पणजी : देवभूमी असलेल्या गोव्यात काँग्रेस शासनाने कॅसिनो विकृती आणली. परंपरावादी म्हणवणार्या आणि सत्तेवर येण्यापूर्वी कॅसिनोविरोधी धोरण अवलंबणार्या भाजप शासनाने ही विदेशी विकृती गोव्यात रुजवली, असे आता खेदाने म्हणावे लागत आहे. भारतातील गोव्याचे मकाऊ (विदेशातील जुगारी शहर) करण्याचे हे कॅसिनोच्या समर्थकांचे षड्यंत्र आहे. कॅसिनोमुळे गोव्याचे अस्तित्वच धोक्यात आले असून, याला आताच अटकाव न केल्यास पुढे याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. गोवा राज्य कॅसिनोमुक्त करून गोव्यातील संस्कृतीचे रक्षण करणे, ही आज काळाची आवश्यकता आहे, अशी मागणी रणरागिणीच्या वतीने शासनाकडे करण्यात येत आहे.
सत्तेवर आल्यावर मांडवीतील तरंगते कॅसिनो अरबी समुद्रात हटवू, असे आश्वासन देणार्या भाजप शासनाने आता मांडवी नदीत रॉयल फ्लॉटेल या पाचव्या तरंगत्या कॅसिनोला अनुमती दिली आहे, तर उर्वरित चार कॅसिनोंची अनुज्ञप्ती मार्च २०१७ पर्यंत वाढवली आहे. भाजप शासनाने कॅसिनोची विकृती गोव्यात रुजवल्यास पुढील धोका लक्षात घेतला पाहिजे. कॅसिनोमुळे जुगारी वृत्तीला प्रोत्साहन मिळते आणि नागरिकांना जुगाराचे व्यसन लागते.
कॅसिनो खेळून सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त अवस्था निर्माण झाल्याने व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशा घटनाही वृत्तपत्रांमधून अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्वस्व गमावल्याने वैफल्यग्रस्त कुटुंबातील महिलांनी भाजपच्या आमदारांपर्यंत हा विषय पोचवल्याच्या बातम्याही अलीकडे प्रसिद्ध झाल्या आहेत. कॅसिनोमुळे कष्ट न करता जुगार खेळून झटपट पैसा मिळवण्याचे व्यसन लागते. भावी पिढीवर चुकीचा संस्कार होऊन त्यांची विनाशाकडेच वाटचाल होते. जुगारामुळे वेश्याव्यवसाय, मद्यपान, महिलांची छेडछाड काढणे, आदी कुप्रथांनाही चालना मिळते. बनावट चलन, तसेच काळा पैसा यांच्या वापरास यामुळे साहाय्य मिळते. गुन्ह्यांमध्ये वाढ होऊन सामाजिक सलोखा बिघडतो. देवभूमी म्हणून ओळख मिळालेल्या गोव्याची परंपरा आणि संस्कृती नष्ट होऊ शकते. नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळून कर वसूल करण्याचा हा प्रकार बंद न केल्यास या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
रणरागिणीच्या वतीने शासनाकडे पुढील मागण्या करण्यात येत आहेत
१. गोवा राज्य कॅसिनोमुक्त करा.
२. समुद्रात आणि हॉटेलमध्ये चालणार्या कॅसिनोंना अनुज्ञप्ती देण्यासाठी गॅम्बलिंग प्रिव्हेंशन अॅक्ट ऑफ १९७६ या कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणा रद्दबातल करा.
३. मद्यपान आणि सिगारेट ओढणे यांच्या विज्ञापनांवर ज्याप्रमाणे बंदी आहे, त्याप्रमाणे गोवा गॅम्बलिंग प्रिव्हेंशन अॅक्ट ऑफ १९७६नुसार कॅसिनोंच्या विज्ञापनांवर बंदी घालावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात