Menu Close

रुग्णालयांतील आगी !

रुग्णालयांना लागणार्‍या आगी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक !

नगर जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभाग

महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभागाला ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा रुग्णालयांमध्ये लागणार्‍या आगीचे सूत्र ऐरणीवर आले. त्यातच आता भोपाळ येथील कमला नेहरू रुग्णालयातील बालकांच्या कक्षाला आग लागून ४ मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे ‘आगीमध्ये तेल ओतल्यासारखे’ झाले आहे. रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटना वर्षभरापूर्वी तरी या देशात घडत नव्हत्या; मात्र गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्यानंतर देशातील काही रुग्णालयांतील ‘कोविड सेंटर्स’ना आग लागल्याच्या घटना घडल्या. या आगी लागण्याची कारणे वेगवगळी आहेत. शॉर्टसर्किट, गॅस सिलिंडरचा स्फोट, ऑक्सिजनची गळती आदींमुळे या आगी लागल्या होत्या. या आगी लागण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. त्याचा अहवालही येईल आणि आग लागू नये; म्हणून उपाययोजनाही सांगितल्या जातील; मात्र प्रश्न असा आहे की, रुग्णालय प्रशासन आग लागू नये; म्हणून सर्व प्रकारची सतर्कता बाळगते का ? जेव्हा पहिल्यांदा ‘कोविड सेंटर’ला आग लागली, त्यानंतर देशातील अन्य ठिकाणच्या ‘कोविड सेंटर्स’नी सतर्कता बाळगायला प्रारंभ केला का ? निष्काळजीपणा कुठे होत असेल, तर त्यावर उपाय काढण्यास चालू केले का ? आग लागल्यास ती तत्परतेने विझवण्यासाठी यंत्रणा आहे का ?, हे पाहिले का ? किंवा आग लागल्यास रुग्णांना तातडीने बाहेर कसे हालवण्यात येऊ शकते, याचा विचार होऊन तशी उपाययोजना काढण्यात आली का ? असे प्रश्न उपस्थित होतात. कोविड रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या अभावीही अनेक ठिकाणी रुग्णांचे जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. रुग्णालयांमध्ये व्यक्ती आजारातून ठणठणीत बरी होऊन घरी जाण्यासाठी आलेली असते; मात्र रुग्णालयेच तिच्यासाठी काळ ठरणार असतील, तर अशा रुग्णालयांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पुढे येते. खासगी रुग्णालयांपेक्षा सरकारी रुग्णालयांमध्ये अनागोंदी असते, तेथील प्रशासकीय व्यवस्था अत्यंत वाईट असते, असे अनुभव जनतेला येतच असतात. त्यामुळे ज्यांच्याकडे काही प्रमाणात तरी आर्थिक क्षमता आहे, ते सरकारी रुग्णालयात जाण्यास टाळतात. कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयांकडून लूट केली जात असल्याने अनेकांनी सरकारी रुग्णालयात भरती होण्यास प्राधान्य दिले होते; मात्र याच सरकारी ‘कोविड सेंटर्स’ना आग लागल्याने सरकारी अनागोंदी प्राणघातक ठरली. एरव्ही रुग्ण दगावल्यावर डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत किंवा घडत आहेत, त्या तुलनेत अशा आगींच्या वेळी कुणाच्याही हिंसक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे; मात्र भविष्यात त्या होणार नाहीत, हे सांगता येणार नाही. तसेच सातत्याने आगी लागणे म्हणजे प्रशासन आणि सरकार निष्क्रीय आहे, असेही लक्षात येते. अशा आगी लागण्यापासून रोखण्यासाठी कठोर होण्याचीच आवश्यकता आहे आणि तशी कठोरता केवळ भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेमुळेच येऊ शकते. अशी व्यवस्था धर्माचरणी लोकांच्या हिंदु राष्ट्रातच निर्माण होऊ शकते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *