Menu Close

धुमसते काश्मीर !

जिहादी आतंकवाद्यांनी ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांची गोळ्या झाडून हत्या केली
काही वर्षांपूर्वी ‘काश्मीरमध्ये आतंकवादाचा भस्मासुर होता’, असे सांगितले जायचे; परंतु ‘आता तो संपुष्टात येत आहे’, असेही म्हटले जाऊ लागले. त्यामुळे अर्थात्च ही गोष्ट काश्मिरी नागरिक आणि भारतीय यांच्यासाठी दिलासादायक ठरत होती; पण हा दिलासा पुन्हा भीतीतच रूपांतरित झाला. जिहादी आतंकवाद्यांनी जम्मू-काश्मीरची राजधानी असणार्‍या श्रीनगर येथील संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून मुख्याध्यापिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या ५-६ दिवसांत आतंकवाद्यांनी एकूण ७ जणांची हत्या केली आहे. त्यामुळे या सर्वच घटना ‘आतंकवादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे’, असे म्हणायला कारणीभूत ठरल्या आहेत. हत्या झाल्यानंतर नेहमीचे सोपस्कार केले जातात. मृतांना श्रद्धांजली वाहिली जाते, ‘आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करू’, ‘आतंकवाद नष्ट करू’, अशी तोंडदेखली आश्वासने दिली जातात. काश्मीरमध्येही असे झाले; पण मग आता पुढे काय ? ‘हत्याकांडाचा आम्ही निषेध करतो. निष्पाप नागरिकांना ठार केले जात आहे’, असे मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केले. ‘अशा स्वरूपाची आक्रमणे करणार्‍या आतंकवाद्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल’, असे नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले. अशी केवळ विधाने नकोत, तर दिलेली आश्वासने सत्यात कधी येणार ? ते जनतेला दिसायला हवे. एरव्ही मानवतावादी भूमिका घेणारे उपटसुंभ या निष्पापांच्या हत्यांचा कधीच विरोध करणार नाहीत, हे लक्षात घ्या. लखीमपूर खिरी प्रकरणात डोके घालणारे, तेथील हत्याकांडाच्या विरोधात बोलणारे, त्या प्रकरणासाठी आटापिटा करणारे, तसेच काँग्रेसवाले हे श्रीनगर येथे झालेल्या क्रूर हत्याकांडाविषयी का बोलत नाहीत ? निधर्मीवादीही मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला जाणार नाहीत; कारण जे मृत झाले, ते हिंदू होते. शांतीदूत असल्याचा आव आणणार्‍या अशांना नागरिकांनी लक्षात ठेवावे.

काश्मीर स्वर्गच हवे !

काश्मिरी पंडित आणि श्रीनगरमधील प्रसिद्ध औषधालयाचे मालक माखनलाल बिंद्रू यांचीही आतंकवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी हत्या केली. हत्येच्या काही कालावधीनंतर जे झाले, ते सर्वांनीच एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले असेल ! बिंद्रू यांची कन्या डॉ. श्रद्धा ही आतंकवादाच्या विरोधात ललकारी देत, सर्वांना साद घालत धिराने उभी राहिली आहे. वडिलांची हत्या होऊनही ना तिच्या डोळ्यांमध्ये भीती होती, ना ती खचलेली होती ! हिंदुत्वाचा अंगार तिच्या बोलण्यातून, तसेच तिच्या देहबोलीतून क्षणाक्षणाला दिसून येत होता. तिचा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिचे कौतुक करत तिला ‘योद्धा’ संबोधले. तिच्या धाडसाचे गोडवे गायले. तिचे समर्थन केले. पुन्हा डोके वर काढलेल्या आतंकवादाला समूळ नष्ट करण्यासाठी श्रद्धासारख्या धाडसी तरुणींचीच आवश्यकता आहे. आतंकवाद्यांनी हत्या केलेले शिक्षक दीपक चंद यांच्या आई कांतादेवी म्हणाल्या, ‘‘आतंकवाद्यांनी काश्मीरला हिंदूंसाठी नरकच बनवलेले आहे.’’ त्यांची व्यथा प्रत्येक हिंदूने लक्षात घ्यायला हवी. कोणे एकेकाळी काश्मीर हे भारतासाठी नंदनवन होते, नव्हे नव्हे, तर स्वर्गच होता; परंतु आज तेच काश्मीर आपल्यासाठी नरक झाले आहे. ही अतिशय दुर्दैवी आणि तितकीच संतापजनक घटनाही आहे. काश्मीरमध्ये अल्पसंख्य बहुसंख्य झाले आणि ते नंतर अल्पसंख्यांक झालेल्या हिंदूंवर मर्दुमकी गाजवू लागले. त्यातूनच स्वर्गाचे नरक झाले. आता या नरकाचे पुन्हा स्वर्गात रूपांतर करण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनाच संघटित व्हायला हवे. आतापर्यंत काश्मीरचे अनेक लचके तोडण्यात आलेले आहेत; परंतु आता उरलेसुरले काश्मीर आतंकवाद्यांच्या हाती आपल्याला लागू द्यायचे नाही. हिंदूंना वेचून वेचून ठार करणार्‍या आतंकवाद्यांच्या विरोधात सरकारने कठोर पाऊल उचलायला हवे, अन्यथा हिंदूंच्या अशा किती हत्या होत रहातील, याचा विचारच आपण करू शकत नाही. सरकारकडून प्रत्येक भारतीय आणि काश्मिरी पंडित हे कणखर, रोखठोक अन् राष्ट्रप्रेमी भूमिकेची अपेक्षा करत आहेत. या भूमिकेला सरकारने न्याय द्यावा !

इस्रायलकडून शिका !

आज शाळेच्या मुख्याध्यापिकेची हत्या झाली. यामुळे काश्मीरमधील सर्वच शाळा प्रशासन आणि संबंधित लोक भयभीत झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा तर विचारच करू शकत नाही, इतके ते हादरून गेले असतील. ते आता शाळेत जाण्यास तरी धजावतील का ? क्रूर हत्याकांडामुळे विध्वंसक परिणाम होत आहेत. देशाची अपरिमित हानी होत आहे, हे वास्तव सरकारने लक्षात घ्यावे. या अनुषंगाने सरकारने प्रयत्नशील व्हावे. काश्मीरमधील दगडफेक करणारे आतंकवादी असोत किंवा फुटीरतावादी असोत, त्या सर्वांनाच आतापर्यंतच्या राजकीय पक्षांनी साहाय्य केले, त्यांच्याप्रती सहानुभूती दर्शवली. त्यामुळे त्यांचे फावत गेले. यातूनच हत्या आणि हिंसाचार यांचे प्रमाण वाढले. प्रतिदिन होणारी हत्याकांडे, आक्रमण, हिंसाचार हे म्हणजे एकप्रकारे युद्धच आहे. यात आपल्याला विजयी व्हायचे आहे. आतंकवाद्यांचे सर्वच डावपेच निष्प्रभ करायचे आहेत. यासाठी भारताला इस्रायलप्रमाणे अभिमान राखायला हवा. इस्रायल आपल्या एकाही नागरिकाचा मृत्यू कधीच वाया जाऊ देत नाही. भारताने त्याच्याकडून बोध घ्यायला हवा. आतंकवादी काश्मीरला गिळंकृत करू पहात आहेत. त्यामुळे आता काश्मीरला ‘इस्लामिक राज्य’ होऊ न देता त्याचे पुनर्वैभव त्याला प्राप्त करून द्यायला हवे. तसे झाल्यासच तेथील हिंसाचाराचा आगडोंब थांबेल आणि खर्‍या अर्थाने काश्मिरी पंडितांना न्याय मिळेल !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *