काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य यांच्या पार्श्वभूमीवर मागणी !
नवी देहली – जम्मू-काश्मीरमधील पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून गेल्या काही दिवसांत हिंदू आणि शीख यांना लक्ष्य करत त्यांना ठार करण्यात आले. आतंकवाद्यांशी उडालेल्या चकमकीत ९ हून अधिक भारतीय सैनिक हुतात्माही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या २४ ऑक्टोबर या दिवशी होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रहित करण्याची मागणी केली जात आहे. काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या हिंदूंच्या नातेवाइकांनी ही मागणी केली आहे. त्यातच बिहारमधील बेगूसरायचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही हा सामना खेळवण्याविषयी पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते ताराकिशोर प्रसाद यांनीही भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रहित करण्याची मागणी केली आहे.
क्रिकेट सामना रहित करा आणि देशाचा सन्मान वाचवा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
सीमेवर सैनिक हुतात्मा होत असतांना पाकसमवेत क्रिकेट खेळणार ? – असदुद्दीन ओवैसी
भाग्यनगर (तेलंगाणा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना म्हटले होते, ‘सैनिक मरत आहेत आणि मनमोहन सिंह सरकार आतंकवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत आहे.’ आता काश्मीरमध्ये ९ सैनिक हुतात्मा झाले असतांना तुम्ही ‘टी-२0’ सामना खेळवणार ? काश्मीरमध्ये पाकिस्तान भारतियांच्या जिवाशी खेळत आहे’, अशी टीका एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी येथे एका सभेमध्ये केली.
(म्हणे) ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमुळे (‘आयसीसी’मुळे) भारत-पाक सामना रहित करता येणार नाही !’ – बीसीसीआयआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपेक्षा (‘आयसीसी’पेक्षा) आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पत मोठी आहे आणि तिचा वापर करून भारत आयसीसीला नमवू शकतो अन् सामना रहित करण्यास भाग पाडू शकतो; मात्र बीसीसीआयची इच्छाशक्ती नाही आणि या सामन्यातून अब्जावधी रुपये बीसीसीआय अन् अन्य संघटनांना मिळणार असल्याने सामना रहित करण्याचे नाकारले जात आहे, हेच सत्य आहे ! त्यामुळे आता केंद्र सरकारनेच हस्तक्षेप करून हिंदू आणि सैनिक यांचा मान राखावा, असे हिंदूंना वाटते ! भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआयचे) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सामना रहित करण्याच्या मागणीवर म्हटले, ‘काश्मीरमध्ये घडणार्या हत्या दुःखद आहेत, आम्ही त्यांचा निषेध करतो. भारत-पाकिस्तान सामन्याचा जो प्रश्न आहे, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कराराच्या अंतर्गत आहे. यामध्ये आम्ही कोणत्याही देशासमवेत खेळण्यास नकार देऊ शकत नाही. आयसीसीच्या स्पर्धा खेळाव्या लागतात.’ (देश मोठा की क्रिकेट, हेसुद्धा न कळणारे बीसीसीआय ! आज भारतामुळेच आयसीसीला बहुतांश निधी मिळतो. या आर्थिक निकषाचा देशहितासाठी वापर करणार नाही, तर केव्हा करणार ? दुसरीकडे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचा विषय जागतिक स्तरावर नेण्यासाठी ही योग्य संधी आहे. जिहादी आतंकवाद आणि त्याचा पाठीराखा पाकिस्तान यांना उघडे पाडण्याचा हा कूटनीतीचा डाव भारताने खेळावा, असेच हिंदु धर्म अन् राष्ट्र प्रेमी जनतेला वाटते. – संपादक दैनिक सनातन प्रभात) |