Menu Close

चिनी उद्दामपणा कायम !

‘कोणत्याही देशाला त्याचा शेजारी पालटता येत नाही’, असे म्हटले जाते. असे असले, तरी कुरापती करणार्‍या शेजार्‍याला त्याला समजेल अशा भाषेत नक्कीच समजावता येऊ शकते. त्यासाठी आपलीही शक्ती आणि क्षमता असणे आवश्यक आहे. जर आपला आपल्या शक्तीवर आणि क्षमतेवर विश्वास नसेल, तर असे राष्ट्र नेहमीच शेजारी देशाच्या कुरापती सहन करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. शेजारी देशालाही हेच अपेक्षित असते की, त्याच्या कुरापतीमुळे हा देश बेजार व्हावा आणि त्याची स्थिती नेहमीच तणावाची रहावी. याला आक्रमक वृत्ती म्हणतात. प्रत्येक शासनकर्त्यामध्ये हा गुण असणे आवश्यक असतो अन्यथा शेजारील देश कधी आपल्या देशावर आक्रमण करील किंवा कुरापती करील याचा नेम नसतो. आर्य चाणक्यांच्या नीतीमध्येही याचा दाखला आहे. भारतीय शास्त्रांमध्येही याचे ज्ञान आहे; मात्र २० व्या शतकात भारतात ‘गांधीवाद’ नावाचे आत्मघातकी तत्त्वज्ञान भारतासारख्या देशात उत्पन्न झाले आणि तेव्हापासून भारतियांना म्हणजे हिंदूंना आणि त्यांच्या देशाला अन्य पंथीय अन् अन्य देश यांच्याकडून मार खाण्याचीच, त्यांच्या कुरापतींसमोर दबून रहाण्याचीच सवय लागली. ही सवय अद्यापही भारताला मोडता आलेली नाही, इतका या गांधीवादी तत्त्वज्ञानाचा पगडा भारतावर आणि भारतियांवर आहे. गांधीवादाचे हे जोखड फेकून देण्याचे धाडस कुणी दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला ‘हिंसक’, ‘तालिबानी’, ‘असहिष्णु’ आदी शिव्या देण्यास प्रारंभ केला जातो आणि त्याचे करता येईल, तितके खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो. यामुळेच देशाची सीमा अशांत आहे आणि देशाच्या अंतर्गतही अशांतता आहे, हे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत आपण पहात आलो आहोत. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे चीनच्या सैन्यासमवेत १३ व्या फेरीची चर्चा भारतीय सैन्याकडून करण्यात आली. यात भारताने ‘लडाखमधील भारतीय सीमेमधील देपसांग आणि डेमचोक येथे चीनचे घुसखोरी करून आत आलेले सैन्य माघारी घ्यावे’, असे सांगितले. गेल्या काही मासांपासून चिनी सैन्याने भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केली आहे. भारताची ही मागणी चीनने नाकारत भारतावरच अवास्तव मागणी करण्याचा आरोप केला. याला म्हणतात ‘चोराच्या उलट्या बोंबा !’ चीनने आतापर्यंत अनेकदा भारतीय सीमेमध्ये घुसखोरी केली आहे आणि करत आहे.

काही दिवसांपूर्वीच त्याने उत्तराखंडमधील बाराहोटी आणि अरुणाचल प्रदेशातील तवांग क्षेत्रात घुसखोरी केली होती. या वेळी भारतीय सैन्याने चिनी सैन्याला रोखण्याचाही प्रयत्न केला होता. या घटनांविषयीही या बैठकीत भारताकडून सूत्र उपस्थित करण्यात आले; मात्र चीनने भारताच्या कोणत्याही सूत्रांना दाद दिली नाही. जवळपास ८ घंट्यांच्या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. यापूर्वी डोकलामच्या प्रकरणी चिनी सैन्यासमवेत चर्चेच्या १२ फेर्‍या झाल्यानंतर चीनने सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले होते. चीन नेहमीच भारतात घुसखोरी करतो आणि नंतर भारता त्यांच्यासमवेत चर्चा करत बसतो. ही चीनची एक रणनीती आहे. याद्वारे तो भारतावर सातत्याने दबाव निर्माण करून स्वतः वरचढ रहाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यात तो नेहमीच यशस्वी ठरलेला असतो. भारताने गांधीवादी भूमिका अंगीकारली असल्याने आतापर्यंत भारताने कधी पाक किंवा चीन यांच्या सीमेत घुसून त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा विचारही केला नाही. ‘असा विचार म्हणजे मोठे पाप आहे’, अशीच काहीशी मानसिकता आतापर्यंतच्या शासनकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. आता भारत काही अंशी आक्रमक धोरण अवलंबत आहे; मात्र त्याला अजून धार हवी. ज्याच्याकडे शक्ती आहे तोच शांततेच्या गोष्टी करू शकतो. दुर्बल कधीही शांतता प्रस्थापित करू शकत नाही, हे भारताविषयी नेहमीच दिसून येत असते. हे भारतियांना कधी उमगणार ? हाच मुख्य प्रश्न आहे.

छोट्या युद्धाची आवश्यकता !

चीनकडून होणार्‍या कुरापती रोखण्यासाठी चीनसमवेत एखादे लहान युद्ध केले पाहिजे, असा मतप्रवाह तज्ञांमध्ये आहे. यातून चीनला आणि भारताला त्यांच्या सैन्यबळाच्या शक्तीचा आवाका लक्षात येऊ शकतो, असे म्हटले जाते. वर्ष १९६२ मध्ये चीनने भारताचा पराभव केला. यामागे भारतीय सैनिक लढले नाहीत, असे नाही, तर त्या वेळचे पंतप्रधान नेहरू आणि संरक्षणमंत्री मेनन यांच्या कचखाऊ आणि राष्ट्रघातकी धोरणांमुळे भारताचा पराभव झाला होता. या घटनेनंतर वर्ष १९६५ मध्ये लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात पाकिस्तानसमवेतच्या युद्धात भारताचा विजय झाला. ‘या वेळी भारताची हानी झाल्याने त्याच्याकडे लढण्याची क्षमता नसणार’, असा विचार करून वर्ष १९६७ मध्ये चीनने सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्याने चीनच्या सैन्याची मोठी हानी केली आणि या छोट्या लढाईत भारत वरचढ ठरला. त्यानंतर आतापर्यंत चीनने कधीही भारताशी दोन हात केलेले नाहीत. हे पहाता भारताने आता चीनशी छोटे युद्ध करून त्याच्या क्षमतेला जोखले पाहिजे. चीनने देपसांग आणि डेमचोक येथे केलेल्या घुसखोरीला शस्त्रानेच उत्तर दिले पाहिजे आणि त्याच्या सैन्याला हाकलून लावले पाहिजे. चर्चेचे गुर्‍हाळ चालवून चीन एखाद्या वेळेत जरी माघारी गेला, तर काही काळाने पुन्हा दुसरीकडे कुठेतरी घुसखोरी करील आणि पुन्हा भारताला दबावात ठेवून चर्चेचे गुर्‍हाळ चालू ठेवील. चीनची ही रणनीती उद्ध्वस्त करण्यासाठी छोटे युद्ध करणे आवश्यक झाले आहे. भारतीय सैनिक निधड्या छातीचे आहेत, तसे चीनचे सैनिक नाहीत. त्यांना लडाखमधील थंडीही त्याला सहन होत नाही. त्याच्या लडाखमधील एका मुख्य कमांडरचा थंडी सहन न झाल्याने नुकताच मृत्यू झाला आहे. अशा सैन्याला भारताने घाबरण्याऐवजी त्याला घाबरवणे आवश्यक आहे. छोट्या युद्धाचे स्वरूप मोठे होईल, अशी भीती वाटू शकते आणि त्याला भारत सामोरा जाऊ शकेल कि नाही ? किंवा त्याच वेळी पाकने भारतावर आक्रमण केले, तर..? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात; मात्र ही कोंडी फोडण्यासाठीच हा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच चीन आणि पाकलाही योग्य धडा मिळू शकेल आणि भारत पुढील अनेक वर्षेतरी सीमेवर शांततेच राखू शकेल.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *