अन्नधान्यांमध्ये विषारी घटक आढळणे, ही मानवनिर्मित समस्या !
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत आवश्यकता आहेत. अन्न कोणत्या दर्जाचे उपलब्ध होते, यावर व्यक्तीचे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे केवळ अन्न मिळणे, एवढीच नाही, तर सकस अन्न मिळणे, ही व्यक्तीची मूलभूत आवश्यकता म्हणता येईल. तांदूळ, गहू, ज्वारी यांसारखी तृणधान्ये हा मनुष्याच्या आहाराचा मुख्य भाग असतो, मग तो धनाढ्य असो वा गरिब ! तृणधान्यांवर व्यक्तीचे भरणपोषण होते.
भारतात अनुमाने ८० टक्के राज्यांमध्ये तांदूळ हा मुख्य आहार आहे; मात्र तांदुळाविषयी एका संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. मातीतील औद्योगिक प्रदूषित घटक आणि कीटकनाशकांमधील रसायन हे तांदुळामध्ये असण्याची शक्यता सध्या अनेक पटींनी वाढली आहे, असे इंग्लंडमधील क्वीन विश्वविद्यालयाने केलेल्या अभ्यासामध्ये सांगण्यात आले आहे. अशा दूषित तांदुळाचे सेवन केल्यास ‘आर्सेनिक’ या विषारी घटकाची बाधा होऊन कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे केलेल्या अभ्यासातूनही तांदुळातील ‘आर्सेनिक’ या विषारी घटकामुळे सहस्रावधी महिलांना कर्करोग झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.
ही मानवनिर्मित समस्या !
अनेक देशांतील माती प्रदूषित झाल्यामुळे भारतासह जागतिक स्तरावर आहाराचा दर्जा चिंताजनक आहे, हे संशोधकांच्या अभ्यासातून लक्षात येते. ही मानवनिर्मित चुकांमुळे निर्माण झालेली समस्या आहे. या समस्येचा ऊहापोह करतांना ‘कीटकनाशकांचा उगम का झाला ?’ येथून विचारप्रक्रियेला आरंभ करावा लागेल. कीटकनाशके आणि रासायनिक खते यांचा अतीवापर, प्रदूषित भूमी या समस्या गेल्या काही वर्षांत निर्माण झाल्या आहेत. प्राचीन काळात भारतात अशा समस्या नव्हत्या. भारतात नैसर्गिकरित्याच सकस आहार सहजतेने उपलब्ध होता. तसेच भारताला सुपीक भूमीची देण लाभली आहे. येथे परंपरेनेच शेतीचे शास्त्रोक्त ज्ञान पुढील पिढ्यांना प्रदान होते. त्यामुळे भारताने ही परंपरा जपत जगासाठीही ती खुली करून द्यायला हवी; मात्र सध्या याच्या उलट चित्र दिसत आहे. अधिकाधिक पीक घेण्याच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातो. त्यामुळे भूमीचा पोत बिघडतो. भारतात प्रत्येक ऋतू आणि प्रदेश यांनुसार पीक अन् फळे यांच्या उपलब्धतेत विविधता आहे. तांदुळाचेच उदाहरण घेतेले, तर देशातील विविध राज्यांत तांदुळाच्या विविध जाती आढळतात. सध्या मात्र सर्व ऋतूंत आणि सर्व प्रदेशांत सर्व पिके अन् त्यांच्या आंतरजाती, तसेच फळे उपलब्ध होण्यासाठी संकरित बियाणे वापरात आणली गेली. नैसर्गिकरित्या उगवणारी पिके अन् फळे यांच्या मध्ये त्या त्या हवामानातील प्रतिकूलतेशी लढण्याचे बळ उपजतच असते; मात्र संकरित बियाणांना हवामानात तग धरून रहाता येण्यासाठी कीटकनाशकांच्या मागणीत वाढ होऊ लागली. कीटकनाशके विषारी आणि हानीकारक असल्याने अनेक देशांमध्ये त्यांवर बंदी घालण्यात आली असली, तरी भारतात त्यांवर पूर्णपणे बंदी आलेली नाही. गेल्या वर्षी काही कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आली; परंतु अत्यंत हानीकारक अशा कीटकनाशकांवर बंदी घालण्यासाठी स्वातंत्र्यानंतर ७ दशके का लोटली ? बंदी न घातलेल्या हानीकारक कीटकनाशकांचे काय ? हे प्रश्न उपस्थित होतात.
इंग्रजांनी भारतात विदेशी गायी (जर्सी) आणल्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर निकृष्ट दर्जाचे दूध देणार्या अशा गायींना देशातून हद्दपार करणे आवश्यक होते; परंतु अधिकाधिक दूध आणि त्याद्वारे उत्पन्न मिळवण्याच्या लालसेपोटी या गायींना येथेच ठेवले गेले. यामुळे दुधाचा दर्जा तर बिघडलाच, शिवाय विदेशी गायींचे शेणही भूमीसाठी हानीकारक असते. याने भूमीचा कस बिघडतो. भूमी सुपीक ठेवण्यात देशी गोवंशियांचे अमूल्य योगदान असते; मात्र देशी गोवंशियांची धर्मांधांकडून राजरोसपणे हत्या केली जाते. यावर पोलीस आणि प्रशासन ठोस असे काहीच करत नाही.
औद्योगिक प्रदूषणाचे सूत्र पुष्कळ वेळा चर्चिले जाते; परंतु कारखान्यांचे सांडपाणी बिनधोकपणे नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांत मिसळले जाते. पोलीस-प्रशासन असे प्रदूषण करणार्यांवर कठोर कारवाई करत नाहीत. यामुळे दिवसेंदिवस भूजल आणि माती यांमधील विषारी घटकांचे प्रमाण वाढत आहे. रसायनमिश्रित पाणी ज्या जलस्रोतांत सोडले जाते, त्याच्या पाणलोट क्षेत्रातील फळे, भाजीपाला आणि धान्ये यांची गुणवत्ता काय असेल ? असा आहार खाण्यायोग्य तरी असेल का ? गेली अनेक दशके औद्योगिक प्रदूषणाचे भयावह परिणाम ज्ञात असूनही त्याच्या विरोधात काहीच कारवाई न होणे, हे अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे. स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवणारे याच्या विरोधात मात्र काहीच करत नाहीत.
सेंद्रिय शेती प्रवाहात आणायला हवी !
निसर्गाने शेती या क्षेत्रात सर्व दृष्टीने अनुकूलता देऊनही मानवाच्या षड्रिपूंमुळे शेतीचे चक्र बिघडले आहे. ते सुरळीत करण्यासाठी सेंद्रिय म्हणजेच पारंपरिक शेतीला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. त्या त्या प्रदेशात, त्या त्या ऋतूत, ती ती पिके घेणे, शेणखतासारखी पारंपरिक खते वापरणे असे प्रयत्न सार्वत्रिक स्तरावर व्हायला हवेत. यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा. भूमी प्रदूषित करणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी. सध्या देशात शेतीशी संबंधित अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. त्यामुळे केवळ सेंद्रिय शेतीच्या संदर्भात जागृती करून चालणार नाही, तर शेतीशी संबंधित अर्थव्यवस्थाही सुधारायला हवी. शेतकरी, दलाल-अडते, व्यापारी आणि ग्राहक या मोठ्या साखळीत सध्या उत्पन्नाचे केवळ एका वर्गाकडेच केंद्रीकरण होत असल्याने सामान्य शेतकरी आणि ग्राहक भरडले जातात. ही व्यवस्था सुरळीत केल्यास अधिकाधिक उत्पन्न घेण्याच्या लालसेपोटी रासायनिक खतांचा होणारा वापर काही प्रमाणात तरी अल्प होऊ शकतो. तसेच लोकांमध्ये समाधानाची भावना निर्माण होण्यासाठी समाजाला धर्मशिक्षणही द्यायला हवे. विषमुक्त अन्नधान्यासाठी सरकारी पातळीवर असे सर्वच स्तरांवर प्रयत्न होणे अपेक्षित आहे !