मुंबई : येथील साधक दाम्पत्य श्री. गणेश लक्ष्मण पवार आणि सौ. सुहासिनी गणेश पवार यांनी आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याविषयी उत्तरप्रदेशचे राज्यपाल श्री. राम नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि तुळशी वृंदावन देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी उत्तर मुंबई जिल्ह्याचे खासदार श्री. गोपाळ शेट्टी, महाराष्ट्राच्या महिला बाल विकासमंत्री सौ. विद्या ठाकूर, आमदार आशिष शेलार आणि आमदार सौ. आसावरी पाटील उपस्थित होत्या.
सहयोग सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गणेश खणकर यांनी गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन चोगले मैदान, श्रीकृष्ण नगर, बोरिवली पूर्व येथे केले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या १० ते १२ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात २ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. या ठिकाणी सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शनही लावण्यात आले होते. या कार्यक्रमात भगवद्गीतेचे विनामूल्य वितरण करण्यात आले.
सत्कार सर्वस्वी श्रीगुरूंचाच ! – श्री. आणि सौ. पवार
श्री. गणेश पवार आणि सौ. सुहासिनी पवार यांच्याकडे कोणतेही पद नसतांना ते निरपेक्ष भावाने सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार करतात. आध्यात्मिक ग्रंथ प्रदर्शन आणि इतर धर्मकार्य यांत सक्रीय सहभाग घेतात. यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार केवळ श्रीगुरूंच्या कृपेमुळे झाला आहे. तो आमचा नसून सर्वस्वी त्यांचाच आहे, असे मनोगत श्री. आणि सौ. पवार यांनी व्यक्त केले. श्री. आणि सौ. पवार यांची मुलगी कु. अदिती पवार ही देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात