हिंदुत्वनिष्ठ आणि लोकशाही यांच्यासाठी धोकादायक फेसबूकवर शासनकर्त्यानी कारवाई करावी !
फेसबूकने त्याला धोकादायक वाटणार्या जगभरातील ४ सहस्र संघटनांची सूची सिद्ध केली आहे. ती गोपनीय सूची ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्तसंघटनेने उघड केली आहे. त्यात भारतातील बंदी घातलेल्या काही संघटनांच्या नावांसह सनातन संस्थेचाही समावेश केला आहे. हे केवळ सनातन संस्थेलाच नव्हे, तर संस्थेच्या कार्याशी परिचित असणार्या भारतातील अनेकांना चीड आणणारे आहे. सनातन संस्थेचा विचार केला, तर संस्थेचा उद्देश जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय परिभाषेत ओळख करून देणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि साधकांना पुढील आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणे असाच आहे. सनातन संस्थेने आध्यात्मिक कार्यासह, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रांतही उपक्रम राबवले आहेत. संस्थेचे सर्व उपक्रम हिंदु धर्मातील सण, उत्सव यांमधील गैरप्रकार दूर करून ते धर्मशास्त्रदृष्ट्या योग्य प्रकारे साजरे करून भाविकांना आनंद घेता यावा, हा उद्देश ठेवून करण्यात आले. सण-उत्सवांतील गैरप्रकार दूर झाल्यामुळे समाजाला मोठ्या प्रमाणात लाभ झाला. समाजाची सात्त्विकता वाढली की, त्याच्या परिणामस्वरूप गुन्हेगारी, अनैतिकता हे आपोआपच अल्प होत जाणार आहे. त्या अनुषंगाने व्यक्ती, समाज आणि देश सात्त्विक करण्यासाठी एक छोटी संघटना शिस्तबद्ध कार्य करून त्या दिशेने वेगाने पावले उचलत असेल, तर ती धोकादायक कशी असू शकते ? हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे.
गत २ वर्षांमध्ये फेसबूकने सनातनच्या अनेक फेसबूक खात्यांवर बंदी घातली आहे. परिणामी या माध्यमातून होणार्या धर्मप्रसारापासून जिज्ञासू वंचित झाले आहेत. फेसबूकने ही बंदी अघोषित आणि संस्थेला कोणतेही स्पष्टीकरण देण्याची संधी न देता घातली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची टीमकी वाजवली जाणार्या या देशात या बंदीविषयी बोलायला मात्र कुणी सिद्ध नाही. याविषयी संस्था कायदेशीर मार्गाने लढाई लढत आहेच. एका बाजूला हिंदूंच्या देवतांचा, श्रद्धास्थानांचा अवमान केल्यावर हिंदुत्वनिष्ठ आवाज उठवतात, तेव्हा त्यांच्यावर ‘आम्हाला आमचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य देत नाहीत. हे हिंदु तालिबान आहे’ अशी टीका केली जाते. मग फेसबूक हुकूमशाहीने वागून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदूंमध्ये लोकप्रिय असलेल्या संस्थांच्या पानांवर बंदी घालत असतांना सर्व गप्प कसे ?
फेसबूकचा काळा चेहरा !
प्रारंभी मनोरंजनाचे, सर्वसामान्यांना एकत्र येण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाणारे फेसबूक गत काही वर्षांत धोकादायक बनले आहे. फेसबूकवर अश्लील व्हिडिओंचा भरणा असतो आणि ते अगदी सहज उपलब्ध होतात. काही व्हिडिओ अत्यंत अश्लील (पॉर्न स्वरूपाचे) असतात. जे पाहून नीतीभ्रष्ट होण्याचा धोका आहे. ‘फेसबूक लाईव्ह’ करून लोक आत्महत्या करतात. ‘जे व्हिडिओ आणि जे लिखाण वाहिन्यांवर दाखवण्यास धोकादायक आहे’, असे व्हिडिओ फेसबूकवर उपलब्ध असतात. फेसबूकच्या माजी कर्मचार्याने तर ‘फेसबूक लोकशाही आणि लहान मुले यांच्यासाठी धोकादायक आहे’, असे विधान केले आहे. यावरून फेसबूकद्वारे समाजासमोर काय मांडले जात असेल ?, याची कल्पना येते.
फेसबूकवर कोट्यवधी लोकांची खाती आहेत. ही खाती उघडतांना वैयक्तिक स्वरूपाची पुष्कळ माहिती फेसबूक लोकांकडून ‘ऑनलाईन’ अर्जावर भरून घेतो. लोकांची आवड-नावड, त्यांची कौशल्ये, कल अशी बरीच माहिती फेसबूकला मिळते. विज्ञापनांद्वारे सामाजिक संकेतस्थळांना पुष्कळ पैसे मिळतातच; मात्र ग्राहकांची माहिती विकूनही पुष्कळ पैसे कमावता येतात. या माहितीचा संबंधित आस्थापने अनेकविध कारणांसाठी उपयोग करतात. काही वर्षांपूर्वी उघड झालेले ‘केंब्रिज ॲनालिटिका’ प्रकरण हे त्याचे उदाहरण आहे. काही देशांतील निवडणुकांचे निकाल स्वत:ला हवे तसे लागण्यासाठी माहितीचे विश्लेषण करणार्या आस्थापनाने फेसबूककडून लोकांची माहिती घेतली होती. यानुसार निवडणुकांमध्ये कोणत्या सूत्रांवर भर द्यावा ?, किती मते पडतील ?, याचे आडाखे बांधू शकतो. फेसबूकने काही कोटी ग्राहकांची माहिती (डेटा) विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. वापरकर्त्यांची माहिती अन्य आस्थापनाला देणे चुकीचे आहेच आणि ग्राहकांच्या अनुमतीविना हे करणे त्याहूनही चुकीचे आहे.
२ वर्षांपूर्वी देहली येथे झालेल्या दंगलीत हिंदू मार खात असतांना त्यांना वाचवण्यास गेलेले भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनाच फेसबूकने खलनायक ठरवले. त्यांची जगात पुष्कळ अपकीर्ती झाली. आखाती देशांमधून मिश्रा यांना धमक्यांचे दूरभाष आले. हे भारतातील लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याचे आणि झुंडशाहीला प्रोत्साहन देणारे आहे. तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आहेत. त्यांच्या कार्यामुळे भाग्यनगर (हैद्राबाद), तेलंगाणा येथील काही भाग मुसलमानबहुल असूनही हिंदू तेथे सुरक्षित आहेत. राजासिंह यांनाही खलनायक ठरवून फेसबूकने त्यांचे खाते बंद केले. दुसरीकडे मुसलमान तरुणांना आतंकवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन देणारे आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांची फेसबूक खाती चालू आहेत. केरळ येथील अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांमध्ये सहभाग असणार्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेची खाती चालू आहेत. देहली दंगलीत याच संघटनेची मुख्य भूमिका असल्याचे समोर आले आहे.
‘भारतात हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करणे, हे फेसबूकचे धोरण आहे’, असे लक्षात येते. सिंगापूरने स्वैर आचरण करणार्या फेसबूकला नियमांत रहाण्याची जाणीव करून दिल्यावर फेसबूकने आक्षेप घेतला; मात्र ‘सिंगापूरमध्ये कार्यरत रहायचे असेल, तर येथील कायदे-नियम यांचे पालन करावेच लागेल; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल’, अशी तंबीच तेथील अधिकारी भारतीय वंशाचे के. शणमुगन् यांनी फेसबूकला दिली. भारत सरकारला याविषयी आवाहन आहे की, त्यांनी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनेवरील हा अन्याय दूर करण्यासाठी फेसबूकला कठोरपणे समज द्यावी. जेणेकरून यापुढे अन्य कुठल्याही संस्था, संघटना अथवा व्यक्ती यांच्या संदर्भात चुकीच्या माहितीच्या आधारे अथवा संशयाने कारवाई करण्याचे धैर्य फेसबूक करणार नाही.