Menu Close

‘सनातन’च्या नावे नोकरी देण्याचे आमिष दाखवणार्‍यांपासून सावध रहा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस
मुंबई – सनातन संस्थेच्या ठाणे जिल्ह्यातील एका साधकाला नुकताच एका महिलेचा दूरभाष आला होता. तिने विचारले, ‘सनातन संस्थेची कळवा (जिल्हा ठाणे) येथे शाळा चालू होत आहे ना. त्यात मला नोकरी मिळू शकेल का ? तुमचा संपर्क क्रमांक मला राबोडी येथील एका हिंदुत्वनिष्ठांकडून मिळाला.’ त्यावर साधकाने संबंधित हिंदुत्वनिष्ठाला संपर्क केला असता त्यांनी दूरभाष क्रमांक दिल्याचे मान्य केले.

सदर महिलेस उत्तरप्रदेशमधील अज्ञात व्यक्तीने दूरभाष करून ‘सनातन संस्थेची कळवा येथे शाळा चालू होणार आहे. त्यासाठी ४ सहस्त्र रुपये भरून नोकरी मिळवता येईल’, असे सांगितले. त्यानंतर त्या साधकाने महिलेस तो फसवणूक करणारा दूरभाष असून असा कोणताही उपक्रम सनातन संस्था राबवत नसल्याचे स्पष्ट केले.

या संदर्भात ‘सनातन संस्थे’चे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी सांगितले की, सनातन संस्था विनामूल्य अध्यात्मप्रसाराचे कार्य करत असून अशा प्रकारचे व्यावहारिक उपक्रम राबवत नाही. त्याप्रमाणे कळवा (जिल्हा ठाणे) येथे वा अन्य कुठेही शाळा अथवा अन्य कोणताही व्यावहारिक उपक्रम चालू केलेला नाही. हे लक्षात घेऊन नागरिकांनी सनातनच्या नावे नोकरी देण्याचे आमिष दाखवणार्‍यांपासून सावध रहावे आणि स्वतःची संभाव्य फसवणूक टाळावी.

अशा प्रकारे कोणतीही योजना सनातनच्या नावाने असल्याचे कुणी सांगत असतील, तर सनातन संस्थेच्या कार्यालयात ७०५८८८५६१० या क्रमांकावर वा [email protected] या ई-मेलवर तात्काळ संपर्क करून त्या विषयी कळवावे. तसेच सनातनच्या नावाने होत असलेल्या फसव्या प्रलोभनाला जनतेने बळी पडू नये, असे सनातन संस्थेकडून कळवण्यात आले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *