Menu Close

आर्यन खान याच्या प्रकरणातून समाजाने प्रामाणिक आणि सावध होणे आवश्यक !

साधारण एक वर्षभरापूर्वी सुशांतसिंह प्रकरण चर्चेत असतांना, ‘बॉलीवूडवर एवढी राळ का उडवली जाते ?’, अशी शंका उपस्थित करून प्रस्थापित माध्यमांनी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणामध्ये अभिनेते शाहरुख खान नव्हता; परंतु अन्य वलयांकित अभिनेते आणि अभिनेत्री चर्चिले गेले होते. आता स्वतः शाहरुख यांच्या मुलालाच अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना कुठपर्यंत आदर्श मानायचे, हे ठरवण्याची वेळ आली आहे.

शाहरुख खान व  आर्यन खान
१. स्वतःच्या मुलावर कुसंस्कार करणार्‍या शाहरुख यांनी विज्ञापनाच्या माध्यमातून संस्कार करण्याविषयी उपदेश करणे

‘बायजूज’चे (BYJU’S) हे एक शैक्षणिक ‘ॲप’ आहे. त्याचे दूरचित्रवाहिनीवर सतत विज्ञापन येत असते. त्यामध्ये शाहरुख खान पालकांना मार्गदर्शन करतांना दाखवले आहेत. हे विज्ञापन बनवणार्‍यांनी किंवा शिक्षणाचा व्यवसाय करणार्‍यांनी ‘विज्ञापनामध्ये आपण कुणाला आदर्श (मॉडेल) म्हणून वापरत आहोत, याचा विचार केला का ? अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान यांना एखादा साबण किंवा तत्सम वस्तूच्या विज्ञापनामध्ये ‘मॉडेल’ म्हणून दाखवणे समजू शकता; पण पालकांवर संस्कार करण्यासाठीच्या विज्ञापनामध्ये जेव्हा आपण शाहरुख खानला एक आदर्श म्हणून समोर ठेवतो, तेव्हा त्याचा विचार व्हायला पाहिजे. या विज्ञापनामध्ये शाहरुख म्हणतो, ‘पालक हा त्याच्या पाल्यासाठी सर्वांत सोपा, जवळचा आणि पहिला शिक्षक आहे.’ हे योग्य आहे; पण शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खान याला एका ‘क्रूझ’ जहाजावर अमली पदार्थ बाळगल्यावरून अटक करण्यात आली. त्यानंतर शाहरुख यांची अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी घेतलेल्या एका जुन्या मुलाखतीची ध्वनिचित्रफीत समोर आली आहे. त्यात तो म्हणतो, ‘मला जे करता आले नाही, ते त्याने करावे. त्याने अमली पदार्थ सेवन करावेत, मुलींशी ‘डेटिंग’ करावे, सेक्स करावे इत्यादी.’

बायजूजच्या विज्ञापनामध्ये ‘पाल्याचा पहिला शिक्षक पालक असतो’, असे सांगणारे शाहरुख खान त्यांच्याच मुलाला २० वर्षांपूर्वी काय संस्कार देत आहेत ? याचा विचार विज्ञापन बनवणार्‍यांनी किंवा ते कोट्यवधी लोकांना दाखवणार्‍यांनी केला का ? शाहरुख खान यांच्या मुलाला अटक करण्यात आली; म्हणून त्याकडे लक्ष गेले; पण अन्य वलयांकित लोकांच्या मुलांची स्थिती याहून निराळी नाही. बहुतांश वलयांकित लोकांची मुले अशीच भरकटलेली आहेत. जन्मत: जी श्रीमंती येते, तिची नशा या सगळ्या व्यसनांकडे ओढून घेऊन जात असते, तसेच मुलांच्या अनावश्यक लाडाचेही हे दुष्परिणाम असतात.

श्री. भाऊ तोरसेकर
२. शाहरुख खान यांना जनतेकडून मिळणार्‍या पैशातूनच आर्यन  खानच्या व्यसनासाठी पैसा व्यय होणे

ज्या क्रूझ जहाजावर ही मेजवानी आयोजित करण्यात आली होती, तेथे प्रवेश करण्यासाठी ५ लाख रुपये मूल्य ठेवण्यात आले होते. आपले वडील जे पैसे कमावतात, ते कुठून येतात, याचे भान त्या मुलाला (आर्यन खानला) आहे का ? देशातील कोट्यवधी लोक शाहरुखचा चित्रपट पहात असतील किंवा विज्ञापनात ४ वाक्ये बोलण्यासाठी त्याला कोट्यवधी रुपये मिळत असतील. त्यातूनच त्याच्या मुलाला खर्चासाठी पैसे मिळत असतात. तुम्ही ‘बायजूज’ ॲपचे विज्ञापन पहाता आणि त्या ‘ॲप’वर जाऊन तेथील ‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी मूल्य भरतो. त्यातील काही पैसे त्या आर्यन खानच्या व्यसनासाठी जातात, याचे भान आपल्याला आहे का ?

३. शाहरुख खानचा दुटप्पीपणा दाखवून माध्यमांनी ‘आपण त्याच्यापेक्षा शुद्ध आणि चारित्र्यवान आहोत’, ते दाखवून द्यावे !

