Menu Close

‘मॅकडोनल्ड्स’, ‘बर्गर किंग’, ‘डॉमिनोज्’, ‘पिझ्झा हट’ आदी आस्थापनांच्या खाद्यपदार्थांमध्ये केला जातो आरोग्याला घातक रसायनांचा वापर ! – अमेरिकेतील संशोधकांचा निष्कर्ष

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘मॅकडोनल्ड्स’, ‘बर्गर किंग’, ‘डॉमिनोज्’, ‘पिझ्झा हट’ ‘टॅको बेल‘, ‘चिपोटल’ आदी खाद्यपदार्थ विकणार्‍या आस्थापनांच्या खाद्यपदार्थांमध्ये रसायनांचा वापर केला जातो’, असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे. या खाद्यपदार्थांमध्ये ज्या रसायनांचा वापर केला जातो ती रसायने एरव्ही प्लास्टिक नरम ठेवण्यासाठी वापरली जातात, असे यात म्हटले आहे. अशा रसायनांचा वापर केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यावर त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. अन्न आणि औषध प्रशासनाने (‘एफ्.डी.ए.’ने) ‘या संशोधनाच्या अहवालाचा अभ्यास केला जाईल’, असे सांगितले आहे.

१. ‘जॉर्ज वाशिंग्टन विश्‍वविद्यालय’ आणि ‘साऊथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट’ (सॅन अँटोनियो, टेक्सास), ‘बोस्टन विश्‍वविद्यालय’ अन् ‘हार्वर्ड विश्‍वविद्यालय’ येथील संशोधकांकडून हे संशोधन करण्यात आले आहे. याविषयीचा अहवाल ‘जर्नल ऑफ एक्सपोजर सायन्स अँड एनवायरनमेंटल एपिडेमियोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

२. संशोधकांनी या आस्थापनांमधील ‘हॅमबर्गर’, ‘फ्राइज्’, ‘चिकन नगेट्स’, ‘चिकन बुरिटोस’ आणि ‘पनीर पिझ्झा’ यांचे ६४ नमुने घेतले. या नमुन्यांच्या संशोधनात ८० टक्क्यांहून अधिक खाद्यपदार्थांमध्ये ‘थॅलेट (phthalate)’ हे रसायन मिसळले असल्याचे संशोधकांना आढळून आले. हे रसायन आरोग्याला हानीकारक आहे.

(सौजन्य : Instants News)

३. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ‘थॅलेट (phthalate)’ रसायन सौंदर्य प्रसाधन, फिनाईल, डिटर्जंट, वायरची आवरणे आदींमध्ये वापरले जाते. हे रसायन प्लास्टिक नरम करण्यासाठी आणि वाकवण्यासाठी साहाय्यकारक ठरते. या रसायनामुळे अस्थमा आणि मुलांना मेंदूच्या संदर्भातला आजार होऊ शकतात, तसेच व्यक्तीच्या प्रजनन प्रणालीवरही याचा परिणाम होऊ शकतो.

४. संशोधकांना ‘बुरिटोस’ आणि ‘चीजबर्गर’ यांसारख्या मांसयुक्त खाद्यपदार्थांमध्ये या रसायनाची मात्रा अधिक सापडली, तर पिझ्झामध्ये ही अल्प प्रमाणात होती.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *