नवी देहली – मला आता माझ्या देशाला ‘बांगलादेश’ म्हणायला आवडत नाही. तो देश आता ‘जिहादीस्तान’ झाला आहे. सध्याच्या सरकारसह सर्व सरकारांनी राजकीय हेतूसाठी धर्माचा वापर केला. त्यांनी ‘इस्लाम’ला राजधर्म बनवले. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध यांना खालच्या दर्जाचे नागरिक म्हणून वागणूक दिली जात असून त्यांना छळाला सामोरे जावे लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
तस्लिमा नसरीन यांनी मुलाखतीत मांडलेली सूत्रे
१. बांगलादेशात हिंदुविरोधी भावना नवीन नाही. श्री दुर्गादेवीच्या पूजेच्या वेळी हिंदूंना कोणतेही संरक्षण दिले गेले नाही, हे विचित्र आहे. पंतप्रधान शेख हसीना हे चांगल्या प्रकारे जाणतात की, प्रतिवर्षी दुर्गापूजेच्या वेळी हिंदूंवर ‘जिहादी’ आक्रमणाची शक्यता असते; मग तेथील अल्पसंख्य हिंदूंना संरक्षण का दिले गेले नाही ? जर सरकारला त्यांचे रक्षण करायचे असते, तर ते तसे करू शकले असते. ही वाढती हिंदुविरोधी मानसिकता अतिशय चिंताजनक आहे.
२. मी माझी ‘लज्जा’ ही कादंबरी वर्ष १९९३ मध्ये लिहिली होती. यात एका हिंदु कुटुंबावर कट्टरतावादी मुसलमानांनी आक्रमण केल्याचे नमूद केले होते. अशा घटना केवळ वर्ष १९९३ मध्येच घडल्या आहेत असे नाही, तर त्या सतत घडत आहेत.
३. मुसलमानांकडून हिंदूंवर अत्याचार केले जातात आणि त्यांना धमक्या दिल्या जातात. हे वर्षानुवर्षे चालू आहे. असे केल्याने हिंदू देश सोडून जातील आणि त्यांची भूमी बळकावता येईल, हे त्यामागील षड्यंत्र आहे.
४. बांगलादेशमध्ये असंख्य मशिदी आणि मदरसे विनाकारण बांधले जातात. त्यांचा वापर तरुण पिढीचा बुद्धीभेद करण्यासाठी केला जातो. दुर्गम खेड्यांमध्ये इस्लामी धर्मोपदेशक इस्लामच्या नावाने त्यांना हवे ते सांगतात. ते अशिक्षित आणि अरबी समजत नसलेल्या तरुणांची दिशाभूल करत आहेत. जेव्हा कोणतीही अफवा पसरवली जाते, तेव्हा या प्रकारच्या हिंसक घटना घडतात. या अतिरेकीपणामुळे तुम्हाला तुमचा देश काय बनवायचा आहे? आणखी एक अफगाणिस्तान बनवायचा आहे का ? जिथे तालिबानचे नियंत्रण आहे ?
५. मी आयुष्यभर या आतंकवादाला बळी पडले आहे; कारण माझे लेखन महिला आणि मानवतावादी समस्या यांच्याशी संबंधित आहे. मला देशाबाहेर घालवून २८ वर्षे झाली आहेत आणि तरीही कोणत्याही सरकारने मला देशात प्रवेश करण्याची अनुमती दिलेली नाही. मी २८ वर्षांपूर्वी ‘लज्जा’ कादंबरीमध्ये अल्पसंख्य समुदायावर होणार्या अत्याचारांना वाचा फोडली होती. आताही जेव्हा बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, सीरिया किंवा जगात कुठेही या प्रकारचा प्रश्न उद्भवतो, तेव्हा मी लिहिते.
६. ज्या लोकांनी हिंदूंची दुकाने, घरे किंवा मंदिरे नष्ट केली, केवळ त्यांनाच तुम्ही दोष देऊ शकत नाही. सरकारने मतपेढीच्या राजकारणासाठी वर्षानुवर्षे असे करण्यासारखी परिस्थिती आणि कारणे निर्माण केली आहेत. ती थांबली पाहिजेत.
७. बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ निदर्शने झाली, मोर्चे काढण्यात आले, याचा मला पुष्कळ आनंद झाला आहे. या घटनांच्या विरोधात शेकडो लोकांनी चटगावमध्ये निषेध मोर्च्यामध्ये सहभाग घेतला. यात पुरोगामी मुसलमानांनीही भाग घेतला. बांगलादेशमध्ये प्रसारमाध्यमांवर बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे हिंदूंवरील आक्रमणांविषयी जी काही माहिती मिळत आहे, त्यात सामाजिक माध्यमांचा मोठा वाटा आहे.