काँग्रेसप्रमाणे आताच्या शासनाच्याही राजवटीत हिंदूंना जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली यात्रा कराव्या लागणे, हे लज्जास्पद !
- यात्रेस २ जुलैपासून आरंभ
- यात्रा सुरळीत पार पडू न देण्याचा आतंकवाद्यांचा निश्चय
श्रीनगर : यंदा अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादाचे सावट आहे. यात्रेकरूंना आतंकवादी कृत्यांचा त्रास होऊ नये; म्हणून सुरक्षायंत्रणांनीही जोरदार सिद्धता चालू केली असून आतापासूनच सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यास, तसेच संशय येताच छापे मारण्यास आरंभ केला आहे.
अमरनाथ यात्रेत हिजबूल मुजाहिदीन ही जिहादी आतंकवादी संघटना अडथळे आणील किंवा काही आतंकवादी कृत्ये करील, अशी भीती अन्वेषण यंत्रणांनी व्यक्त केली आहे. हिजबूल मुजाहिदीनमध्ये तरुणांची भरती करणार्या एकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या म्हणण्यातून ही यात्रा सुरळीत होऊ द्यायची नाही, असे या संघटनेने ठरवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षादल यांना आतापासूनच सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बाबा बर्फानी म्हणून ओळखल्या जाणार्या हिमलिंगाचा आकार यंदा मोठा असेल, असा आतापर्यंतचा अंदाज आहे. अर्थात् अमरनाथ देवस्थान मंडळाचे पथक मे मासाच्या पहिल्या आठवड्यात तेथे जाऊन पाहणी करणार आहे; मात्र ज्यांनी तेथे जाऊन पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले, त्यांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर अद्यापही बर्फ साचलेला असून तो काढण्याच्या कामाचा आरंभ मे मासात होईल. यंदा २ जुलैपासून अमरनाथ यात्रा चालू होणार असून त्यासाठी नोंदणी चालू झाली आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गात यंदा लंगरचे (विनामूल्य भोजनाचे) मंडप उभारण्यास अनुमती दिली असून ३२ आधुनिक वैद्यांचे पथकही या मार्गावर कार्यरत असेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात