हिंदूंनो, मंदिर सरकारणाचे दुष्परिणाम जाणा आणि मंदिरे देवाप्रती भाव असलेल्या भक्तांच्याच कह्यात रहाण्यासाठी आग्रही रहा !
प्रसिद्ध देवस्थानांचे राजकीय वाटप !
मुंबई : राज्यातील देवस्थानांच्या विश्वस्तपदी नेमणुकीसंदर्भात शासनाने निकष ठरवावेत आणि अराजकीय मंडळींची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने व्यक्त केलेली असतांनाही राज्यशासनानेे देवस्थानचे राजकीय वाटप निश्चित केले आहे. त्यानुसार शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान, पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर आणि कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर या न्यासांचे अध्यक्षपद भाजपला, तर मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक संस्थानचे अध्यक्षपद शिवसेनेला दिले जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दैनिक लोकमतला ही माहिती दिली. ते म्हणाले, महामंडळाच्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात, अशी सर्वच मंत्र्यांची भावना असून मुख्यमंत्रीही त्यास अनुकूल आहेत. सूत्रांनी सांगितले की, श्री सिद्धीविनायक संस्थानसह महालक्ष्मी मंदिर संस्थानचे अध्यक्षपदही शिवसेनेने मागितले होते. तथापि भाजपने त्यास नकार दिला. त्याऐवजी सिडको वा म्हाडा यांपैकी एकाचे अध्यक्षपद शिवसेनेला दिले जाऊ शकते. उच्च न्यायालयाने जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखालील शिर्डी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून नवीन मंडळ नेमण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर शासनाने नेमलेल्या नव्या विश्वस्त मंडळातही राजकीय नेत्यांची वर्णी लावण्यात आली. ही गोष्ट याचिकाकर्त्याने निदर्शनास आणून दिल्यानंतर उच्च न्यायालयाने तेही मंडळ बरखास्त केले. हा इतिहास ताजा असतांना पुन्हा या देवस्थानांचे राजकीय वाटप होत असल्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात