Menu Close

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात लढा देणारे कै. बिनिल सोमसुंदरम् !

केरळमधील प्रखर हिंदु धर्माभिमानी कै. बिनिल सोमसुंदरम् यांचा परिचय

बिनिल सोमसुंदरम् (राष्ट्रीय हिंदू अधिवेशनातील संग्रहित छायाचित्र)
एर्नाकुलम् (केरळ) येथील ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि हिंदु धर्माभिमानी श्री. बिनिल सोमसुंदरम् यांचे २३ ऑक्टोबर २०२१ या दिवशी निधन झाले. कै. बिनिल सोमसुंदरम् यांचा हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांशी ४ वर्र्षांपूर्वी संपर्क आला. त्यांच्यामध्ये हिंदुत्वासाठी कार्य करण्याची अपार तळमळ आणि लढाऊ वृत्ती होती. हिंदुत्वरक्षणासाठी ते नेहमी तत्पर असायचे. केरळमध्ये साम्यवादी सरकार आणि अन्य पंथीय यांचा विरोध असतांनाही ते निर्भिडपणे हिंदुत्वाचे कार्य करत होते. कै. बिनिल यांना मधुमेह होता. काही वर्षांपूर्वी त्यांचे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले होते. अशा स्थितीतही ते हिंदूसंघटनासह धर्मरक्षणाच्या प्रत्येक मोहिमेमध्ये जीव तोडून प्रयत्न करायचे. अशा प्रखर धर्माभिमानी कै. बिनिल सोमसुंदरम् यांनी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात केलेल्या कार्याविषयीची माहिती येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बिनिल सोमसुंदरम् यांचे कौतुक करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

बिनिल सोमसुंदरम् यांची एका अधिवेशनाच्या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘श्री. बिनिल हे हसतमुख आहेत. हे हिंदुत्वाचे कार्य चांगल्या प्रकारे करतात. ते केवळ ‘फिल्ड वर्क’च (कृती स्तरावर) नाही, तर उत्तम वक्ताही आहेत. याखेरीज ते लिखाणही चांगले करतात. कार्यकर्त्यांनी असेच असले पाहिजे.’’

१. कै. बिनिल सोमसुंदरम् यांचा गोवा येथील अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये सक्रीय सहभाग

कै. बिनिल सोमसुंदरम् यांचे जीवन हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍यांना नेहमी प्रेरणादायी राहील. कै. बिनिल वर्ष २०१९ मध्ये गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. गोवा येथे अधिवेशनात सहभागी झाल्यावर ते म्हणाले, ‘‘मला वाटायचे की, केरळमध्ये केवळ आपणच थोडेफार हिंदुत्वनिष्ठ विरोध सहन करून हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत आहोत; पण येथे आल्यावर कळाले की, देशभरातील एवढे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांच्या संघटना आपल्या समवेत आहेत.’’ या अधिवेशनामध्ये त्यांना शबरीमला मोहिमेविषयी अनुभवकथन करायची संधी मिळाली. तेव्हा त्याची सिद्धता त्यांनी काही घंट्यामध्ये पूर्ण केली. त्यांनी सर्व विषय हिंदीमध्ये सांगितला. त्यांचे प्रस्तुतीकरणही क्षात्रतेजयुक्त होते.

२. आद्यशंकराचार्यांचे वडील पूजा करत असलेल्या शिव मंदिरासमोरील अनधिकृत चर्च पाडणे

केरळमधील कालडी येथे आद्यशंकराचार्यांचे जन्मस्थान आहे. तेथे ज्या शिव मंदिरात आद्यशंकराचार्यांचे वडील पूजा करायचे, त्या मंदिरासमोरच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी एक चर्च विनाअनमुती बांधण्यात आले होते. त्यानंतर ते चर्च पाडण्यात आले नव्हते. केरळमध्ये अशा प्रकारे अनेक ठिकाणी चर्च बांधून त्यांना कायम ठेवण्यात आले आहे. हे चर्च हटवण्यासाठी कै. बिनिल यांच्या नेतृत्वाखाली काही हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने प्रयत्न केले; पण प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे एक दिवस कै. बिनिल आणि सहकार्‍यांनी ते अनधिकृत चर्च तोडले. त्यानंतर विरोधकांकडून त्यांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला.

३. शबरीमला मंदिरासाठी लढा देणे

कै. बिनिल यांनी वर्ष २०१८ मध्ये शबरीमला मंदिराच्या परंपरा रक्षणासाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्यांसमवेत मोठा लढा दिला. शारीरिक आजारांची काळजी न करता ते शबरीमला मंदिर असलेल्या उंच पर्वतावर आंदोलनासाठी बसले होते. पोलिसांचा विरोध पत्करून त्यांनी धर्मरक्षणाचे प्रयत्न सोडले नाहीत. त्या नंतरही जेव्हा जेव्हा मंदिर उघडले जायचे, तेव्हा तेव्हा ते परंपरा रक्षणासाठी तेथे जायचे. कै. बिनिल यांच्या संघटनेने पुढाकार घेतल्यामुळे जगभरातील अय्यप्पाभक्त या लढ्यात लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

४. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या सूचीतून मोपला दंगलीतील धर्मांधांची नावे हटवण्याविषयी केलेले कार्य

अ. एकदा स्वातंत्र्यदिनानिमित्त एका नगरसेविकेने सामाजिक माध्यमावरील ‘पोस्ट’मध्ये (लिखाणामध्ये) राष्ट्रध्वजाचे विकृत चित्र प्रसारित केले होते. त्याविरोधात कै. बिनिल यांनी लगेच ‘ऑनलाईन’ प्रथमदर्शनी (प्रथम खबरी) माहिती अहवाल नोंदवला. त्यानंतर संबंधित नगरसेविकेने आक्षेपार्ह लिखाण सामाजिक माध्यमातून मागे घेतले.

आ. वर्ष २०१९ मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर ‘डिक्शनरी ऑफ मार्टीयर्स ऑफ इंडियाज फ्रिडम स्ट्रगल’ (भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचा कोश) याविषयीचे लिखाण प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये केरळमधील स्वातंत्र्यसैनिकांच्या नावामध्ये मोपला दंगलीत हिंदूंच्या हत्या करणार्‍यांच्या नावांचा समावेश होता. हे कळल्यावर कै. बिनिल यांनी लगेच संबंधित मंत्रालयाला ‘ई-मेल’च्या माध्यमातून तक्रार पाठवली. त्यानंतर सांस्कृतिक मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावरून आक्षेपार्ह भाग लगेच काढला.

५. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात कै. बिनिल सोमसुंदरम् यांचा सहभाग

कै. बिनिल सोमसुंदरम् यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये सहभागी होता आल्याविषयी नेहमी कृतज्ञता वाटायची. ‘तुम्ही मला निराशेतून बाहेर काढले’, असे ते म्हणायचे. त्यांचा इितहास, हिंदुत्व, अध्यात्म इत्यादी विषयांवर चांगला अभ्यास होता. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की …’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी ‘लव्ह जिहाद’, कोरोना लसीकरणमध्ये निधर्मीवाद्यांकडून हिंदु-मुसलमान भेदभाव, केरळमधील मोपल्यांच्या दंगली इत्यादी विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला होता. ते हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचक होते. त्यांना राष्ट्रभाषेविषयी प्रेम होते.

६. विविध शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर मात करून कै. बिनिल सोमसुंदरम् यांनी साधना आणि हिंदुत्वाचे कार्य करणे

कै. बिनिल हे नेहमी तमिळनाडूमधील ट्रिच्ची येथील गुरुमातेच्या आश्रमात  जायचे. ते माताजींनी सांगितलेली साधना निष्ठेने करायचे. त्यांना कितीही शारीरिक आजार असले, तरीही ते साधनेत सवलत घ्यायचे नाही. एकदा त्यांना आध्यात्मिक त्रासावर नामजपादी उपाय सांगितले होते. तेव्हा त्यांना त्या विषयाबद्दल पुष्कळ जिज्ञासा निर्माण झाली. त्यांनी घरी गोमूत्राने वास्तुशुद्धी केली. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये पुष्कळ चांगला पालट झाला. तेव्हापासून सनातन संस्था सांगत असलेली साधना आणि नामजपादी उपाय यांवर त्यांची श्रद्धा दृढ झाली. त्यांनी साधना आणि हिंदुत्वाचे कार्य शेवटपर्यंत सोडले नाही.

कै. बिनिल सोमसुंदरम् यांनी त्यांचे सर्वस्व हिंदुत्वाच्या कार्यासाठी समर्पित केले होते. त्यांचे जीवन हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांना सद्गती मिळो, अशी श्रीगुरुचरणी प्रार्थना !

(२३.१०.२०२१)

– हिंदु जनजागृती समितीचे केरळ येथील कार्यकर्ते

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *