१. जोझिला बोगद्यामुळे लेहकडे जाणारा रस्ता बारमाही चालू रहाणे शक्य होणे आणि त्याचा भारतीय सैन्याला सर्वाधिक लाभ होणे
‘गेल्या २० वर्षांपासून भारत काश्मीर खोर्यामध्ये रेल्वे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु यासाठी त्याला काही वर्षे लागणार आहेत. त्याला पर्याय म्हणून आपल्याकडे रस्ते हे सर्वांत चांगले माध्यम आहे. काश्मीरमध्ये जोझिला बोगदा बांधण्यात येत आहे. मागील आठवड्यात रस्ते आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी अन् त्यांचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह या बोगद्याची पहाणी करण्यासाठी गेले होते. हा बोगदा अतिशय महत्त्वाचा आहे. शेष भारतातून केवळ एकच रस्ता काश्मीरमध्ये जातो. हा रस्ता पठाणकोट मार्गे जम्मूमध्ये आणि तेथून श्रीनगरला जातो. त्यापुढे तो जोझिला खिंडीतून लडाख किंवा लेह येथे जातो. हा एकमेव रस्ता असल्याने त्यावर भयंकर गर्दी असते. या रस्त्यावर श्रीनगरच्या पुढे जोझिला खिंड लागते. तेथे प्रचंड बर्फ पडत असल्याने कारगील येथे हा रस्ता ६ मास बंद असतो.
असे म्हटले जाते की, हे काम अतिशय वेगाने चालू आहे. २ स्वतंत्र ठिकाणी बोगदे बनणार आहेत. या वर्षाच्या शेवटी पहिला बोगदा चालू होईल; पण दुसरा बोगदाही वर्ष २०२२ च्या शेवटी चालू होईल. त्यामुळे सर्वच दृष्टीने लाभ होईल. भारतामध्ये अनेक जण निसर्ग पर्यटनाला जातात. त्यांनी लडाखमध्ये जायला पाहिजे. तेथे अनेक ठिकाणे बघण्यासारखी आहेत. तेथे प्रचंड शिखरे आहेत, नैसर्गिक सौंदर्य आहे, अनेक तळी आहेत, गलवान खोरे आणि पेंगॅन्सो कालवा आहे. तेथे वर्ष १९६२ मध्ये चीनशी युद्ध झाले होते, तसेच वर्ष १९९९ मध्ये पाकिस्तानशी कारगील युद्ध झाले होते. ती स्थाने पहाता येतील. तेथे युद्ध स्मारकही आहे. अशा अनेक गोष्टी तेथे पहाण्यासारख्या आहेत. त्यामुळे लेह येथे पर्यटन वाढू शकेल; पण त्यासाठी रस्ते फारच महत्त्वाचे आहेत. पहिला रस्ता हा श्रीनगर ते जोझिला खिंड येथून लडाखला जातो आणि दुसरा रस्ता हिमालच प्रदेशच्या बाजूने जातो. हा रस्ता चांगला आहे; पण या रस्त्यावर नैसर्गिक आपत्ती पुष्कळ प्रमाणात येतात. तेथे मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो, तसेच दरड कोसळत असतात. त्यामुळे हाही रस्ता केवळ ५-६ मासच खुला रहायचा. या रस्त्यावर मागील वर्षी अटलबिहारी वाजपेयी बोगदा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता आता ९ मास खुला रहात आहे आणि येणार्या काळात हा रस्ता अधिक दिवस खुला राहू शकेल. सध्याचे केंद्र सरकार या भागात १२ बोगदे बनवत आहे.
जम्मू-काश्मीरच्या रस्त्यांचा इतिहास बघितला, तर तेथे वर्ष २०१४ पर्यंत जेवढे रस्ते होते, त्याच्याहून तिप्पट रस्ते आता निर्माण झाले आहेत. तेथे अक्षरश: रस्त्यांची क्रांती होत आहे. अनेक रस्ते तिपदरी आणि चौपदरी करण्यात येत आहे. रस्ते झाल्यावर तेथे संरक्षणदृष्ट्या लाभ होतोच; पण पर्यटन आणि उद्योगधंदेही वाढतात अन् त्या भागातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारते. पूर्वी पठाणकोटमधून लेहला पोचायला ६-७ दिवस लागायचे, आता तेथे केवळ ८ घंट्यात पोचू शकतो. पुंछ, राजोरी येथे केवळ एकच रस्ता होता. वर्ष १९६२ आणि वर्ष १९७१ या दोन्ही लढाईमध्ये पाकिस्तानने हा रस्ता तोडण्याचा प्रयत्न केला होता; कारण त्यामुळे सैन्याशी संपर्क तुटला असता. हे लक्षात घेऊन या भागात २ किंवा ३ रस्ते आवश्यक आहेत. ज्या प्रमाणात रस्ते बनत आहे, ते पहाता चीनने कोणत्याही प्रकारचे आक्रमण केले, तरी आपण त्याला चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. या रस्त्यांमध्ये आणि बोगद्यांमध्ये अनेक अत्याधुनिक गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्या सैन्याला अर्थात् देशाला प्रचंड मोठा लाभ होणार आहे. त्यामुळेच गडकरी आणि जनरल सिंह यांचे कौतुक करायला हवे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे