हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांच्या संघटित प्रयत्नांना यश !हिंदु बांधवांनो, या यशासाठी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! कार्यक्रम रहित करण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी ‘असे कार्यक्रम पुन्हा अन्यत्र होणार नाहीत ना ?’ याविषयी समस्त धर्मप्रेमी हिंदूंनी दक्ष रहावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात |
मुंबई. – सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा नियोजित कार्यक्रम रहित करत असल्याची माहिती प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांकडून देण्यात आली आहे. २९ ऑक्टोबर या दिवशी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मुनव्वर फारूकी याचा ‘डोंगरी टू नोव्हेअर’ हा कार्यक्रम होणार होता; मात्र हिंदूंच्या देवतांवर सातत्याने अवमानकारक वक्तव्य करण्याची मुनव्वर फारूकी याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीकडून विरोध दर्शवण्यात आला होता. याविषयी समितीसह अन्य धर्मप्रेमींनी २६ ऑक्टोबर या दिवशी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांना याविषयीचे पत्र देऊन कार्यक्रम रहित करण्याची विनंती केली होती. कार्यक्रम रहित न केल्यास नाट्यगृहाच्या बाहेर आंदोलन करण्याची चेतावणीही देण्यात आली.
१. यापूर्वी मुनव्वर फारूकी याने इंदूर (मध्यप्रदेश) येथील एका कार्यक्रमात हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिपण्या केल्या होत्या. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर सुटला आहे.
२. त्याची हिंदुद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुंबईतील सामाजिक अन् धार्मिक सलोखा टिकून रहावा, यासाठी त्याच्या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीकडून विरोध करण्यात आला.
३. ‘मुंबईमध्ये अन्य ठिकाणी असलेले मुनव्वर फारूकी याचे सर्व कार्यक्रम रहित करावेत’, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांनाही निवेदन !
मुंबईत बोरिवली आणि वांद्रे येथे होणारे मुनव्वर फारूकी याचे नियोजित कार्यक्रम रहित करण्यात यावेत, यासाठी २७ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईच्या पोलीस आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले. श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, वज्रदल संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय चिंदरकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांनी हे निवेदन दिले.
(म्हणे) ‘प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यक्रम रहित !’ – मुनव्वर फारूकी
मुंबईमध्ये २९, ३० आणि ३१ ऑक्टोबर या दिवशीचे नियोजित कार्यक्रम रहित करण्यात आले असल्याचा संदेश मुनव्वर फारूकी याने सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे. यामध्ये प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यक्रम रहित करत असल्याचा मुलामा मुनव्वर फारूकी याच्याकडून देण्यात आला आहे. (‘प्रेक्षकांच्या सुरक्षितेसाठी’ असा शब्दप्रयोग करून मुनव्वर एकप्रकारे हिंदूंना अतिरेकीच ठरवत आहे. ‘प्रत्यक्षात श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यास ठार मारण्याचे फतवे कोण काढते ?’, हे मुनव्वर याने सांगावे. हिंदू अतिरेकी असते, तर असे कार्यक्रम करण्याचे धारिष्ट्यही मुनव्वर याने दाखवले नसते. – संपादक दैनिक सनातन प्रभात)
मुंबई महानगरपालिकेकडून कार्यक्रम रहित करत असल्याचे हिंदु जनजागृती समितीला पत्र !
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात २९ ऑक्टोबरच्या रात्रीच्या सत्राचे आरक्षण ‘एम्.डी. प्रोडक्शन’ या संस्थेला देण्यात आले होते. ‘काही प्रशासकीय कारणास्तव या सत्राचे आरक्षण रहित करण्यात आले आहे’, असे पत्र २७ ऑक्टोबर या दिवशी मुंबई महानगरपालिकेकडून हिंदु जनजागृती समितीला पाठवून कार्यक्रम रहित करण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे आहे.