Menu Close

काँग्रेसींना झालेली जाणीव !

मनीष तिवारी

काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी आश्चर्यजनक अन् अनपेक्षित असे ट्वीट करून काँग्रेसी परंपरेला छेद दिला आहे. ‘दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे !’ अशा प्रकारचे विधान एखादा काँग्रेसी नेता करू शकतो, हे काँग्रेसमध्ये गांधी यांचा उदय झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात दुर्मिळच म्हणावे लागेल. ‘काँग्रेस आणि हिंदुद्वेष’, ‘काँग्रेस आणि मुसलमान प्रेम’ हे समीकरण गेली १०० वर्षे चालू आहे. त्याला छेद देण्याचा प्रयत्न मनीष तिवारी यांनी केला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या विधानावर जितकी चर्चा झाली पाहिजे होती, तितकी चर्चा प्रसारमाध्यमांत आणि राजकीय क्षेत्रांत झालेली नाही, असेही दिसून आले. सध्या मनीष तिवारी हे काँग्रेसमधील गांधी परिवाराच्या नेतृत्वाशी अप्रसन्न असलेल्या ‘जी २३’ नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळेच त्यांनी ‘काँग्रेसची वाट सोडून अशा प्रकारचे विधान केले असू शकते’, असेही म्हणता येईल. काहीही असले, तरी त्यांनी सत्य तेच सांगितले आहे, याचा विचार काँग्रेसी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आता करायला पाहिजे.

 

‘हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व’ आहे आणि ‘धर्मांधांचे लांगूलचालन म्हणजे देशद्रोह अन् राष्ट्रघात’ आहे, हेही लक्षात यायला हवे. जर काँग्रेसवाल्यांना हे उमजूनही त्याकडे ते राजकीय स्वार्थ साधता येईल, या उद्देशाने दुर्लक्ष करत असतील, तर ते मूर्खपणाच करत आहेत, हे त्यांच्या लक्षात यायला हवे. सध्या काँग्रेसचे ‘तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे’, अशी स्थिती आहे. ज्या मुसलमानांवर काँग्रेस सत्ता प्राप्त करण्यासाठी अवलंबून रहात होती किंवा आजही त्याच भावनेने रहाते, ते मुसलमान बाबरी मशीद पाडल्यापासून काँग्रेसपासून कोसो दूर गेले आहेत, तसेच हिंदुत्वाचा सातत्याने द्वेष केल्याने हिंदू जागृत होऊन काँग्रेसला नाकारू लागले आहेत. हे वर्ष २०१४ पासून सातत्याने उघड होत आले आहे. तरीही काँग्रेसला जाग आलेली नाही. ‘अशीच स्थिती राहिली, तर काँग्रेस इतिहासजमा होणार’ हे सांगायला ज्योतिषांची आवश्यकता नाही.

म्यानमारचा आदर्श हवा !

मनीष तिवारी यांना आता कुठे इस्लामी आतंकवाद्यांमुळे भारतालाच नव्हे, तर दक्षिण आशियाला किती धोका आहे, हे लक्षात आले आहे. ही स्थिती एकदम निर्माण झालेली नाही. भारताच्या फाळणीला काँग्रेसने पाठिंबा दिला आणि त्या वेळी पूर्व अन् पश्चिम पाकिस्तान निर्माण झाले. त्या वेळी झालेल्या दंगलीमध्ये १० लाख हिंदूंच्या हत्या झाल्या. यानंतर बांगलादेशाच्या निर्मितीच्या वेळी ३० लाख बंगाली मुसलमान आणि हिंदू यांच्या हत्या करण्यात आल्या. आज बंगालमध्ये भविष्यात अशा प्रकारचे हत्याकांड होऊ शकते. आसाममध्ये भाजप सरकार विरोध करत असल्याने तेथे शांतता आहे, एवढेच म्हणता येईल. मलेशियाने आतंकवाद्यांचा आदर्श असलेल्या डॉ. झाकीर नाईक याला आश्रय दिलाच आहे. मलेशिया भारताच्या विरोधात गरळओक करत आला आहेच. इंडोनेशिया सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेला देश आहे. म्यानमारच्या बौद्धांनी रोहिंग्यांना धडा शिकवल्यामुळे त्यांच्यावर वचक निर्माण झाला आहे. अन्यथा म्यानमारमध्ये तर रोहिंग्यांनी त्यांचे सैन्यच उभे केले होते. जे भविष्यात बंडच करणार होते. या सैन्याला धडा शिकवण्यात आल्याने लक्षावधी रोहिंग्यांना पलायन करावे लागले. ही स्थिती दक्षिण आशियाची आहे, तर उत्तर आशियामध्ये म्हणजे चीनमध्ये तर उघूर मुसलमानांची इस्लामी मानसिकताच नष्ट करण्याचा चीन आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यामुळे तेथे जिहादी आतंकवादाची भीती सध्यातरी दिसत नाही. एवढे करूनही इस्लामी देशांची संघटना आणि इस्लामी देश चीनच्या विरोधात ‘ब्र’ काढण्याचेही धाडस करू शकत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. अशी स्थिती दक्षिण आशियामध्ये कधीच येऊ शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे.

ख्रिस्त्यांच्या फुटीरतेवरही बोलावे !

दक्षिण आशियातील या देशांची स्थिती पाहिल्यावर भारत जिहाद्यांचे प्रथम लक्ष्य आहे. भारताचे इस्लामी राष्ट्र करण्याचे मुसलमानांचे स्वप्न लपून राहिलेले नाही. मोगलांच्या काळापासून ते हे साध्य करण्याचा प्रयत्न करत होते; मात्र भारतातील शूरवीर हिंदु राजांमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. आता पाकिस्तान जिहादी आतंकवाद्यांच्या माध्यमातून, तसेच भारतातील देशद्रोही धर्मांधांच्या माध्यमातून हिंदूंचा वंशसंहार करून भारताला इस्लामी देश करण्याचा प्रयत्न करत आहे. काश्मीरमध्ये पाकला अशा प्रकारे थोडे यश मिळाले आहे, हे नाकारता येणार नाही. हिंदू अजूनही तेथे सुरक्षित नाहीत, हे सध्याच्या हिंदूंच्या होणार्‍या हत्यांवरून लक्षात येते. भारतातील अनेक जिल्हे आज मुसलमानबहुल झाले आहेत, तर जेथे ४० टक्क्यांहून अधिक मुसलमान आहेत, तेथे हिंदूंना भीतीपोटी जगावे लागत आहे. अनेक राज्यांतील काही भागांमधून हिंदूंनी पलायन केल्याच्याही घटना घडल्या आहेत. हे सर्व सुनियोजितरित्या चालू आहे. याविषयीही मनीष तिवारी यांनी अधिक स्पष्टपणे बोलायला हवे. तिवारी यांनी विषयाला प्रारंभ केलाच आहे, तर जी वस्तूस्थिती आहे, ती त्यांना पूर्णपणे सांगायला हवी. तसेच यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. केवळ इस्लामी नाही, तर खिस्ती षड्यंत्राविषयीही त्यांनी बोलले पाहिजे. ईशान्य भारतातील राज्ये ख्रिस्तीबहुल झाली आहेत आणि त्यांच्या सशस्त्र संघटना भारतापासून स्वतंत्र देश स्थापन करण्याची मागणी करू लागल्या आहेत. ख्रिस्ती माओवाद्यांचाही सुळसुळाट झाला आहे. याविषयीही त्यांनी बोलले पाहिजे. मनीष तिवारी बोलले आहेत, त्यावर भाजपने चर्चा घडवून आता काँग्रेसींना सत्य बोलण्याचे धाडस निर्माण झाल्याविषयी त्यांचे कौतुक केले पाहिजे, तसेच या विधानांचा लाभ घेऊन धर्मांधांवर आणि जिहाद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *