सीमोल्लंघन करून शत्रूराष्ट्राला धडा शिकवा !
आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या भारतापुढे अनेक आव्हाने आहेत. पाकिस्तान आणि चीन भारताच्या सीमांवर धुमाकूळ घालत असून त्यांना भारतातील अंतर्गत धर्मांध शक्तींचेही साहाय्य मिळत आहे. भारताला सर्व बाजूंनी कोंडीत पकडण्याचा बेत शत्रूराष्ट्रे आखत आहेत. हा बेत हाणून पाडण्याचे सामर्थ्य भारताकडे निश्चितच आहे; परंतु दशकानुदशकांच्या करारांचे आणि अहिंसेचे जोखड भारतीय सैन्याच्या सामर्थ्यात बाधा आणते. ते आताच दूर करणे आवश्यक आहे. यंदाच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर भारताने शत्रूराष्ट्रांच्या संदर्भातील धोरणात आमूलाग्र पालट करायला हवा. देशाच्या सीमा उल्लंघून भारतीय शस्त्रसामर्थ्याची चुणूक दाखवायला हवी. भारतमातेची सुरक्षा आणि सन्मान यांसाठी असे सीमोल्लंघन करायला हवे.
भारतात जिहादी आतंकवादी आणि धर्मांध यांच्याकडून साधू-संतांच्या आणि हिंदुत्वनिष्ठांच्या दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. हिंदूंनी हे किती दिवस सहन करायचे ? अन्याय दूर करण्यासाठी सरकारनेच हिंदुत्वनिष्ठांना भरीव सहकार्य करायला हवे. आत्मरक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठांना शस्त्र बाळगण्याची अनुमती द्यायला हवी. केंद्रातील सरकारने काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० रहित केले; पण आता पुन्हा तेथे आतंकवादी सक्रीय झाले आहेत. जिहादी आतंकवाद्यांना तात्काळ फाशी देणे आणि त्यांचे समर्थन करणार्यांवर कठोर कारवाई करणे, यासाठी सरकारने प्रयत्न केला, तरच आतंकवादाचा बीमोड होईल.
सामाजिक दुष्प्रवृत्तींचेही उच्चाटन व्हावे !
सध्या भारतात मोठ्या प्रमाणात नैतिकतेचा र्हास होत आहे. समाजात अधर्म माजवणार्या प्रवृत्ती बोकाळल्या आहेत. ‘भारतात वर्ष २०२० मध्ये प्रतिदिन सरासरी बलात्काराच्या ७७ घटना घडल्या’, असा भयावह अहवाल ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ने दिला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात धावत्या रेल्वेमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. देशात ‘लव्ह जिहाद’मुळे सहस्रो हिंदु युवतींवर अत्याचार होत आहेत. बलात्कार करणार्यांना, महिलांना फूस लावून त्यांचे लैंगिक शोषण करणार्यांना शिक्षा होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वत:च्या रक्षणासाठी स्वत:च सिद्ध व्हायला हवे, हेच वस्तूस्थिती सांगते. सरकारने हे लक्षात घेऊन अधर्मी प्रवृत्तीच्या उच्चाटनासाठी महिलांना स्वरक्षणार्थ शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण द्यायला हवे. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सर्वपक्षीय सरकारांनी दाखवलेल्या उदासीनतेचे उल्लंघन करायला हवे. दोषींना कठोरात कठोर आणि तात्काळ शिक्षा करून वासनांध दुष्प्रवृत्तीचे उच्चाटन करायला हवे. सरकारला असे करण्यास भाग पाडणे, हे राष्ट्रप्रेमी नागरिकांचे दायित्वच आहे. यासह प्रत्येक महिलेने आदिशक्तीची भगवतीची आराधना करून स्वत:तील देवीतत्त्व जागृत करायला हवे. धर्माचरणामुळे स्त्रीमधील आत्मशक्ती आणि क्षात्रतेज जागृत होते. त्यामुळे महिलांनी तथाकथित आधुनिकतावादाचे जोखड झुगारून द्यायला हवे. पाश्चात्त्य आणि उच्छृंखल जीवनपद्धतीवर विजय मिळवणे महिलांचे रक्षण आणि नैतिक समाजाची निर्मिती यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सृजनाचा स्रोत शौर्यसंपन्न व्हावा !
बीज सुसंस्कारित असेल, तर वृक्ष बहरतो. त्याप्रमाणे शत्रू आणि अधर्म यांवर विजय मिळवण्यासाठी सामाजिक सृजनस्रोत सुसंस्कारित हवा. या अनुषंगाने भारतातील शिक्षणव्यवस्थेवर धर्माधिष्ठित संस्करण करणे आवश्यक आहे; कारण शिक्षणातूनच समाज घडतो. सध्याचा अभ्यासक्रम षंढपणा, स्वार्थांधता शिकवणारा आणि गुलामी मानसिकतेच्या धाटणीचा आहे. तो संपूर्णत: पालटायला हवा. शौर्याची उपासना आणि देवाची भक्ती करण्याची प्रेरणा देणारे शिक्षण मुलांना द्यायला हवे. शिक्षणक्षेत्रात असे पालट करणे, सरकारसाठी आव्हानात्मक असले, तरी असाध्य नाही. सरकारने यापूर्वी शैक्षणिक अभ्यासक्रमात पालट करण्याचे सूतोवाच आणि काही प्रमाणात कृतीही केली आहे. आताही निधर्मीवाद्यांच्या टिमकीला न जुमानता सरकारने हिंदु धर्माधिष्ठित शिक्षणव्यवस्थेची रचना करायला हवी. असे अनेक धर्मसापेक्ष पालट करण्यासंदर्भात सरकारची भूमिका निर्णायक रहाणार आहे; कारण सध्या जग प्रचंड उलथापालथ होण्याच्या उंबरठ्यावर आहे. तिसर्या महायुद्धाचे संकेत जागतिक घडामोडींतून प्राप्त होत आहेत. धर्म आणि अधर्म या दोन पक्षांत जग वेगाने विभागले जात आहे. अशा स्थितीत धर्माधिष्ठित निर्णय धडाडीने घेतले, तरच गिळंकृत करण्यासाठी आलेल्या अधर्मावर विजय मिळवता येणार आहे. हे समजून त्या दिशेने कृतीप्रवण होणे हीच अंतिम विजयाच्या प्राप्तीसाठी केलेली आराधना असणार आहे !