अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालात ‘धार्मिक भावना, प्रतिके, श्रद्धास्थाने यांचा सन्मान ठेवणे आवश्यक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेथे लागू नाही’, असे मत नोंदवले. एका व्यक्तीने राम-कृष्ण यांच्याविषयी एक अश्लील ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केली होती. त्याविषयी न्यायालयात खटला चालू होता. आरोपीकडून ‘अशा प्रकारे ‘पोस्ट’ करणे हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे’, असे सांगण्यात आले. त्याविषयी न्यायालयाने त्याची चांगली कानउघाडणी करत ‘राम-कृष्ण यांच्याविना भारत अपूर्ण आहे. ज्या देशात रहातो, तेथील संस्कृती, महापुरुष यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) मानणारी आहे. आमच्या ऋषिमुनी यांनी मानवाला देव बनण्याचा मार्ग दाखवला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितले आहे, ‘रामायण आणि महाभारत यांच्यात भारताच्या आत्म्याचे दर्शन होते.’ राम आणि कृष्ण यांच्याविरुद्ध अश्लील टीपणी क्षमापात्र नाही. राम आणि कृष्ण यांचा अपमान हा पूर्ण देशाचा अपमान आहे, जो सहन करता येणार नाही.’
बहुसंख्यांकांच्या धर्माचा अवमान !
उच्च न्यायालयाचे हे प्रतिपादन बरेच काही सांगून जाते. न्यायालयाने ‘बहुसंख्य हिंदूंच्या अस्मितांचा सन्मान राखला गेला पाहिजे’, हेच या निकालपत्रातून सांगितले आहे. भारतात बहुसंख्य हिंदु समाज आहे, जो सहिष्णु आहे. सहिष्णु हिंदु समाजाच्या श्रद्धास्थानांचा अवमान विविध स्वातंत्र्य, राज्यघटना यांच्या नावाखाली खपवला जातो. हिंदूंचे प्रभावी संघटन नसल्यामुळे आणि त्यांच्यात धर्माभिमानाचा अभाव असल्याने बहुसंख्य हिंदू यांविषयी आवाज उठवत नाहीत. परिणामी अवमान करणार्यांचे फावते. अन्य देश विशेषत: इस्लामी देशांमध्ये इस्लामी प्रथा, परंपरा अथवा इस्लामी प्रतिकांचा अवमान यांविरुद्ध कठोर कायदे आहेत आणि तेथे श्रद्धास्थानांच्या अवमानाच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होऊन त्याची कार्यवाहीही त्वरित होते. आपल्या येथे मात्र उलटे चित्र आहे.
काही वर्षांपूर्वी मकबूल फिदा हुसेन या हिंदुद्वेष्ट्या चित्रकाराने हिंदूंच्या देवी-देवतांची नग्न आणि अश्लील चित्रे काढली होती. भारतमातेचे चित्र नग्न काढले होते. हिंदु जनजागृती समितीने याविषयी सर्वप्रथम आवाज उठवल्यावर तथाकथित विद्वानांनी ‘तुम्हाला कलेतील काय कळते ?’, असे सांगून या विरोधाची खिल्ली उडवली होती. तेव्हा हिंदु जनजागृती समितीने हुसेन यांनी हिंदुद्वेषीपणा जोपासत केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा कशा प्रकारे घोर अवमान केला आहे, हे अभ्यासपूर्णपणे उघड केल्यावर हुसेन यांच्यावर भारतभरात १ सहस्र २०० हून अधिक तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या. गुन्हे नोंद झाले. याच्या परिणामस्वरूप हुसेन यांना देश सोडून पळून जावे लागले आणि तेथेच त्यांचा अंत झाला.
सध्या जन्महिंदू तसेच अहिंदूंकडून हिंदूंच्या देवता, श्रद्धास्थाने यांवर टीका करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तनिष्क ज्वेलरी यांचे विज्ञापन असो, नवरात्रीत देवीच्या ८ अथवा १० हातांमध्ये आयुधांच्या ऐवजी उत्पादने दाखवणे असो, हिंदूंच्या देवतांचा उपयोग केवळ विज्ञापनाद्वारे व्यवसायवृद्धीसाठी करून घेत त्यांचा अवमान केला जातो. काही निधर्मीपणा जोपासणारे, अन्य धर्मीय यांच्याकडून सामाजिक माध्यमांवरील विशिष्ट गटांमधून हिंदु धर्माचा पराकोटीचा द्वेष करणारे द्वेषयुक्त, आधारहीन, संदर्भहीन लिखाण प्रसिद्ध केले जाते. हिंदु धर्माच्या अस्तित्वावर शंका उपस्थित केली जाते. तरी ते कायद्यापासून, पोलिसांपासून सुटका करवून घेण्यात यशस्वी होऊन उजळ माथ्याने पुढील गुन्हे करण्यास मोकळे होतात. ख्रिस्ती पाद्री हिंदूंच्या देवतांची यथेच्छ टींगलटवाळी करून धर्मांतर करतात. त्यात ते हिंदु धर्म कसा हीन आणि बुरसटलेला आहे ?, तर ख्रिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे ? हे सांगतात. नास्तिक व्यक्ती ताशेरे ओढतांना हिंदु धर्माविरुद्धच ओढतो, ख्रिस्ती अथवा इस्लामविरुद्ध नाही. चपला, पायपुसणी, कमोड अशी उत्पादने काढतांना त्यांवर हेतूत: हिंदूंच्या देवतांचीच चित्रे काढली जातात. विरोध झाल्यावर केवळ क्षमायाचना करणे, उत्पादन विक्रीतून बाजूला काढणे एवढेच होते. कठोर शिक्षा मिळत नाही.
धर्मशिक्षण आणि कठोर कायदा हे उपाय !
भारतात बहुसंख्य हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना होत असतांना त्याविरुद्ध ईशनिंदाविषयक कायदा होणे आवश्यक आहे. कायद्यातील कलमेही कठोर हवीत. अन्य पंथीय त्यांच्या पंथाचा अवमान झाल्याचा संशय जरी आला, तरी कायदा हातात घेऊन संबंधितांच्या संपत्तीची हानी करणे, धमक्या देणे आणि संबंधितांच्या हत्या करणे, यांसारख्या हिंसक कृती करतात. त्यामुळे त्यांच्या धर्माचा अवमान करण्याचे अथवा दूरूनही प्रथांवर टीका-टीपणी करण्याचे कुणी धैर्य करत नाहीत. याउलट हिंदूंचे आहे. संख्याबळाचा विचार करता हिंदूंची लोकसंख्या देशात ७० टक्क्यांहून अधिक आहे. तरी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान का होतो ? याचे उत्तरही न्यायालयाने त्याच्या निकालपत्रात दिले आहे. न्यायालयाने सांगितले आहे की, शाळेमध्ये संस्कृतीचा विषय असायला हवा. राम, कृष्ण, गीता यांविषयी मुलांना शिकवले गेले पाहिजे. हिंदु धर्माचा अवमान रोखण्यासाठी संसदेत कायदा करण्यात यावा. हिंदूंमध्ये असलेली धर्मशिक्षणाची वानवा हेच हिंदूंमधील धर्माभिमानाच्या अभावाचे मुख्य कारण आहे. ज्याविषयी चांगल्याप्रकारे माहिती असते, त्याचे इतरांच्या तुलनेत श्रेष्ठत्व माहिती असते, त्याविषयी व्यक्तीमध्ये अभिमान असतो. ‘हिंदु धर्म म्हणजे काय ?’ हेसुद्धा स्वातंत्र्यानंतर ज्यांच्या अनेक पिढ्यांना शिकवले गेले नाही, ते हिंदु धर्माविषयी कसे सजग असतील ? त्यामुळे भारतात हिंदु धर्माचे शिक्षण सक्तीचे करण्यात यावे. याच अलाहाबाद न्यायालयाने काही दिवसांपूर्वी ‘गोहत्या रोखण्यासाठी गायीला सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा’, असे मत नोंदवले होते. हिंदु धर्माला सन्मान मिळवून देण्यासाठी, त्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी कार्यरत अशी न्यायालये आणि न्यायामूर्ती देशासाठी भूषणावह आहेत, यात शंकाच नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात