Menu Close

युवकांनी युवतींना गुलाब देण्यापेक्षा ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’, ‘लव्ह जिहाद’ यांसारखे युवतींचे रक्षण करणारे ग्रंथ भेट द्यावेत ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानासाठी ४ सहस्र ५०० हून अधिक युवती आणि महिला यांची उपस्थिती

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
कोल्हापूर – एकेकाळी संतांची भूमी आणि विश्वगुरु असलेल्या भारतात आज हिंदु महिला अन् युवती यांची स्थिती अतिशय खालावली आहे. हिंदु भगिनी भयभीत आणि असुरक्षित वातावरणात जगत आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या संकटात स्वत:चे रक्षण स्वतःलाच करावे लागणार आहे. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक सिद्धतेसमवेत आध्यात्मिक बळही आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु महिला आणि युवती यांनी हिंदु धर्म अन् संस्कृती यांचे पालन करून त्यांच्यातील देवीतत्त्वाचा जागर करावा. युवकांनी युवतींना गुलाब देण्यापेक्षा ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’, ‘लव्ह जिहाद’ यांसारखे युवतींचे रक्षण करणारे ग्रंथ भेट द्यावेत, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

नवरात्रीच्या निमित्ताने १२ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शौर्य जागृती ऑनलाईन व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ कोकण, मुंबई, गोवा, पश्चिम महाराष्ट्र, संभाजीनगर आणि बेळगाव येथील ४ सहस्र ५०० हून अधिक धर्मप्रेमी युवती अन् महिला यांनी घेतला.

या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या,

१. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे महिलांची दु:स्थिती झाली असून बलात्कार, अत्याचार, धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’ अशा समस्याही दिवसेंदिवस वाढत आहेत.

२. या सर्व संकटसमयी स्वत:चे रक्षण करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी व्हावे.

३. धर्मशिक्षण नसल्यामुळे आपण आज पाश्चात्त्य संस्कृती, ‘डेज’च्या (उदा. व्हॅलेंटाईन डे) विकृती यांना बळी पडत आहोत. ज्या परंपरा हिंदूंच्या धर्मग्रंथांत नाहीत, अशा कुप्रथांच्या आहारी जात आहोत.

४. उत्सवांच्या नावाखाली बिभत्सपणा, गैरवर्तन, व्यावसायिकता निर्माण केली जात आहे. नवरात्रीत ९ दिवस ९ रंगांच्या साड्या परिधान केल्यामुळे नाही, तर धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे देवीचे पूजन आणि उपासना केल्यामुळे अन् नवरात्रीतच नाही, तर ३६५ दिवस देवीतत्त्वाचा जागर होऊ शकतो.

प्रतिक्रिया

१. उषा जाधव – पुष्कळ चांगले मार्गदर्शन झाले. हा विषय समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे.

२. एक दर्शक – आमच्या महिला वाघिणी आहेत; मात्र त्या निद्रिस्त आहेत. प्रत्येक वाडीत, घरात अत्याचार झाल्यावरच आपण जागे होणार आहोत का ?

विशेष

१. व्याख्यानानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची माहिती सांगून सर्वांना ते शिकण्यासाठी आवाहन केले. त्या वेळी उपस्थित सर्वांनी ‘चॅट बॉक्स’मध्ये ‘जय भवानी’, अशी उत्स्फूर्तपणे घोषणा देऊन प्रतिसाद दिला.

२. कार्यक्रमाचा शेवट आदिशक्तीचे शक्तीस्तवन करून आणि घोषणा देऊन शौर्यपूर्ण वातावरणात करण्यात आला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *