नि:स्वार्थपणे समाजकार्य करणार्या तळागाळातील भारतियांना पद्म पुरस्कार मिळणे आनंददायी !
देशहितासाठी मोलाचे योगदान देणार्यांना ८ नोव्हेंबरला ‘पद्म’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ‘प्रसिद्धीलोलुपता’रूपी स्वार्थासाठी आज अनेक जण धडपडत असतांना पहायला मिळतात, किंबहुना स्वत:चे वर्चस्व अथवा महत्त्व प्रस्थापित करण्याचे आजचे हे शर्यतीचे जग आहे. त्या दृष्टीकोनातून गेल्या काही वर्षांपर्यंत पद्म पुरस्कार केवळ एका ठराविक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त अथवा वलयांकित व्यक्तींपर्यंत सीमित असत. आता मात्र नि:स्वार्थीपणे, अनेक दशके कार्य करणार्या आणि प्रसिद्धीच्या झोतापासून पुष्कळ दूर असलेल्यांचा विचार केला जात आहे. हे सर्वसाधारण भारतीय नागरिकांसाठी निश्चितच आनंददायी आहे.
सामान्यातील ‘असामान्य’ !
पद्म पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये उद्योगपती आनंद महिंद्रा, अभिनेत्री कंगना राणावत, गायक अदनान सामी, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि मुष्टीयोद्धी अन् राज्यसभा खासदार मेरी कॉम यांसारखे बहुचर्चित चेहरे आहेत. त्यांची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही; परंतु आता यांमध्ये खेडोपाडी कार्य करणार्यांचा समावेश झाला आहे. अशांपैकीच एक म्हणजे कर्नाटकातील ७२ वर्षीय आदिवासी महिला तुलसी गौडा ! पद्म पुरस्कार घेण्यासाठी त्या अनवाणी आल्या होत्या. यातून त्यांचे अतीसामान्यत्व स्पष्ट होते; परंतु आज त्यांनी देशासमोर असामान्यत्वाचे उदाहरण ठेवले आहे. गेली तब्बल ६० वर्षे म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षांपासून आतापर्यंत त्यांनी ३० सहस्र झाडे लावली आहेत. याचा कुठेच गाजावाजा नाही, प्रसिद्धीही नाही. अन्यथा आमच्याकडे युरोपातील १८ वर्षीय ग्रेटा थनबर्ग आणि पाकिस्तानातील कुणी मलाला युसूफझाईसारख्या तरुणी आहेत, ज्यांनी विशेष काही कार्य केलेले नाही, गौडा यांच्याइतके तर नाहीच नाही, तरी त्यांना लगेच प्रतिष्ठा मिळते अन् जागतिक पुरस्कारांचा वर्षाव केला जातो. त्यांच्या तुलनेत गौडा यांचे महत्त्व वेगळेपणाने उठून दिसत आहे. जागतिक व्यासपिठावर अशांना निश्चितच बहुमान मिळणार नाही, परंतु; अनंतकोटी ब्रह्मांडांचा स्वामी असलेल्या भगवंताकडून त्यांची नोंद घेतली जातेच, असा सश्रद्ध हिंदूंचा भाव आहे. आज भारत सरकारनेही त्यांचा सन्मान केला आहे.
यंदा मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारांमध्ये आणखी एक नाव म्हणजे कर्नाटकातील हरेकल्ला हजब्बा. हे संत्रे विकून स्वत:चा उदरनिर्वाह चालवणारे अत्यंत साधे व्यक्तीमत्त्व ! हजब्बा यांच्या ‘न्यूपडपू’ नावाच्या गावात शाळा नव्हती. त्यांनी वर्ष २००० मध्ये आयुष्यातील सर्व मिळकत खर्च करून एक एकर भूमीवर प्राथमिक शाळा उभी केली. प्रतिदिन संत्रे विकून १५० रुपये कमावणार्या हजब्बा यांच्या शाळेत आज २१ वर्षांनी पहिली ते दहावी इयत्तेपर्यंत तब्बल १७५ मुले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे कुठे हजब्बा यांच्यासारखे सामान्यातील असामान्य व्यक्तीमत्त्व आणि कुठे राजकारणापायी अथवा काळा पैसा पांढरा करण्यासाठी शाळा-महाविद्यालये उघडणारे आजचे काही शिक्षणसम्राट ?
‘बियाण्यांची माता’ म्हणजेच ‘सीड मदर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहीबाई सोमा पोपेरे या नगर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील शेतकरी असून त्यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. परंपरागत वारसा प्राप्त राहीबाई यांनी त्या ज्ञानाचा लाभ घेऊन २० वर्षांपूर्वी देशी बियाण्यांचे उत्पादन करून ते वाटण्यास आरंभ केला. तसेच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून देशी बियाण्यांच्या रक्षणाचे अभियान राबवले. शेती व्यवसाय, बाजार समित्या, एवढेच काय तर शेतकर्यांसाठी केल्या जाणार्या विविध शासकीय योजना यांमध्ये जो भ्रष्टाचार दिसून येतो, त्यांच्यासाठी राहीबाई या चपराकच आहेत. अशा अनेक राहीबाई महाराष्ट्राने सिद्ध कराव्यात, अशीच प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. केंद्रशासनाने सर्वसाधारण समाजातील अशा रत्नांना शोधून काढून त्यांचा यथोचित सन्मान केला. अशामुळे भारतीय समाजाला नि:स्वार्थ कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
‘भूषणा’वह सन्मान !
यंदा ‘पद्मविभूषण’ हा दुसरा सर्वाेच्च नागरी पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये वाराणसी येथील सुप्रसिद्ध ठुमरी गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांचे नाव घेणे आवश्यक आहे. किराना घराणे आणि बनारसी ख्यालचे (राग विस्ताराच्या एका पद्धतीचे) मुख्य गायक असलेले पंडित मिश्र यांची भजने अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या गायनातून भगवंताप्रती असलेल्या त्यांच्यातील शरणागतभावाची अनुभूती येते. पंडित छन्नूलाल मिश्र यांच्या प्रेरणादायी जीवनातून अध्यात्मपरायणता, तसेच ‘कला ही कलेसाठी नसून ती ईश्वराच्या प्राप्तीकरिता आहे’, हा संदेश दिला गेला आहे.
निष्काम कर्मयोग !
भारत ही आध्यात्मिक भूमी आहे. तिने आजपर्यंत अनेक रत्ने सिद्ध केली आहेत. यांमध्ये ऋषिमुनी, साधूसंत अशा असंख्य विभूतींचा उल्लेख करता येईल. त्यांच्यामुळे भारताचे आणि पर्यायाने जगाचे भले झाले आहे. भारताची ‘गुरु-शिष्य परंपरा’ ही जगाला भारताने दिलेली सर्वांत अमूल्य देणगी आहे. हिंदु धर्माने दिलेल्या आध्यात्मिक शिकवणीनुसार जी व्यक्ती स्वत:ला विसरून इतरांसाठी नि:स्वार्थपणे कार्य करते आणि त्यांचे हित चिंतते, तिला कर्मयोगी म्हटले जाते. ‘तत्कर्म यत् न बन्धाय ।’, या संस्कृत श्लोकानुसार ‘ज्या कर्मामुळे चित्तावर कोणत्याही प्रकारचे बंधनात टाकणारे नवीन संस्कार होत नाहीत, त्याला ‘कर्मयोग’ या शब्दाच्या संदर्भात ‘कर्म’ असे म्हणतात. असे कर्म सतत करत रहाणे, याला ‘कर्मयोग’ म्हणतात. ही शिकवण आजच्या सामाजिक विचारप्रवाहाच्या अगदी उलट आहे. केंद्रशासन या दृष्टीकोनातून अशा कर्मयोग्यांना शोधून काढत आहे. या माध्यमातून आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे दिशाहीन झालेल्या भारतीय समाजाला निश्चितच योग्य वळण मिळेल. मानवाला स्वार्थी बनवणार्या पाश्चात्त्य विचारसरणीचा प्रभाव अशा उदाहरणांतून न्यून व्हायला साहाय्य होईल, हे निश्चित !