इथे कुणी सांत्वन करण्यासाठी आले, ना कुणी हिंदूंना रक्षणासाठी आश्वस्त केले. हिंदूंना त्यांची व्यथा मांडण्यासाठी हक्काचे असे कुणीच नव्हते. ‘पुरस्कार वापसी’ टोळी अशा वेळी दडी मारून बसते.
हिंदूंच्या रक्षणाचे दायित्व सरकारचे !
कवर्धा येथे हिंदूंकडून तोडफोड चालू असल्याचे आरोप सामाजिक माध्यमांतून केले जात आहेत. तोडफोड करण्याचे समर्थन नसावेच; मात्र हिंदूंनी अशी भूमिका घेतली, याचे आश्चर्य वाटते. अगदी स्वधर्मातील देवतांचा अवमान झाला, तरी आजतागायत हिंदूंनी तो निमूटपणे सहन केला आहे. धर्मांतर, हिंदुत्वनिष्ठांच्या, तसेच साधू-संतांच्या हत्या झाल्या, तरी हिंदूंनी शस्त्र उचलले नाही. एवढेच नव्हे, तर लव्ह जिहादद्वारे हिंदूंवर वांशिक आक्रमणे झाली, तरी हिंदू त्या विरोधातील कायद्याची मागणी करत न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. असे असतांना हिंदूंवर तोडफोड करण्याची वेळ का आली ? याचा विचार करणे प्राधान्याचे ठरील. जिहादी धर्मांधता जिवावर उठत असतांना कायद्याचे रक्षक म्हणवणारे पोलीस षंढपणाची भूमिका घेत असतील, तर प्रतिकार करणे, हा आक्रमणे झेलणार्याचा अधिकार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कवर्धा येथील हिंदूंच्या संदर्भातही असेच झाले नसेल कशावरून ? तथापि हिंदु समाज शांतताप्रिय आणि सहिष्णु आहे. त्यामुळे कायदेशीर संरक्षण आणि वैध मार्गाने विरोध करणे, हेच धर्मप्रेमी हिंदूंचे धोरण राहील. कायद्याचा सन्मान करणार्या हिंदु समाजाचे धर्मांधांपासून रक्षण करण्याचे दायित्व सरकारचे आहे. त्यामुळे कवर्धा येथील घटनेत केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दोषी धर्मांध आणि पोलीस यांवर कठोर कारवाई करावी. यासह देशभरात हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने कठोर कायदे करून त्यांची कार्यवाहीही प्रभावीपणे करायला हवी, हीच हिंदूंची मागणी आहे.
हिंदूसंघटन अपरिहार्य !
धर्मांधांनी भगवा ध्वज काढल्यानंतर आता कवर्धा येथील हिंदूंनी संघटितपणे पुन्हा सन्मानाने त्याच ठिकाणी भगव्या ध्वजाची स्थापना केली आहे. यानंतर तेथील हिंदूंनी माता विंध्यवासिनीदेवीच्या चरणी प्रार्थना केली आणि झालेल्या घटनेचा निषेध केला आहे. हिंदूंमध्ये आलेले हे बळ म्हणजे माता विंध्यवासिनीची कृपाच म्हणावी लागेल. ७ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला आरंभ झाला. या काळात आदिशक्तीचे तत्त्व सहस्रो पटींनी कार्यरत असते. सद्यःस्थितीत हिंदूंना राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर कुणी सहानुभूती दर्शवत नाही. त्यामुळे दैवी शक्तीचे पाठबळच धर्मप्रेमी हिंदूंना विविध आघातांमधून तारणार आहे, हे लक्षात येते. छत्तीसगडमधील अन्यायग्रस्त हिंदूंनी सामाजिक माध्यमांवर त्यांची स्थिती मांडली. देशभरातील धर्मप्रेमी हिंदूंनी त्यांना पाठिंबा दिला. यावरून भगवंताचा आशीर्वाद आणि धर्मप्रेमी हिंदूंचा जनाधार, हाच पीडित हिंदूंसाठी आशेचा किरण आहे, हे लक्षात येते. यासाठी हिंदूसंघटन अपरिहार्य आहे. दैवी पाठबळ, संघटितपणा आणि वैध मार्गाने सातत्याने लढा देणे, हाच कवर्धा येथील घटनेतून हिंदूंना धडा मिळालेला आहे. त्यामुळे धर्मप्रेमी हिंदूंनी प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शीघ्रातीशीघ्र प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात