गोव्यातील गोवन वार्ता दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर कपाळावर कुंकू नसलेली आणि पाश्चात्त्यांप्रमाणे वेशभूषा केलेल्या महिलेचे छायाचित्र प्रसिद्ध केल्याचे प्रकरण
सांखळी (गोवा) – देव,देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेले सांखळी येथील संस्कृतीप्रेमी अन् धर्मप्रेमी नागरिक यांनी ३ नोव्हेंबरला सायंकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र येऊन ‘गोवन वार्ता’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या हिंदु संस्कृतीशी विसंगत असलेल्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाला विरोध करत या दिवाळी अंकाची सार्वजनिकरित्या होळी करून निषेध व्यक्त केला.
दिवाळी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण ! या प्रीत्यर्थ अनेक वर्तमानपत्रे दिवाळी अंक प्रसिद्ध करतात. या अंकांच्या मुखपृष्ठावर सर्वसाधारणपणे सोज्वळ सात्त्विक, शालीन आणि हिंदु संस्कृतीला अभिप्रेत असे एखाद्या सुवासिनीचे छायाचित्र मुखपृष्ठावर छापले जाते. यंदा ‘गोवन वार्ता’ या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर कपाळाला कुंकू नसलेल्या, केस मोकळे सोडलेल्या, पाश्चात्त्यांची वेशभूषा केलेल्या, तसेच काही प्रमाणात अंगप्रदर्शन करणार्या एका महिलेचे (मॉडेलचे) छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. हिंदु धर्मियांचे सण आणि उत्सव यांचे पावित्र्य राखणे प्रसारमाध्यमांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सांखळी येथील संस्कृतीप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी या अंकाची होळी करून जाहीर निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे ‘नागरिकांनी हा अंक विकत घेऊ नये’, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. भविष्यातही हिंदु धर्म, सण, उत्सव, हिंदूंच्या देवता आदींचे विडंबन आणि अवमान करणार्यांच्या विरोधात आम्ही कृतीशील रहाणार आहोत, असे या वेळी सांगण्यात आले.
‘गोवन वार्ता’च्या व्यवस्थापनाने याची नोंद घ्यावी आणि भविष्यात ही चूक सुधारावी’, असे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले.