Menu Close

आयसिस-खुरासानची पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची चेतावणी !

‘आयसिस-के’ (आयसिस-खुरासान) या आतंकवादी संघटनेने पाकिस्तानला चेतावणी दिली आहे, ‘‘आम्ही तुम्हाला नष्ट करू आणि तुमचे तुकडे करू. आम्हाला पाकिस्तानमध्येही अफगाणिस्तानसारखे राज्य आणायचे आहे.’’ याचे विश्लेषण करतांना ‘आयसिस-के’ला नेमके काय करायचे आहे ? त्यांची क्षमता काय आहे आणि येणार्‍या काळात ते पाकिस्तानच्या विरोधात काय करू शकतात, या सर्व पैलूंचे विश्लेषण करणे, हे आवश्यक आहे.

१. ‘आयसिस-के’ या सुन्नी मुसलमानांच्या संघटनेने अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील शियापंथीय मुसलमानांवर आक्रमण करणे

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

अ. १५ ऑगस्ट या दिवशी अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य आले. त्यानंतर तेथे पूर्वीपासून असलेल्या विविध आतंकवादी गटांनाही वाटायला लागले की, आता आपणही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यावर राज्य करू शकतो. यामध्ये ‘आयसिस-के’ (आयसिस-खुरासान) हा एक मोठा गट आहे. त्यांच्याकडे कदाचित् १ सहस्र ५०० हून अधिक आतंकवादी असावेत. त्यांच्याकडे पैसा आणि शस्त्रे यांची कमतरता नाही. अफगाणिस्तानमधील समाज जाती-जमातींमध्ये विभागला गेलेला आहे. तेथील लोक लढण्याविना दुसरे काहीही काम करत नाहीत. त्यामुळे ‘आयसिस-के’ला भरतीसाठी नवनवीन आतंकवादी मिळणे अजिबात कठीण नाही. तेथे तालिबानचे राज्य आल्यानंतर ‘आयसिस-के’ने अनेक आतंकवादी आक्रमणे केली आहेत.

आ. एका आतंकवादी आक्रमणामध्ये ‘आयसिस-के’ने एका उघूर मुसलमानाचा ‘आत्मघातकी बॉम्बर’ म्हणून वापर केला होता. या उघूर मुसलमानांची संख्या चीनमध्ये २-३ कोटी आहे. त्यांना चीनपासून वेगळे व्हायचे आहे. त्यांच्यातील काही जण ‘आयसिस-के’मध्ये भरती झाले आहेत. त्यासमवेतच या संघटनेमध्ये अफगाणिस्तानमधील काही लोकही सहभागी झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी हे दोन समाज आहेत. तेथे बहुतांश लोकसंख्या मुसलमान असून इतर धर्मियांची संख्या केवळ १ टक्का आहे. मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी हे दोन पंथ आहेत. तेथे शियांची लोकसंख्या ११ – १२ टक्के आहे. तेथील हजारा ही जमात मूळची शिया आहे. त्यांना इराणकडून साहाय्य मिळते. ‘आयसिस-के’ हे सुन्नी असून ते शियांच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांनी शिया मशिदीमध्ये आक्रमण करून अनेक शिया मुसलमानांना ठार मारले आहे. आता त्यांनी पाकिस्तानमध्येही हिंसाचार माजवला आहे.

इ. ‘आयसिस-के’ व्यतिरिक्त ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ ही आतंकवादी संघटनाही पाकिस्तानच्या विरोधात आहे. तेहेरिक पाकिस्तानला आपण ‘पाकिस्तानी तालिबान’ म्हणू शकतो. अफगाणिस्तानचे तालिबान आणि पाकिस्तानचे तालिबान हे एका बाजूने लढण्यापेक्षा एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे सध्या अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे.

ई. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ ही संघटना पाकिस्तानच्या विरोधात लढत आहे. त्यांना पाकिस्तानवर उग्र स्वरूपाची सत्ता आणायची आहे. ‘आयसिस-के’ला अफगाणिस्तानमधील सत्तेत मोठा वाटा हवा आहे. त्यामुळे कोण कशासाठी लढत आहे, हे कळत नाही; परंतु तेथे हिंसाचाराचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे.

‘अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य आल्यावर तेथे शांतता निर्माण होईल’, असे वाटले होते; पण तेथे केवळ हिंसाचार, हिंसाचार आणि आत्मघातकी आक्रमणेच चालू आहेत. तालिबानचे कोणते नेते जिवंत आहेत आणि कोण मारले गेले, याविषयी अजूनही समजलेले नाही. अजूनही काबूलमध्ये येण्याचे त्यांचे धाडस नाही; कारण हक्कानी गटाला तालिबानमध्ये वर्चस्व निर्माण करायचे आहे.

२. पाकिस्तानमध्ये अतिशय स्फोटक आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होणे अन् ‘आयसिस-के’ने पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याच्या दिलेल्या चेतावणीचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक असणे

पाकिस्तानला वाटत होते की, तालिबानचे राज्य आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये एक ‘स्ट्रॅटिजिक डेप्थ’ मिळेल. अफगाणिस्तान आपले गुलाम राष्ट्र होईल; पण तसे काहीच झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानची मोठी हानी होत आहे. हिंसाचार त्याचा एक भाग झाला. संयुक्त राष्ट्राच्या ‘फायनान्शियल टास्क फोर्स’या संस्थेने पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकले आहे. जागतिक स्तरावरील कोणतीही संस्था पाकिस्तानला साहाय्य करण्यास सिद्ध नाही. त्यांना सौदी अरेबियाने थोडीफार साहाय्य केले आहे. पाकिस्तानची  आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. तेथे हिंसाचार वाढत आहे. पाकिस्तानमध्ये अतिशय स्फोटक आणि धोकादायक परिस्थिती बनली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांमध्ये गृहयुद्ध वाढण्याची शक्यता आहे. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ किंवा ‘आयसिस-के’ या आतंकवादी गटांना अफगाणिस्तान अन् पाकिस्तान यांच्यातील ‘ड्युरंट रेखा’ (अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा) मान्य नाही. त्यामुळे येणार्‍या काळात पाकिस्तानची स्थिती अतिशय गंभीर होणार आहे, यात शंका नाही. दुर्दैवाने त्याला अफगाणिस्तानमधील नागरिक बळी पडत आहेत. आज लक्षावधी अफगाणिस्तानी नागरिक पाकिस्तान, इराण आणि सेंट्रल रिपब्लिक या देशांमध्ये आश्रयाला जात आहेत. ‘आयसिस-के’ने पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची जी चेतावणी दिली आहे, ती गंभीरपणे घेणे आवश्यक आहे; कारण अफगाणिस्तानमध्येच नाही, तर पाकिस्तानमध्येही हिंसाचार वाढला आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *