मुंबई – देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांचे विडंबन होते. फटाक्यांमुळे प्रदूषण होऊन सर्वांना त्यांचा त्रासही होतो. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी, याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती, समविचारी संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने मुलुंड येथील तहसीलदार संदीप थोरात यांना देण्यात आले. या वेळी इस्लामिक अर्थव्यवस्था निर्माण करू पहाणार्या हलाल प्रमाणपत्राच्या विरोधातही निवेदन देण्यात आले. ‘यासंदर्भात आम्ही योग्य ते आदेश देऊ’, असे आश्वासन तहसीलदार थोरात यांनी दिले.
विक्रोळी पोलीस ठाणे (पूर्व आणि पश्चिम), मुलुंड पोलीस ठाणे, बोईसर एम्.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथेही निवेदन देण्यात आले आहे. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद भिसे यांनी सांगितले, ‘‘फटाक्यांच्या संदर्भात लवकरच पत्रक काढू. तुमचे कार्य चांगले आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ मी वाचले आहे. सण-उत्सव साजरे करण्याविषयी माहिती देणारा सनातनचा ग्रंथही मी वाचला आहे. यंदा माझ्या घरी गणेशोत्सवाच्या काळात पुरोहित येऊ न शकल्याने तुमच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आम्ही पूजा केली.’’
बोईसर येथे फटाके विक्रेत्यांचे प्रबोधन !
पालघर – येथील परिसरातील फटाके विक्रेत्यांना निवेदन देऊन त्यांचे प्रबोधन करण्यात आले. फटाके विक्रेत्यांकडूनही यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. काही फटाके विक्रेत्यांनी सांगितले, ‘‘आम्ही देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान होईल, असे फटाके विक्रीसाठी ठेवतच नाही.’’ येथील घाऊक विक्रेते श्री. भूपेश घरत म्हणाले, ‘‘वर्ष २०१७ मध्ये देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेली अडीच लक्ष रुपये किमतीचे फटाके विक्री न करता संबंधित आस्थापनाला परत पाठवले होते.’’
गुजरात येथे प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन !
सुरतचे अतिरिक्त जिल्हाधिकारी योगराज सिंह झाला, उमरगाव (वलसाड)चे नायब मामलतदार दीपसिंह सोलंकी, तसेच उमरगाव पोलीस ठाण्याचे जे.एन्. सोलंकी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी उमरगाव भाजपचे महामंत्री श्री. मनोज झा, हिंदु युवा मंचचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण गोमतीवाल, श्री. चंदुभाई शुक्ल, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. निखील दर्जी, श्री. भूपेश भानुशाली, श्री. उमंग दर्जी उपस्थित होते.