सण-उत्सवांच्या काळात जागरूक राहून अन्नपदार्थ विकत घ्या ! – श्री. मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
अनारोग्य वातावरणात अन्नपदार्थ तयार केल्याचे आढळल्यास, भेसळयुक्त पदार्थ सोबत बाळगल्यास, तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थाच्या सेवनाने कोणाचा मृत्यू झाल्यास अथवा व्यक्तीला शारीरिक त्रास, आजार झाल्यास अशा अनेक गुन्ह्यांसाठी अन्न सुरक्षेविषयीच्या विद्यमान कायद्यांनुसार दोषींविरोधात शिक्षेच्या तरतूदी अस्तित्वात आहेत. या संदर्भातील गुन्ह्यांसाठी आर्थिक दंड, कारावास आदी शिक्षा आहेत. अन्नपदार्थांचा दर्जा चांगला असावा, यासाठी प्रशासन लक्ष देत असते; मात्र सण-उत्सवांच्या कालावधीत नागरिकांनीही जागरूक राहून अन्नपदार्थ विकत घ्यावेत, असे आवाहन कोल्हापूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. मोहन केंबळकर यांनी केले. ते ‘आरोग्य साहाय्य समिती’ आणि ‘सुराज्य अभियान’च्या वतीने आयोजित ‘अन्न भेसळ कशी ओळखावी अन् उपाय ?’ (भाग 2) या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.
या कार्यक्रमात सातारा आणि कोल्हापूर येथील जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी श्री. सुनील पाखरे आणि त्यांच्या सहकार्यांनी दुधाचा खवा, केशर, डाळी आदी पदार्थांमधील भेसळ कशी ओळखावी, हे प्रात्यक्षिकांसह दाखवले. हा कार्यक्रम Hindujagruti.org हे संकेतस्थळ, समितीचे ‘HinduJagruti’हे ‘यू-ट्यूब’ चॅनल, हिंदु जनजागृती समिती, तसेच आरोग्य साहाय्य समिती अन् सुराज्य अभियान यांच्या ट्वीटर हॅण्डल यांद्वारे प्रसारित करण्यात आला. हा, तसेच 13 ऑक्टोबर यादिवशी प्रसारित झालेला या कार्यक्रमाचा भाग-1 सुद्धा नागरिकांनी अवश्य पहावा आणि ‘भेसळ’ या समस्येविषयी लढा देण्यासाठी ‘सुराज्य अभियाना’शी संपर्क साधावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. वैभव आफळे यांनी केले.
श्री. केंबळकर पुढे म्हणाले की, दिवाळीसारख्या सणाच्या वेळी मिठाईवर चांदीऐवजी अॅल्युमिनियमचा वर्ख वापरला जातो. मिठाईमध्ये, तसेच गुळासारख्या पदार्थावर खाण्याच्या रंगांचा अतिवापर केला जातो. बाजारामध्ये तळलेले अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे खाद्यतेल केवळ 3 वेळाच संबंधित व्यवसायिकांनी वापरले पाहिजे, मात्र असे न होता, अनेकदा मिठाई व्यावसायिक आणि रस्त्यावरील खाद्यविक्रेते खाद्यतेल काळपट होईपर्यंत त्याचा वापर करतात, त्यामुळे नागरिकांनी सजग राहून तळलेले अन्नपदार्थ सेवन करावेत. पॅकबंद पदार्थ घेतानाही त्यातील घटक, त्या पदार्थांची ‘एक्स्पायरी डेट’ आदी गोष्टी पाहूनच ते पदार्थ घ्यावेत. हल्ली चायनीज पदार्थांमध्ये, तसेच काही पॅकबंद पदार्थांवर मोठ्या प्रमाणात ‘अजिनोमोटो’चा वापर केला जातो. अजिनोमोटोयुक्त असलेल्या पदार्थांचे सेवन शरीराला हानीकारक असून यामुळे आतड्याचे विकार, अॅसिडिटी, पचनाचा त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी हे अशा पदार्थांचे सेवन करणे शक्यतो टाळावे. नागरिकांना कुठल्याही प्रकारची भेसळ आढळल्यास ‘FSSAI’च्या केंद्रीय विभागाला 1800112100 आणि महाराष्ट्रात 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. ‘FSSAI’कडे दूरभाषद्वारे, ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष पत्रव्यवहार यांद्वारे तक्रार करता येते. त्यानंतर ‘अन्न सुरक्षा दला’चे अधिकारी तक्रारदाराला कारवाईबाबतची रितसर माहितीही देतात.