माध्यमांमध्ये बसलेले लोक मोठ्या आवेशामध्ये शाहरुख खान यांची वर उल्लेखलेली जुनी मुलाखत काढून दाखवत आहेत. येथे लक्षात घेण्याचे सूत्र असे आहे की, जर तुम्ही शाहरुख खान यांची जुनी मते काढून दाखवत आहात, तर ‘बायजूज’च्या विज्ञापनातून त्याचा समोर आलेला दुटप्पीपणाही दाखवला पाहिजे. ‘बायजूज’चे विज्ञापन सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवले जाते. त्यातून या वाहिन्यांचाही गल्ला भरतो. ते विज्ञापन नाकारून आपण शाहरुख खानपेक्षा किती शुद्ध आणि चारित्र्यवान आहोत, हे दाखवणार आहेत का ? एकीकडे शाहरुख खान त्याच्या मनातील खरे बोलतो की, त्याच्या मुलाने व्यसने करावीत आणि दुसरीकडे तो शैक्षणिक ‘ॲप’साठी खोटी वाक्ये बोलतो. खोटी वाक्ये बोलण्यासाठी तो कोट्यवधी रुपये घेतो. तो जसा विज्ञापनामध्ये बोलतो, तर त्याने पालक म्हणून त्याच्या मुलाला नेमके काय शिकवले ? हेही माध्यमांनी दाखवले पाहिजे.

४. एकतर्फी प्रेमातून मुलीला मारण्याची शिकवण आपल्या समाजाला शाहरुख खान याने देणे

शाहरुख खान ‘बाजीगर’, ‘डर’, ‘अंजाम’ या तिन्ही हिंदी चित्रपटातून ते लोकांच्या दृष्टीत भरले. त्या काळात २० ते २५ वर्षे वयोगट असलेल्या तरुणांनीच त्यांना महानायक बनवले. या चित्रपटात ते एकतर्फी प्रेमातून नायिकांचा छळ करून त्यांचे हालहाल करतो आणि त्यांना मारून टाकतो. या चित्रपटातून ‘जी मुलगी आपल्याला दाद देत नाही, तिला मारून टाकणे, तिला टार्चर करणे आणि तिच्यावर आक्रमण करणे’, अशी शिकवण शाहरुख यांनीच समाजाला दिली आहे. वर्ष १९९० मध्ये उल्हासनगर येथे हरिष पटेल याने एकतर्फी प्रेमातून शालांत परिक्षेच्या केंद्रात जाऊन रिंकू पाटील हिला जाळून मारले. त्याचे उदात्तीकरण शाहरुखच्या या तिन्ही चित्रपटांतील भूमिकेतून झाले. एकतर्फी प्रेमातून जो मुलीच्या तोंडावर आम्ल टाकतो, तेव्हा तो गुन्हेगार नसतो, तर आपण असतो; कारण आपण (समाजाने) शाहरुखला वलयांकित करत असतांना ‘एकतर्फी प्रेमातून मुलींचा छळ करण्याचे उदात्तीकरण’ केले आहे. वरील तीन चित्रपट आल्यानंतर समाजात मुलींवरील एकतर्फी प्रेमातून होणार्‍या आक्रमणांमध्ये वाढ झाली. असे असूनही आम्ही (समाजाने) शाहरुख खान यांना महानायक बनवले.

५. शाहरुख खान यांच्या प्रकरणात समाजाने स्वतःचा तोंडवळा नैतिकतेच्या आरशात बघावा !

गुन्हेगारीचे बीज रुजवणार्‍या शाहरुख यांच्या भूमिकांचे उदात्तीकरण आपणच केले आहे. त्यामुळे आपणही तेवढेच गुन्हेगार आहोत. त्यामुळे तो आणि त्याचा मुलगा यांच्याकडे बोट दाखवण्याचा नैतिक अधिकार आपण, वृत्तवाहिनीवाले, पत्रकार आणि माध्यमे यांना आहे का ? प्रत्येकाच्या मनात एक खलनायक दडलेला असतो. कायदा आणि समाज काय  म्हणेल ? या भीतीपोटी ते श्वापद दबा धरून बसलेले असते. जेव्हा त्याला असे उदात्तीकरण मिळते, तेव्हा ते श्वापद बाहेर येते आणि त्या मुलीवर आक्रमण करते. चित्रपटांमध्ये देखावा असतो; पण व्यावहारिक आयुष्यात काही सहस्र मुली बाजीगर, डर आणि अंजाम या चित्रपटांमुळे आयुष्यातून उद्ध्वस्त झाल्या आहेत. शाहरुख खान यांच्या हाती एवढा पैसा येण्यासाठी विज्ञापनदाते आणि चित्रपट निर्माते उत्तरदायी नाही, तर आपण आहोत. हे चित्रपट चालले नसते, तर एवढे पैसे त्याला मिळाले नसते; म्हणून आपण आपला खरा तोंडवळा आरशात पाहिला पाहिजे. आरशात स्वतःचा तोंडवळा दिसतो; पण स्वतःचे अंतर्मन त्यात दिसत नाही. ते आपण नैतिकतेच्या आरशामध्ये बघावे लागते. त्याचे प्रतिबिंब आपण सोडून दुसर्‍या कुणाला दिसत नाही. आपण दिलेले पैसे शाहरुख यांच्या माध्यमातून त्यांच्या आर्यन या मुलापर्यंत पोचले आहेत. आपल्याकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले जाणार नाही, एवढे तरी आपण सावध आणि प्रामाणिक होणार आहोत का ?’

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार, ‘प्रतिपक्ष’ यू ट्यूब वाहिनी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *